गोल्डा मेअर : (३ मे १८९८–८ डिसेंबर १९७८). इझ्राएलचा एक शिल्पकार, मुत्सद्दी व चौथा पंतप्रधान (कार. १९६९–१९७४). मूळ गाव गोल्डी मॅबोव्ह्यिच. जन्म कीएव्ह (यूक्रेन) येथे. नंतर त्यांचे कुटुंब मिलवॉकी (विस्कॉन्सिन) येथे स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथेच झाले. नंतर अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयात शिकत असतानाच, मॉरिस मेअरसोन यांच्याशी त्यांचा विवाह झाला (१९१७). पुढे शिक्षकी पेशा पतकरल्यावरही त्या मिलवॉकी येथील ज्यू मजूर पक्षाचे काम करीत असत. १९२१ मध्ये पतीसह पॅलेस्टाईन येथे त्या स्थायिक झाल्या. तेथील हिस्टाड्रट या प्रमुख कामगार संघटनेतील स्त्री-कामगार आघाडीच्या नेत्या म्हणून तसेच अमेरिकेतील ‘पायॉनिअर वुमन’ या संघटनेचे काम त्या पाहू लागल्या (१९२८–३२). १९२९ नंतर त्यांना जागतिक ज्यू संघटनेच्या अनेक मंडळांवर प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आले.
१९४० मध्ये हिस्टाड्रटच्या राजकीय समितीवर त्यांची नेमणूक झाली. १९४६ मध्ये ब्रिटिशांनी ज्यू राजकीय समितीचे प्रमुख मोशे शेरएट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली, तेव्हा गोल्डा मेअर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. इझ्राएलला स्वातंत्र्य जाहीर होईपर्यंत (१४ मे १९४८) त्या राजकीय समितीच्या प्रमुख होत्या. तसेच इझ्राएलच्या स्वातंत्र्य जाहीर करणाऱ्या मसुद्यावर सही करणाऱ्या समितीतील त्या एक प्रमुख सदस्या होत्या. इझ्राएलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रशियात इझ्राएलच्या राजदूत म्हणून त्याची नियुक्ती झाली (१९४८–४९). १९४९ मध्ये इझ्राएलच्या विधिमंडळावर त्या निवडून आल्या. प्रथम कामगार मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली (१९४९–५६). या काळात त्यांनी इझ्राएलचे अंतर्गत प्रश्न विशेषतः घरबांधणी व रस्तेबांधणी योजना, स्थलांतरित निर्वासितांच्या नोकरीचे प्रश्न इ. यशस्वीपणे हाताळले. १९५६ मध्ये मोशे शेरएट यांच्याकडून परराष्ट्रमंत्रिपदाची सूत्रे त्यांनी हातात घेतली. या पदावर असताना आफ्रिकन राष्ट्रांशी त्यांनी राजकीय आणि आर्थिक हितसंबंध प्रस्थापित केले. या पदावर असतानाच त्यांनी आपल्या मूळ नावाचे गोल्डा मेअर असे हिब्रूकरण केले.
निवृत्त झाल्यावर आणि ‘मापाई’ या राष्ट्रीय कामगार पक्षाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर, पक्षातील अंतर्गत मतभेद मिटविण्यास तत्कालीन पंतप्रधान लीव्ही एशकॉल यांना त्यांनी बहुमोल साहाय्य केले. लीव्ही एशकॉल यांच्या मृत्यूनंतर त्या इझ्राएलच्या पंतप्रधान झाल्या (१९६९). पंतप्रधानपदी असताना त्यांनी मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. अंतर्गत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला चौथ्या अरब-इझ्राएल युद्धामुळे (१९७३) खीळ बसली. या अडचणीच्या परिस्थितीतही मेअर यांनी संयुक्त आघाडीचे सरकार बनवले आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला (१० एप्रिल १९७४). तरीही काळजीवाहू सरकारच्या प्रतिनिधी म्हणून जून १९७४ पर्यंत त्यांनी काम पाहिले. निवृत्त झाल्यावरही त्यांचा राजकीय प्रभाव कायम होता. जेरुसलेम येथे त्यांचे निधन झाले. माय लाईफ हे त्यांचे आत्मचरित्र १९७५ मध्ये प्रसिद्ध झाले.
लेखक - भाग्यश्री पंडित
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/25/2020
थोर भारत सेवक व पुण्याच्या प्रसिद्ध ‘सेवासदन’ संस्...
प्रख्यात इंग्लिश शिल्पकार. न्यूयॉर्क येथे जन्म.
आधुनिक काळातील प्रसिद्ध महाराष्ट्रीय शिल्पकार.
प्रख्यात आधुनिक रूमानियन शिल्पकार.