অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डेव्हिड बेन-गुरिआन

डेव्हिड बेन-गुरिआन

डेव्हिड बेन-गुरिआन : (१६ ऑक्टोबर १८८६-१ डिसेंबर १९७३). इझ्राएलचा शिल्पकार, पहिला पंतप्रधान व प्रसिद्ध मुत्सद्दी.  पोलंडमधील प्वॉन्यस्क या गावी सधन घराण्यात जन्म. त्याच्या वडिलांचे नाव आव्हिगदोर व आईचे शेइंदेल ग्य्रून. वडिलांचा वकिलीचा व्यवसाय होता. ज्यू पद्धतीनुसार त्याने पारंपरिक शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेपासून त्याचा ओढा ज्यू राष्ट्रवादाकडे होता. तुर्की हत्याकांडाच्या काळात तो पोलंडमधून पॅलेस्टाइनमध्ये गेला (१९०६) व मजुरी करून फावल्या वेळात ज्यूराष्ट्रवादाचा प्रसार व त्यासाठी लेखन करू लागला. द युनिटी (इं. भा.) या पक्षाच्या साप्ताहिकातून तो स्वातंत्र्यासंबंधी लेख प्रसिद्ध करी. पुढे त्याचा तो संपादकही झाला परिणामतः तुर्कांनी त्याची १९१५ मध्ये हकालपट्टी केली. तेव्हा अमेरिकेचा आश्रय घेऊन तिथे त्याने ज्यू-सेना संघटित केली व ज्यू स्वातंत्र्यासंबंधीची भूमिका तो सर्वांना पटवून सांगू लागला. या सुमारास तिथे त्याने पाउला म्यूनविस या ज्यू प्रशिक्षिकेशी विवाह केला (१९१७). तिच्यापासून त्यास तीन मुलगे व दोन मुली झाल्या लग्नानंतर तो ईजिप्तमध्ये गेला.

१९२१-१९३५ च्या दरम्यान ज्यू मजदूर संघाचा तो प्रमुख सचिव होता आणि त्यातून पुढे त्याने ज्यू मजूर पक्षाची (मापाई) स्थापना केली. तिचा तो अध्यक्ष झाला (१९३५). ह्या वेळी त्याने इझ्राएल हे स्वतंत्र राष्ट्र असावे, अशी जोरदार जळवळ सुरू केली. आपल्या चळवळीस ब्रिटिशांचा पाठिंबा मिळावा, म्हणून त्याने डेव्हिड बेन-गुरिआन ब्रिटिशांना सहकार्य देण्याचे धोरण अवलंबिले आणि दुसऱ्या महायुद्धकाळात आपल्या सेनेची ब्रिटिशांना मदत दिली. तथापि ब्रिटिशांनी ज्यू लोकांच्या स्थलांतरावर बंदी घातली. तेव्हा त्याने त्यांच्याशी लढा पुकारला. पुढे जागतिक दडपणामुळे ब्रिटन व इतर पाश्चिमात्त्य राष्ट्रांची त्यास सहानुभूती मिळाली. परिणामतः १४ मे १९४८ रोजी इझ्राएल हे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झाले. त्यांचा पहिला पंतप्रधान व संरक्षण मंत्री म्हणून (१९४८-५३) त्याची निवड झाली. मध्यंतरीचा अल्पकाळ (१९५३-५५) सोडता १९६३ पर्यंत तो पंतप्रधान होता. पक्षातील मतभेदांमुळे त्याने १९६३ मध्ये राजीनामा दिला; पण सक्रिय राजकारणातून तो निवृत्त झाला नाही.

या तेरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने इझ्राएल नव राष्ट्राची उभारणी करून ते एक आधुनिक, सुसंस्कृत व लष्करी दृष्ट्या सुसज्ज राष्ट्र बनविले. भिन्न विचारसरणींच्या पक्षोपक्षांचे संयुक्त शासन राबवून इझ्राएलचा सर्वांगीण विकास साधणे आणि पौर्वात्य व पाश्चिमात्त्य ज्यूंमधील अंतर्गत संघर्ष मिटवून ज्यू एकात्मता टिकविणे व त्याच वेळी धर्मावर अढळ श्रद्धा असणारे व धर्मनिरपेक्ष यांमधील सुवर्णमध्य साधणे, हे त्याच्या अंतर्गत धोरणाचे प्रमुख सूत्र होते. अरब राष्ट्रांवर वर्चस्व आणि त्याकरिता अमेरिका-इंग्लंडादी देशांशी दृढ मैत्री करून इझ्राएलला लष्करी दृष्ट्या बलवान करणे, हे त्याच्या परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र होते. अंतर्गत बाबतीत तो थोडासा डावीकडे झुकल्याचे आढळून येते.

ज्यू राष्ट्रवाद, इझ्राएल व ज्यू समाज यांविषयीचे आपले मौलिक विचार त्याने ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. त्याच्या पुस्तकांपैकी रीबर्थ अँड डेस्टिनी ऑफ इझ्राएल (१९५४), इझ्राएल : यिअर्स ऑफ चालिंज (१९६५), इझ्राएल्स सिक्युअरिटी (१९६०), द ज्यू इन देअर लॅण्ड (१९६६), इझ्राएल : ए पर्सनल हिस्टरी (१९७१), रिकलेक्शन्स (१९७२) आणि माय टॉक्स विथ द अरब्ज (१९७२) ही प्रसिद्ध आहेत. रिकलेक्शन्समध्ये आत्मवृत्त निवेदन केले असून झाय्निझमचा इतिहास त्यात आढळतो. अखेरच्या दिवसांत त्याने मापाई पक्षातील असंतुष्ट गटाला घेऊन ‘रफी’ नावाचा नवीन पक्ष स्थापन केला (१९६५). पत्नीच्या मृत्यूनंतर (१९६८) तो खचला आणि त्यानंतर तो लवकरच तेल आवीव्ह येथे मरण पावला. त्याने किबुत्सवर आधारलेल्या सहकारवादी समाजवादाचा पुरस्कार केला.

 

संदर्भ :

1. Avi-hai, Avraham, Ben-Gnrion-State-Builder : Principles and Pragmatism, Jerusalem, 1974.

2. Edelman, Maurice, David, the Story of Ben-Gurion, New York, 1965.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate