अमेरिकेच्या अँलाबॅमा राज्यातील सर्वात मोठे शहर, जेफर्सन काउंटीचे मुख्य ठिकाण व लोखंड-पोलाद उद्योगाचे केंद्र. लोकसंख्या ३,०६,९१० (१९७०). हे शहर मंगमरीच्या उत्तरेस सु. १६१ किमी. अंतरावर ⇨ अँपालॅचिअन पर्वताच्या दक्षिण टोकाकडील जोन्स व्हॅलीमध्ये वसलेले आहे. १८१३ मध्ये ‘एलिटन लँड कंपनी’ मार्फत येथे पहिली वसाहत होऊन एलिटन (सध्या शहराचाच एक भाग) हे १८२१ मध्ये काउंटीचे मुख्य ठाणे बनले. १८७० च्या सुमारास लोखंड, कोळसा इत्यादींच्या विपुल साठ्यांमुळे तसेच रस्ते व लोहमार्ग याच्यां केंद्रीकरणामुळे येथील वसाहतीची वाढ झाली. १८७१ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली, परंतु १८७३ च्या विषमज्वराच्या साथीने अनेक वसाहतकार मृत्यू पावले.
लोखंड, कोळसा, चुनखडी आणि इतर नैसर्गिक खनिजांनी या शहराचा परिसर समृद्ध असल्याने १९१० नंतर याची झपाट्याने वाढ झाली. येथील लोखंड-पोलाद उद्योगामुळे वास इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहराचे नाव देण्यात आले. येथे ग्रॅफाइट, संगमरवर, बॅराइट, बॉक्साइट, पायराइट, व्कॉर्टझ इ. खनिजांचेही विपुल साठे आहेत. कच्चे लोखंड आणि पोलाद यांपासनू तयार होणाऱ्या मालाचे येथे अधिक प्रमाणात उत्पागन होत असून त्यांत प्रामुख्याने स्टोव्ह, तारा बनविणे, गज, बोल्ट, लोखंडी टाक्या, यंत्रसामग्री, मालमोटारी यांचा समावेश होतो. सांप्रत औद्योगिकीकरण प्रवृत्तीत विविधता आली असून विमाने, ॲसिटिलीन, लाखेच्या कांड्या, मेण, ग्लिसरीन, सिमेंट, रसायने इत्यादींचेही उत्पादन होते. हे शहर मेक्सिकोच्या आखाताशो कालव्याने जोडल्यामुळे मालाची ने-आण सुलभ झाली आहे.
बर्मिंगहॅम सदर्न माहविद्यालय (मेथडिस्ट-स्था. १८९८), डॅनिएल पेन महाविद्यालय (१८८९), माइल्स महाविद्यालय (१९०७) इ. अनेक उच्च शैक्षणिक संस्था येथे आहेत. अँलाबॅमा विद्यापीठाशी संलग्न अशी अनेक वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालये शहरात असून अँलाबॅमा विद्यापीठाची एक शाखाही येथे आहे. सदर्न रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या खाजगी संस्थेत ३०० हून अधिक शास्त्रज्ञ नवीन संशोधनात-प्रामुख्याने कर्करोगावरील-गुंतलेले आहेत.
बर्मिंगहॅम शहराला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक दृष्टयाही महत्त्व आहे. सार्वजनिक वाचनालयाचे मुख्यालय व १६ उपशाखा येथे आहेत. ‘बर्मिंगहॅम म्यूझीयम ऑफ आर्ट’ या नव्याने बांधलेल्या कलावीथीत प्रबोधनकालीन चित्रे तसेच २० लक्ष डॉ. किंमतीचा सॅम्युएल एच्. क्रेस चित्रसंग्रह आहे. शहरात सिंफनी ऑर्केस्ट्रा, बॅले आणि अनेक नाट्यसंस्था कार्यरत आहेत. येथील ६५ सार्वजनिक उद्यानांनी सु. ६२७ हे. जागा व्यापली असून वनस्पति उद्यान व जपानी पद्धतीचे बगिचे प्रेक्षणीय आहेत. दरवर्षी शहरात कला प्रदर्शने भरविण्यात येतात.
अमेरिकेच्या यादवी युद्धाआधी बांधलेला बर्मिंगहॅम राजवाडा आता सर्वांसाठी खुला आहे. संपूर्ण शहरातून कोठूनही दिसणारा रेड मौंटनवरील ‘व्हल्कन’ या रोमन अग्निदेवाचा १७ मी. उंचीचा भव्य पुतळा जणू काही शहराच्या लोखंड-पोलाद उद्योगाचे प्रतीकच वाटतो. काळ्या-गोऱ्यांतील वर्णविरोध हा या शहरातील एक सततचा प्रश्र्न असून अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचा निग्रो नेता ⇨मर्टिन ल्यूथर किंग याने येथेच काही वर्णविरोधी मोहिमा उभारल्या होत्या. शहरातील सार्वजनिक ठिकाणे व शाळ यांतून वर्णभेद नष्ट करण्यात आला आहे. हवा-प्रदूषणाच्या संकटकाळात (१९७१) अमेरिकन सरकारच्या कायद्यामुसार आपले उद्योगधंदे संपूर्णतः बंज ठेवणारे बर्मिंगहॅम हे पहिलेच शहर होय.
लेखक - सुलभा कापडी
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/21/2020
मार्से : फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व...
कराची : पाकिस्तानचे सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या उप...
कॅसाब्लांका : (अरबी अल् बीदा) मोरोक्कोचे अटलांटिक...