केरळ राज्यातील एक जुने विद्यापीठ. त्रिवेंद्रम येथे त्रावणकोर विद्यापीठ ह्या नावाने ते प्रथम १ नोव्हेंबर १९३७ मध्ये स्थापन झाले. १९५७ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर त्याचे केरळ विद्यापीठात रूपांतर झाले. त्याचे स्वरूप अध्यापनात्मक आणि संघीय असून त्याच्या कक्षेत त्रिवेंद्रम, क्विलॉन, अलेप्पी, कोट्टयम् व एर्नाकुलम हे महसुली जिल्हे येतात. विद्यापीठात मानव्यविद्या, तंत्रविद्या आणि विज्ञान यांतील विविध विषयांच्या सु. ३६ विद्याशाखा असून बहुतेक विषयांत संशोधन होते. मलयाळम् व संस्कृत ह्या भाषा साहित्यांच्या अध्ययनास व संशोधनास अधिक प्राधान्य दिले जाते, तसेच सागरी जीवशास्त्र, महासागरविज्ञान, रसायनशास्त्र व संख्याशास्त्र यांच्या संशोधनासाठी प्रयोगशाळा असून अनुप्रयुक्त विज्ञानांचे संशोधन वाढविण्यासाठी एक मध्यवर्ती संशोधन संस्था १९३९ पासून कार्य करीत आहे.
विद्यापीठास सु. १०३ महाविद्यालये संलग्न केली आहेत. विद्यापीठीय संविधानानुसार कुलगुरू हा सर्वोच्च अधिकारी असून कुलसचिवाच्या साहाय्याने तो प्रशासन व्यवस्था पाहतो. कुलगुरुपद सवेतन आहे. विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी आहे, तथापि राज्यातील सर्व शिक्षण संस्थांतून शिक्षणाचे माध्यम मलयाळम् करण्याविषयी जोराचे प्रयत्न चालू आहेत. १९५०–५८ पासून विद्यापीठाने त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय मोठे असून त्यात सु. १,४८,३०० ग्रंथ व १,०९४ नियतकालिके होती (१९७२). विद्यापीठाचा स्वतंत्र प्रकाशन विभाग आहे. १९७१-७२ मध्ये विद्यापीठाचे उत्पन्न २५९·१४ लाख रु. होते; तसेच या सालात विद्यापीठात १,२४,५०४ विद्यार्थी शिकत होते. पालकांजवळ न राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय वा विद्यापीठाच्या वसतिगृहात राहण्याचे बंधन आहे.
लेखक: मु. मा. घाणेकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 9/12/2019
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...