एर्नेस्तो ते ओदोरो मोनेअता : (२० सप्टेंबर १८३३–१० फेब्रुवारी १९१८). इटालियन पत्रकार व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. जन्म सामान्य कुटुंबात मिलान (इटली) येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर तो लष्करात भरती झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी ऑस्ट्रियन सत्तेविरुद्ध मिलान येथील नागरिकांनी केलेल्या स्वातंत्र्य उठावात त्याने सक्रिय भाग घेऊन (१८४८) मिलानला ऑस्ट्रियन सत्तेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर १८५९–६० दरम्यान त्याने मॅझिनी व जूझेप्पे गॅरिबॉल्डी यांच्या नेतृत्वाखालील इटलीच्या एकत्रीकरणासाठी चाललेल्या गनिमीलढ्यात भाग घेतला. तत्पूर्वी पालाव्हीचीनो या देशभक्ताने चालविलेल्या गुप्तसंघटनेतही तो सहभागी झाला होता. पुढे तो इटालियन सैन्यात रीतसर प्रविष्ट झाला आणि त्याने सैन्यातील अनेक पदे भूषविली. १८६६ च्या कूस्टॉट्सा येथील लढाईत त्याच्या लष्करी कौशल्याची आणि मुत्सद्देगिरीची झलक दृष्टोत्पत्तीस आली. परंतु लष्कर व लढाईतील अनुभवाने उपरती होऊन त्याने पुढील आयुष्यात युद्धविरोधी मोहिम आरंभली आणि उर्वरित आयुष्य जागतिक शांततेचा पुरस्कार व प्रसार करण्यात व्यतीत केले. त्याकरिता त्याने सैन्यातील नोकरीचा राजीनामा देऊन (१८६७) एल् सेकोलो (मिलान) या लोकशाहीवादी वृत्तपत्राचे प्रमुख संपादकपद स्वीकारले. या पदावर जवळजवळ ३० वर्षे त्याने काम केले (१८९६).
शांतता प्रस्थापित करावयाची म्हणजेच पर्यायाने युद्धविरामाचेच मार्ग शोधले पाहिजेत. या विचारातूनच त्याने इटालियन पीस सोसायटी-द लीग ऑफ पीस अँड ब्रदरहूड (१८७८)– ही संस्था स्थापन केली. नंतर फ्रान्स-इटली यांमध्ये जेव्हा राजकीय संघर्ष व तणाव निर्माण झाले, तेव्हा त्याने इंटरनॅशनल सोसायटी फॉर पीस- लोंबार्ड लीग- या शांततावादी संस्थेची स्थापना केली (१८८७). या संस्थेची उद्दिष्टे निःशस्त्रीकरण, शांततेसाठी राष्ट्रसंघ स्थापणे आणि आंतरराष्ट्रीय संघर्षासाठी लवाद नेमणे तसेच विश्वबंधुत्त्वाचा प्रसार करणे, ही होती. या संस्थेच्या प्रसार-प्रचारार्थ त्याने इंटरनॅशनल लाइफ (इं. भा.) हे नियतकालीक सुरू केले (१८९८). या नियतकालिकातून तत्कालीन शांततावादी पुरस्कर्ते आपली मते लेखांद्वांरे प्रसिद्ध करीत. त्याने अनेक शांतता परिषदांतून इटलीचे प्रतिनिधित्व केले. बर्न येथील शांततापरिषदेत त्याने कॉन्फेडरेशन ऑफ युरोपियन स्टेट्स ही संकल्पना मांडली (१८९२). त्याच्या या कार्यामुळे मिलान येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेचे अध्यक्षपद त्यास देण्यात आले (१९०६). या विविध परिषदांतून त्याने जागतिक शांततेसंबंधीच्या उद्देशांचा पाठपुरावा केला. त्याच्या या शांतता कार्याबद्दल त्याला फ्रेंच न्यायाधीश व कायदे तज्ञ ल्वी रनो याच्याबरोबर जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९०८). १९११–१२ मधील तुर्कस्तानविरुद्धच्या लिबियाच्या प्राप्तीसाठी झालेल्या इटालियन युद्धास त्याने पाठिंबा दर्शविला. त्याचप्रमाणे पहिल्या महायुद्धामध्ये इटलीच्या सहभागास मान्यता दर्शविली (१९१५).
मोनेअताचे वृत्तपत्रीय लेखक विपुल आहे. याशिवाय त्याने ग्रंथ लेखनही केले. त्याच्या ग्रंथांपैकी वॉर, इन्सरेक्शन अँड पीस इन द नाइन्टिन्थ सेंचरी (३ खंड–१९०३) हा ग्रंथ फार लोकप्रिय झाला. त्याचा उल्लेख त्याच्या नोबेल पारितोषिकाच्या बक्षिपत्रात आवर्जून करण्यात आला आहे.
मोनेअताला आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि आपले स्वातंत्र्य यांच्या संरक्षणार्थ केलेल्या हिंसक लढ्यात विसंगती आढळत नाही. ‘सर्व राष्ट्रे परस्परांतील उद्योगधंदे आणि व्यापार यांद्वारे संघर्ष विसरून आंतरराष्ट्रीय विश्वबंधुत्त्वाच्या ध्वजाखाली एकत्र येतील आणि शांतता व मैत्री उपभोगतील, असा एक सुदिन केव्हा तरी उगवेल, त्याची इटालियन्स वाट पहात आहेत,’ असा आशावाद त्याने व्यक्त केला आहे. तो मिलान येथे निधन पावला.
लेखक - रुक्साना शेख
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/27/2019
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल ...
अमेरिकन शांततावादी नेत्या आणि शांततेच्या नोबेल पा...
फ्रेंच मुत्सद्दी, फ्रान्सचा पंतप्रधान व जागतिक शां...
स्वीडनचा पंतप्रधान (१९२०; १९२१ - २३ व १९२४ - २५) ...