आरीस्तीद ब्रीआं : (२८ मार्च १८६२ - ७ मार्च १९३२). फ्रेंच मुत्सद्दी, फ्रान्सचा पंतप्रधान व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. आरीस्तीद ब्रीआंआरीस्तीद ब्रीआं नँट्स (पश्चिम फ्रान्स) येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण नँट्स येथे. पुढील शिक्षण पब्लिक स्कूलमध्ये घेऊन त्याने पॅरिस येथे कायद्याचे शिक्षण घेतले व वकिलीस सुरुवात केली. कामगारांचे हक्क, संप व इतर राजकीय घडामोडी यांविषयींची मते तो द पीपल (इं. भा.), लॅटर्न (इं.भा.), रिपब्लिक (इं.भा.) या नियतकालिकांतून प्रखरपणे मांडत असे. नँट्स येथील कामगारांच्या काँग्रेसमध्ये (१८९४) ‘सार्वत्रिक (जनरल) संप’ हे प्रभावी राजकीय तंत्र आहे, ही गोष्ट त्याने फ्रेंच समाजवादी नेत्यांना पटवून दिली; परंतु त्यामुळे नेमस्त समाजवादी व जहाल मार्क्सवादी यांच्यातील मतभेद आणखी वाढले. ब्रीआंने संसदेच्या तीन निवडणुकांत (१८८९, १८९३ व १८९८) अपयश मिळाल्यानंतर समाजवादी पक्षाचे सरचिटणीसपद स्वीकारले (१९०१). त्यानंतरच्या निवडणुकीत तो ल्वार प्रांतातून संसदेवर निवडून आला आणि पुढे अखेरपर्यंत तो संसदेचा सदस्य होता (१९०२ - ३२). या काळात त्याने पंतप्रधान (११ वेळा), परराष्ट्रमंत्री (१४ वेळा), शिक्षण मंत्री इ. उच्च पदांवर काम केले. या २६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्याने अनेक लक्षणीय सुधारणा केल्या आणि कामगारांचे हित जपले.
सुरुवातीस त्याने चर्च आणि शासनसत्ता यांचे विभाजन करणाऱ्या अधिनियमाचा मसुदा तयार केला (१९०५). या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची मंत्री म्हणून नियुक्ती झाली (१९०६). त्याच्याकडे शिक्षण व धार्मिक बाबी ही खाती सुपूर्द केली. आपल्या पहिल्या पंतप्रधानकीच्या कारकीर्दीत (१९०९ - १०) त्याने राष्ट्राला भेडसावणारा संकल्पित रेल्वे कर्मचारी संप कणखरपणे आणि अत्यंत कौशल्याने हाताळला. द हेग येथील जागतिक लवाद न्यायालयाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या मार्से येथील अटकेनंतर त्यांच्या राजकीय आश्रय हक्काविरुद्ध निकाल दिला. त्याचा ठपका ब्रीआंवर ठेवण्यात आला. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या त्याच्या अयशस्वी ठरावामुळे त्यास संसदेत पराभव पतकरावा लागला. त्यामुळे २७ फेब्रुवारी १९११ रोजी त्याने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. झां सॅरिन याच्या बूर्झ्वा म्हणून मानल्या गेलेल्या मंत्रिमंडळात त्याने मंत्रिपद स्वीकारल्यामुळे समाजवादी पक्षातून त्याची हकालपट्टी करण्यात आली.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी फ्रान्सला बाल्कन युद्धात अपयश आले, त्या वेळी तो परराष्ट्रमंत्री होता. सुमारे तीन चार वर्षे सामूहिक सुरक्षा या संकल्पनेचा त्याने पुरस्कार केला आणि राष्ट्रसंघ या जागतिक संस्थेने हिरिरीने समर्थन केले. १९२१ मध्ये तो पुन्हा काही काळ पंतप्रधान होता. आंतरराष्ट्रीय शांतता व सहकार्य यांचा पुरस्कार करण्यासाठी त्याने जर्मनीशी परस्पर सहकार्यासाठी परिश्रमपूर्वक एक स्वतंत्र ⇨लोकानों करार (१९२५) घडवून आणला आणि जर्मनी व त्याचे महायुद्धातील शत्रू यांतील संबंध सुधारण्याचा यत्न केला. तसेच अमेरिकेच्या फ्रँक बिलिंग्ज केलॉग या परराष्ट्रीय सचिवाच्या मदतीने युद्ध न करण्याचा ऐतिहासिक केलॉग-ब्रोआं करार (२७ ऑक्टोबर १९२८) अंमलात आणून सु. ६० देशांना त्यात गोवले व युद्ध न करण्याचे धोरण या देशांनी कृतीत आणावे, असे आवाहन केले. अमेरिकेच्या स्वतःपुरतेच पाहण्याच्या वृत्तीमुळे हा करार पुढे अयशस्वी झाला; तथापि या शांतता कार्याबद्दल जर्मनीचा परराष्ट्रमंत्री गुस्टाव्ह श्ट्रेझमानबरोबर त्याला जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले (१९२६).
यूरोपमध्ये सहजीवन, सहकार्य व शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून त्याने अखेरच्या दिवसांत फेडरल युनियन ऑफ यूरोपची कल्पना मांडून तिचा प्रसार केला. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील एक तडफदार संसदपटू, यूरोपीय शांततेचा पुरस्कर्ता व प्रभावी वृत्तपत्रकार म्हणून त्याने केलेले कार्य संस्मरणीय आहे. नॉर्मंडी (फ्रान्स) येथे तो मरण पावला.
संदर्भ : Ferrell, R. H. Peace in Their Time, New York, 1969.
लेखक - रुक्साना शेख
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अमेरिकन शांततावादी नेत्या आणि शांततेच्या नोबेल पा...
इटालियन पत्रकार व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषि...
स्वीडनचा पंतप्रधान (१९२०; १९२१ - २३ व १९२४ - २५) ...
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल ...