অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एमिली ग्रीन बॉल्च

एमिली ग्रीन बॉल्च

एमिली ग्रीन बॉल्च : (८ जानेवारी १८६७ - ९ जानेवारी १९६१). अमेरिकन शांततावादी नेत्या आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या सहमानकरी. जन्म बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे. ब्रिन मार महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर (१८८९) बॉस्टनमध्ये डेनिसन हाउस सेटल्‌मेंट आणि स्त्रियांची कामगार संघटना या संस्था स्थापन करण्यात त्यांनी प्रामुख्याने भाग घेतला. राज्य विधिमंडळात पहिल्यांदाच मांडल्या जाणाऱ्या किमान वेतन विधेयकाचा मसुदा तयार करण्याचे बहुतेक श्रेय बॉल्चंना देण्यात येते. वेलस्ली महाविद्यालयात १८९६ पासून १९१८ पर्यंत त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचे अध्यापन केले. पहिल्या महायुद्धकाळात जेन ॲडम्झबरोबर शांततावाद्यांचा एक छोटा गट त्यांनी प्रथम स्थापन केला. याच गटाचे पुढे विमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडम या आंतरराष्ट्रीय संस्थेत रूपांतर करण्यात आले. या संस्थेच्या प्रारंभीच्या काळात त्या सचिव-खजिनदार होत्या (१९२१-२२ व १९३४-३५) आणि पुढे सन्मान्य अध्यक्षही झाल्या (१९३६).

पहिल्या महायुद्धात अमेरिकेने सहभागी होऊ नये, या मताचा त्यांनी जाहीरपणे पुरस्कार केला; परिणामतः महाविद्यालयातील प्राध्यापकपदाची नोकरी त्यांना गमवावी लागली (१९१८). अमेरिकेतील शांततावादी अनेक संघटनांत त्यांनी अनेक पदे भूषविली. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनी-जपानविरुद्ध लढा देण्यास अमेरिकेस त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला; पण युद्धसमाप्तीनंतर अमेरिकन सैन्यास हैती बेटावरून माघारी फिरण्यास त्यांनी सांगितले व त्यासाठी मोहीमही सुरू केली. जागतिक शांततेबरोबरच मूलभूत मानवी हक्कांचे रक्षण व्हावे, असा त्यांचा यामागे दृष्टिकोण होता. या त्यांच्या शांतता कार्याबद्दल १९४६ मध्ये जॉन रॉली मॉट (१८६५-१९५५) यांच्याबरोबर त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक विभागून दिले. मॉट हे अमेरिकन समाज कार्यकर्ते असून त्यांनी विद्यार्थी संघटनांच्या सहकार्याने पहिल्या महायुद्धातील जखमींची शुश्रुषा केली व आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले.

बॉल्च यांनी अविवाहित राहून शांतता कार्यात सर्व जीवन व्यतीत केले. त्या केंब्रिज (मॅसॅ.) येथे निधन पावल्या. बॉल्च यांनी आपले स्लाव्हिक आप्रवासी व जागतिक शांतता यांसंबंधीचे मौलिक विचार संभाषण-लेखनाद्वारे प्रकट केले. त्यांचे लेखन विपुल आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी आवर स्लाव्हिक फेलो सिटिझन्स (१९१०), विमेन ॲट द हेग (१९१५, ॲप्रोचिस टू द ग्रेट सेटल्‌मेंट (१९१८), रेफ्यूजिस ॲज ॲसेट्स (१९३९) इ. प्रसिद्ध असून फारच लोकप्रिय झाली.

 

लेखक - रुक्साना शेख

स्त्रोत  - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate