ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ. कैरोत जून-जुलै ९७२ मध्ये स्थापना. फतिमी खिलाफतीतील जव्हार अल् ए कातिब अल् शिकील्ली ह्या सेनापतीने येथील मशीद बांधली. तिच्या घुमटावरील कोरीव लेखात अल् अझिझ-निझार ह्याने ९९६ मध्ये अकादमी व धर्मशाळा सुरू केल्याचा उल्लेख आहे. पुढे फातिमी राज्यकर्त्यांच्या मदतीने विद्यापीठाच्या वास्तूत सुधारणा करण्यात आल्या. तेराव्या शतकाच्या सुरुवातीच्या भूकंपाने व पुढे मंगोल आक्रमणात ईजिप्तमधील अनेक मद्रसांबरोबरच या विद्यापीठाचीही बरीच नासधूस झाली.
चौदाव्या शतकात इमीर सलारने मशिदीचा जीर्णोद्धार करून जवळच एक शिक्षणसंस्थाही सुरू केली. १३६० मध्ये बसीर अल् जामदार अल् नासीरी ह्याने आणखी काही सुधारणा करून हनाफी कायद्याची शाखा उघडली आणि कुराणाची एक प्रत ठेवून तिचे वाचन करण्यासाठी एक विद्वान नियुक्त केला. त्यामुळे मध्ययुगात कुराणाच्या अभ्यासास चालना मिळाली व हळूहळू इस्लाम धर्मशास्त्र व न्यायशास्त्र ह्यांचे अध्ययन तेथे होऊ लागले. काही वर्षांनी वरील अभ्यासक्रमात अरबी भाषा व तत्त्वज्ञानाचा समावेश झाला.
ईजिप्तच्या मामलूक सुलतानाने १३८२ मध्ये अल् अझार विद्यापीठात इब्न खल्दून ह्या प्रसिद्ध इतिहासकारास प्राध्यापक म्हणून नेमले होते. होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना राहण्याची सोय विद्यापीठात होती. परदेशातूनही अनेक विद्यार्थी तेथे शिकण्यासाठी येत. एकोणिसाव्या शतकापासून अल् अझारचे महत्त्व वाढले. तत्पूर्वी ती एक भारतीय पाठशाळांप्रमाणे शिक्षण देणारी संस्था होती. ईजिप्तच्या स्वातंत्र्यानंतर त्यास सर्वसाधारण विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. सध्या देशातील विविध १४ शैक्षणिक संस्था यास संलग्न केल्या असून वरील विषयांशिवाय वैद्यक, व्यवसायप्रशासन, अभियांत्रिकी, कृषी इ. विषयांच्या शाखोपशाखा तेथे आहेत.
१९६१ नंतर विद्यापीठाच्या इमारतीत वाढ करण्यात आली असून अभ्यासक्रमाचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे. १९६२ पासून स्त्रियांना प्रवेश देण्यात येऊ लागला. कुलगुरू, कुलपती, कुलसचिव व कुलशासक विद्यापीठाची प्रशासनव्यवस्था पाहतात. १९६८ मध्ये ३३,०२० विद्यार्थी या विद्यापीठात व त्याच्या संलग्न संस्थांतून शिकत होते. इस्लाम धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी हे विद्यापीठ अद्यापि प्रसिद्ध आहे. इस्लामविषयक ग्रंथसंग्रहाच्या बाबतीत त्याचे ग्रंथालय अद्वितीय आहे.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/6/2024
आंध्र प्रदेश राज्यातील वॉल्टेअर येथे १९२६ मध्ये स्...
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...