অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ल्वार नदी

ल्वार नदी

ल्वार नदी

फ्रान्समधील सर्वाधिक लांबीची नदी. लांबी १,०२० किमी. जलवाहन क्षेत्र १,२०,९०० चौ. किमी. फ्रान्सच्या एकपंचमांशपेक्षा अधिक क्षेत्राचे जलवाहन या नदीमुळे केले जाते. दक्षिणेकडील मासीफ सेंट्रल पर्वतश्रेणीत सस.पासून १,३७० मी. उंचीवर ही उगम पावते. उगमापासून ती सामान्यपणे उत्तरेस पॅरिस द्रोणीकडे वाहत जाते. ऑर्लेआंनंतर एक मोठे वळण घेऊन ती समृद्ध द्राक्षमळ्यांच्या प्रदेशातून पश्चिमेस अटलांटिक महासागाराकडे वाहत जाते. नँट्सपासून नदीमुखखाडीला सुरुवात होत असून सँ नाझेर येथे ती बिस्के पसागरास मिळते.

रच्या टप्प्यात नदीने काही निदऱ्या निर्माण केल्या आहेत. ॲलये ही उपनदी मिळाल्यानंतरचा तिचा विस्तारित प्रवाह जेव्हा बेरी प्रदेशातील चुनखडकयुक्त मंचामधून वाहू लागतो, तेव्हा तिची दरी अगदी पन्हाळीसारखी दिसते. मधल्या टप्प्यातील नदीचे पात्र उथळ, परंतु उभे काठ असलेले आहे. पंधराव्या व सोळाव्या शतकांत ल्वारचा मधला टप्पा नगदी पिकांसाठी विशेष प्रसिद्ध होता. अठराव्या शतकात फ्रेंच क्रांतिपूर्वकाळात हा भाग विकासाच्या शिखरावर पोहोचला होता.

ल्वारला शंभरांवर उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी न्येव्र्ह, मेन, ॲर्द्र या उजव्या तीरावरील, तर ॲलये, शेअर, अँद्र, व्हेन व सेव्र्हनँतेझ या डाव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत. वेगवेगळ्या ऋतूंमधील नदीतील पाण्याच्या पातळीत खूपच तफावत आढळते. त्यामुळे नदीला समांतर दिशेत काढलेल्या कालव्यांचा जलवाहतुकीसाठी उपयोग केला जातो. कालव्यांच्या साहाय्याने ल्वार नदी ऱ्होन, सेन व यॉन नद्यांशी जोडली आहे.

सेन नदीशी जोडल्याने पॅरिसशी व्यापारी वाहतूक होऊ लागली. नँट्सपर्यंत मोठी जहाजे येऊ शकतात. ल्वार खोऱ्यातील ह्वामान समशीतोष्ण कटिबंधीय स्वरूपाचे आहे. सलग असा कोरडा ऋतू नसतो. वृष्टीचे प्रमाण बरेच असते. हिवाळ्यात वरच्या टप्प्यातील उच्चभूमीच्या प्रदेशात हिमवृष्टी होते.

शरद ऋतूत भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या तीव्र वादळाच्या प्रभावाखाली नदीचा शीर्षप्रवाह येतो. सामान्यपणे हिवाळ्याच्या उत्तरार्धात नदीला भरपूर पाणी असते. कोणत्याही महिन्यात तिला पूर येऊ शकतात. मात्र जुलै व ऑगस्टमध्ये पुराची शक्यता फारच कमी असते. नदीच्या खोऱ्यात फ्रान्समधील जवळजवळ सर्व प्रकारची शेती व उद्योगधंदे आढळतात.

र्लेआं व टूर्स यांदरम्यानच्या ल्वार नदीकाठावर अनेक सुंदर हवेल्या आहेत. त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. हाच प्रदेश काही वेळा ‘फ्रान्सचे उद्यान’ म्हणून ओळखला जातो. कारण हा प्रदेश द्राक्षमळे व फळबागा यांनी समृद्ध आहे.

नँट्स, टूर्स, ब्लवा, ऑर्लेआं, झीअँ, नव्हेर, रन, आंब्वाझ, सोमर, अँजर्स, सँ नाझेर ही नदीकाठवरील प्रमुख शहरे आहेत. काठावरील बरीचशी शहरे गजबजलेली बंदरे आहेत. नँट्स व सँ नाझेर येथे जहाजबांधणी उद्योग चालतो.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate