অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मार्से

मार्से

मार्से

फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व पहिल्या क्रमांकाचे बंदर. लोकवस्ती ९,०८,६००, महानगरीय १०,७०,९१२ (१९७५). स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विलक्षण साहसाने, भारतीयांना सुपरिचित झालेले हे बंदर, भूमध्य समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर अर्धचंद्राकृती, उजाड टेकड्यांनी वेढलेल्या लीऑ आखारावर वसलेले आहे. हे ऱ्होन नदीमुखाच्या पूर्वेस ४७ किमी. आणि पॅरिसपासून आग्नेयीस ७३२ किमी. वर आहे.

बूश–द्यूऱ्होन विभागाचे मुख्य ठाणे असलेले शहर ७·२ किमी. लांब व २२ मी. रूंदीच्या रोव्ह भुयारी कालव्याने ऱ्होन नदीला जोडलेले आहे.

फ्रान्समधील हे सर्वांत जुने शहर असून आशिया मायनरमधून आलेल्या ग्रीकांनी मासिलीआ नावाने हे. इ. स. पू. ६०० मध्ये वसविले. ते मध्ययुगात दुय्यम दर्जाचे होते.

शहराच्या वरच्या भागावर १२८८पर्यंत बिशपची सत्ता होती. त्यानंतर ते शहराच्या खालच्या भागाशी जोडण्यात आले. धर्मयुद्धांच्या काळात (अकरावे ते चौदावे शतक) हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र व गजबजलेले बंदर म्हणून प्रसिद्ध होते.परंतु चौदाव्या शतकाच्या सुरूवातीस येथील व्यापाराला उतरती कळा लागली.

१४८१ मध्ये ते फ्रेंचांच्या ताब्यात आले. चौदाव्या लूईचा अर्थमंत्री झां बातीस्त कॉलबेअर (१६१९–८३) याने हे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्य ठाणे केले. १७०० मध्ये येथील व्यापार खूपच सुधारला, पण १७२० च्या प्लेगने येथील जवळजवळ निम्मी लोकसंख्या गारद केली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातही याची खूप नासधूस झाली. त्यावेळी क्रांतिसैन्यासाठी केलेले‘मार्सेलेझ ’ हे गाणे पुढे फ्रान्सचे राष्ट्रगीत झाले.

१८३० मधील अल्जीरियावरील फ्रेंच आक्रमण व १८६९ मध्ये वाहतुकीसाठी खुला झालेला सुएझ कालवा यांमुळे मार्सेची वेगाने भरभराट होऊ लागली; परंतु दुसऱ्या महायुद्धात बाँबहल्ल्यांमुळे याची खूपच हानी झाली. त्यानंतर पूर्व भूमध्य समुद्र, आफ्रिकेचा किनारा, मध्यपूर्व व अतिपूर्व भाग, यूरोपचा इतर प्रदेश यांच्याशी पुन्हा दळणवळण व व्यापार वाढला. पीठ, वनस्पती तेले, साबण, सिमेंटच्या वस्तू, गंधक, रसायने, प्रक्रियाकृत अन्नपदार्थ हे येथील प्रमुख उद्योग आहेत. अलीकडे खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यांनी तर क्रांतीच केली आहे.

जुने बंदर अपुरे पडू लागल्यामुळे पश्चिमेस ऱ्होन नदीच्या त्रिभूज प्रदेशात खोल द्रोण्या खोदून फॉस हे प्रचंड आधुनिक बंदर निर्माण केले आहे. तेही अपुरे पडू लागले तेव्हा त्याच्याही पलीकडे एतां-द-बेर हे मोठे सरोवर त्याला जोडून घेण्यात आले.

येथे तेल शुद्धीकरणाचे व खनिज तेल पदार्थांचे, तसेच गंधकाम्ल आणि खते यांचे मोठमोठे कारखाने उभारण्यात आले आहेत. येथून जर्मनीकडे तेलनळ नेलेले आहेत.

आता टेकड्याटेकड्यांदरम्यानही कारखाने निघाले आहेत. तेथून बसगाड्यांनी मार्सेच्या मध्यभागाकडे मोठी वाहतूक चालते. जुन्या बंदरापासून उत्तरेकडे मार्सेचा कॅनेतिएरे हा मोठा मार्ग जातो. त्यावर दुकाने, उपहारगृहे, कॉफीपानगृहे, चित्रपटगृहे इत्यादींची रेलचेल आहे. तेथे सतत पर्यटकांची वर्दळ असते.

लोहमार्ग, कालवे, रस्ते इत्यादींद्वारा येथील वाहतूक चालते. एतां-द-बेरजवळच मारीन्यान हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

वाढत्या गर्दीमुळे शहरात घरांची मोठीच समस्या निर्माण झाली आहे. जगप्रसिद्ध फ्रेंच वास्तुशिल्पी ल कॉर्ब्यूझ्ये याने १९५२ मध्ये टेकड्यांपलीकडे सु. २,००० माणसे आरामात राहतील एवढी अठरामजली सर्व सोयींनी युक्त अशी आदर्श इमारत उभारली. त्या धर्तीवर आता शासकीय अनुदानाने अनेक इमारती झाल्या आहेत.

एका एकाकी टेकडीवरील बॅसिलिका-द-नोत्रदाम-द-ला गार्दे या चर्चच्या शिखरावरील मेरीचा सोनेरी भव्य पुतळा व पूर्वी राजबंद्यांसाठी वापरला जाणारा, एका छोट्या बेटावरील शातो (महाल) द ईफ त्याचप्रमाणे युद्धकाळात अत्यल्प नुकसान झालेले ला मेजर चर्च व आठ घुमट असलेले प्रचंड बायझंटिन कॅथीड्रल ही पर्यटकांचे सहज लक्ष वेधून घेतात.

शहरात विज्ञानविषयक विद्यालये, विद्यापीठ, संशोधनसंस्था, संग्रहालये, रुग्णालये इ. आधुनिक शहराची सर्व वैशिष्ट्ये आहेत.

मार्सेचे जुने रहिवासी इतर फ्रेंचापेक्षा स्वतंत्र वृत्तीचे विशिष्ट अनुनासिक सुरात बोलणारे असत. आता ही वैशिष्ट्ये कमी होऊन सरमिसळ वस्ती झाली आहे.

मार्सेची नगरपालिकीय परिषद, शहराची अपूर्व वाढ होत असतानाच आपली उद्याने, बालक्रिडांगणे, विशिष्ट वास्तू वगैरेंची कसोशीने जपणूक करीत असते. प्रचंड औद्योगिकीकरणाबरोबरच आधुनिक शहराच्या व बंदराच्या सर्व सोयी-समस्या असलेले वर्धिष्णू महानगर, असे आधुनिक मार्सेचे स्वरूप आहे.

 

कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate