चौ एन-लाय : चीन प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान. जिआंगसू प्रांतातील वाइआन या गावात एका सधन कुटुंबात जन्म. लहानपणीच आईवडील निवर्तल्यानंतर त्याच्या चुलत्याने त्याचा सांभाळ केला. त्याचे प्राथमिक शिक्षण मूकडेन येथे झाले. चौदाव्या वर्षी तिन्त्सिन येथील नानकाई मिडल स्कूलमध्ये तो दाखल झाला. विद्यार्थिदशेत चिनी बंडखोरांच्या कथांचा परिणाम होऊन त्याची प्रवृत्ती बंडखोर बनली. १९११-१२ साली चीनमध्ये जी राज्यक्रांती झाली, त्या क्रांतीकारक वातावरणाचा त्याच्या मनावर मोठाच परिणाम झाला. १९१७ मध्ये पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो टोकिओ येथील वासेडा विद्यापीठात गेला. १८ महिन्यांतील तेथील वास्तव्यात त्याचा अनेक चिनी क्रांतीकारक तरुणांशी परिचय झाला. तेथून तो परत तिन्त्सिन येथील नानकाई विद्यापीठात आला. दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या १९१९ च्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्याला तुरुंगवास भोगावा लागला. या सुमारास त्याचा तेंग यिंग-चाओ या तरुणीशी परिचय होऊन पुढे १९२५ मध्ये तो विवाहबद्ध झाला. त्याची पत्नी ही त्याच्या चळवळीत सहभागी असे.त्याला मूलबाळ नव्हते. या काळात चौने ‘अवेकनिंग सोसायटी ’ या नावाची विद्यार्थ्यांची संस्था स्थापन केली. त्याने मार्क्सचे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, काउटस्कीचा क्लास स्ट्रगल,ऑक्टोबर रेव्होल्युशन इ. ग्रंथांचा अभ्यास केला. त्याला फ्रेंच, इंग्रजी व रशियन या तीन भाषा अवगत होत्या.
जिनीव्हा (१९५४) व बांडुंग (१९५५) ह्या परिषदांत त्याने कम्युनिस्ट चीनचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय त्याची भारतभेट आणि भारत-चीन सीमा संघर्ष व रशिया-चीन वैचारिक संघर्ष इ. घटनांतील भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. १९५८ मध्ये परराष्ट्रखाते त्याने सोडून दिले; तथापि जागतिक राजकारणाच्या संदर्भात चीनचा प्रमुखप्रवक्ता तोच होता. १९६१ मधील मॉस्को येथील बाविसाव्या कम्युनिस्ट अधिवेशनात, त्याचे ‘पाश्चात्त्य साम्राज्यशाहीबरोबर शांततामय सहजीवन’ या तत्त्वावरून सोव्हिएट नेत्यांबरोबर मतभेद झाले; तेथपासून चीन-रशिया मैत्रीचे संबंध दुरावले. चीनमध्ये माओ-त्से-तुंगच्या खालोखाल त्याचेच स्थान होते. साम्यवादी पक्षातील त्याच्या कामगिरीबद्दल त्याला जनरल हा बहुमानाचा किताब देण्यात आला. कॅन्सरने त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Hsu Kai-yu, Chou En-lai : China's Gray Eminence, New York, 1968.
2. Li Tien-Min, Chou En-lai, 1970.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
इझ्राएलचा शिल्पकार, पहिला पंतप्रधान व प्रसिद्ध मु...
फ्रेंच मुत्सद्दी, फ्रान्सचा पंतप्रधान व जागतिक शां...
इझ्राएलचा एक शिल्पकार, मुत्सद्दी व चौथा पंतप्रधान ...
स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान व ब्रह्मी स्...