অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कराची

कराची

कराची

पाकिस्तानचे सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या उपनगरांसह ३४,६९,००० (१९७२). हे ल्यारी व मलिर ह्या नद्यांमधील भूशिराच्या टोकावर असून पाकिस्तानचे सर्वोत्तम बंदर आहे. समुद्रातील एका खडकाळ रांगेच्या टोकावरील मनोरा नावाच्या उंच टेकाडामुळे कराची बंदराला सुरक्षितता लाभली व त्याची झपाट्याने वाढ झाली.

मनोऱ्याचे खडक व मुख्य भूमी यांमधील खारकच्छातील गाळ प्रवाहामुळे आपोआप निघून जातो, हे कराची बंदराचे एक नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. कराची सिंधूच्या मुखाच्या वायव्येस असून मुंबईपासून ८८० किमी. व दिल्लीपासून १,०५६ किमी. दूर आहे. सुएझमार्गे ते लंडनहून फक्त ९,७२५ किमी. दूर असल्यामुळे यूरोपला या बाजूचे सर्वांत जवळचे बंदर आहे. अफगाणिस्तान, मध्य आशिया यांनाही ते सोयीचे आहे. येथे जूनचे तपमान ३२० से. व जानेवारीचे १४० से. असते. पाऊस २० सेंमी. पडतो.

अठराव्या शतकाच्या पूर्वी कराचीचा कोठेही उल्लेख नाही. १७२५ च्या आसपास हब नदीच्या मुखाजवळ खराकला लहानसे बंदर होते. ते गाळाने भरल्याने तेथील वस्ती जवळच कलाचीकूनला हलली व भूशिराच्या टोकावर किल्ला बांधून लोक राहू लागले. कलाचीकूनच्या परिसरातच हल्लीचे कराची शहर असून कराची नावही कलाचीकूनच्या अपभ्रंशाने पडलेले दिसते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कराची तालपूरच्या मिरांच्या ताब्यात होते.

१८४३ मध्ये ब्रिटिशांनी सिंध प्रांत जिंकला, तेव्हा सर चार्ल्‌स नेपिअरच्या प्रयत्नाने कराचीची झपाट्याने वाढ झाली. १८६५ च्या अमेरिकेतील यादवी युद्धाने तिकडील कापूस इंग्लंडला मिळणे दुरापास्त झाल्याने भारतीय कापूस मुंबई व कराची बंदरांतून लँकाशरला निर्यात होऊ लागला व कराची बंदराचे

महत्त्व वाढले. १९३५ च्या कायद्याने सिंध प्रांत मुंबईपासून वेगळा काढण्यात आल्यावर साहजिकच नव्या प्रांताची राजधानी कराचीला ठेवण्यात आली व कराचीचे महत्त्व आणखी वाढले. १९४७ मध्ये पाकिस्तानची राजधानी होण्याचा मान मिळल्यामुळे कराचीच्या वैभवात भर पडली; पण त्याबरोबर अनेक समस्यांनाही तोंड देणे भाग पडले.

केंद्र सरकारच्या विविध कचेऱ्या, परदेशीय वकिलाती व हजारो निर्वासितांचे आगमन यांमुळे निवासस्थानांचा प्रश्न तर बिकट झालाच, पण पाणीपुरवठा व आरोग्यविषयक तरतुदी करणेही दुरापास्त झाले. १९६० साली रावळपिंडीला राजधानी हलविण्यात आल्याने कराचीवरील ताण काहीसा कमी झाला, पण कराचीचे महत्त्व कमी झाले नाही. काही सरकारी कचेऱ्याही कराचीलाच राहिल्या.

व्यापार, उद्योगधंदे व शिक्षण या क्षेत्रांतही कराचीला पाकिस्तानी जीवनात विशेष महत्त्व आहे. उत्कृष्ट बंदरामुळे व ड्रिगच्या आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेल्या हवाईतळामुळे पाकिस्तानचा बराच आयातनिर्यात व्यापार कराचीहून चालतो. रेल्वेने पंजाबला जोडलेले असल्याने आयात माल चटकन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो.

येथून गहू, धान्ये, तेलबिया, कापूस, कातडी, कच्ची लोकर इत्यादींची निर्यात होते व पोलादी माल, यंत्रे, सुती कापड, पेट्रोलियम, कोळसा, साखर वगैरेंची आयात होते. कराचीचे आंतरराष्ट्रीय महत्त्व जाणून आणि बंदराची व हवाईतळाची विकसनक्षमता लक्षात घेऊन जागतिक बँकेने ड्रिगच्या विमानतळाच्या विकासासाठी १५ कोटी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे.

द्योगिक शहर म्हणूनही कराची प्रसिद्ध असून येथे कापसाचे, रेशमी व लोकरीचे कापड तयार होते. सिमेंट, औषधे, कौले, विजेचीविविध उपकरणे, लोखंडी सामान, ग्रामोफोनच्या तबकड्या, मीठ, रसायने, काड्यापेट्या, कातडी सामान, काच, सायकलींचे भाग इ. विविध उत्पादन येथील कारखान्यांत होते. मातीची व धातूची भांडी, सतरंज्या व गालिचे, कापड इ. हातमालही होतो.

शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्याही कराचीचे महत्त्व कमी नाही. अनेक तांत्रिक शिक्षण शाळा, माध्यमिक शाळा व कराची विद्यापीठ यांमुळे सर्व शाखांच्या शिक्षणाची सोय येथे आहे.

विधिमंडळाची इमारत, सचिवालय न्यायकचेऱ्या, महानगरपालिका इ. प्रमुख इमारती व बँका, विमा कंपन्या, अनेक जहाज कंपन्या, विमान कंपन्या व व्यापारी कंपन्यांच्या मुख्य कचेऱ्या कराचीला असल्याने येथील जीवन नेहमी गजबजलेले असते. कराची वस्तुसंग्रहालयात महत्त्वाच्या प्राचीन अवशेषांचा मौलिक साठा आहे. १९७१ च्या भारत-पाक संघर्षात कराची बंदराची खूप हानी झाली. पाकिस्तानचे जनक महंमद अली जिना यांचे कराची हे जन्मस्थान होय.


ओक, द. ह

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate