इझ्राएलमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्यापीठ. सहशिक्षण व वर्गनिरपेक्ष शिक्षण संस्था म्हणून त्याची ख्याती असून ते जगातील सर्वांत मोठे ज्यू विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. ते खाजगी व्यवस्थापनाखाली कार्यरत असून त्यास अंशतः शासकीय अनुदान मिळते. त्याची स्थापना जेरूसलेम येथे १९१८ मध्ये झाली; तथापि त्याचे अधिकृत उद्घाटन १९२५ मध्ये झाले.प्रारंभी ते मौंट स्कोपस येथे होते; परंतु मौंट स्कोपस हे जॉर्डेनियनक्षेत्रातील निःसैनिकी इझ्राएल ठाणे झाले, तेव्हा ते जेरूसलेमच्या नियंत्रणाखालील जीव्हात राम या ठिकाणी हलविण्यात आले. इझ्राएलच्या स्वातंत्र्य-युद्धानंतर (१९४८) त्याचे स्थलांतर जेरूसलेम शहरातील इझ्राएलच्या नियंत्रणाखालील भागात झाले; मात्र सहा दिवसांच्या युद्धानंतर ते मूळ मौंट स्कोपस येथे हलविण्यात आले.
विद्यापीठाचे शैक्षणिक माध्यम हिब्रू भाषा असून दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचा अध्यापनार्थ उपयोग केला जातो. विद्यापीठात मानव्यविद्या, सामाजिक शास्त्रे, विज्ञान व तंत्रशिक्षण, कृषिविज्ञान, विधी, वैद्यक, दंत वैद्यक यांच्या विद्याशाखा असून शिक्षणशास्त्र, समाजकार्य, औषध निर्माणशास्त्र (रसशाळा), गृह अर्थशास्त्र, उपयोजित विज्ञान व तंत्रशास्त्र इत्यादींची स्वतंत्र विद्यालये आहेत. यांशिवाय ग्रंथालयशास्त्राचे विद्यालयही येथे आहे. विद्यापीठातील शैक्षणिक आणि संशोधनात्मक अध्यापन मुख्यत्वे ३६ विभागांद्वारे केले जाते. त्यांपैकी इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च, द इन्स्टिट्यूट ऑफ एशियन अँड आफ्रिकन स्टडीज आणि द हॅरी एस्. ट्रूमन इंटरनॅशनल सेंटर फॉर द अॅडव्हान्समेन्ट ऑफ पीस या संस्था विशेष प्रसिद्ध आहेत.
विसाव्या शतकात विद्यापीठाचा विस्तार इझ्राएलमध्ये देशभर झाला. तेव्हा त्याचे विभाजन मौंट स्कोपस, जीव्हात राम, आईन कारेम आणि रेहोव्होट या चार उपकेंद्रात करण्यात आले. त्यांपैकी जीव्हात राम हे सर्वांत मोठे उपकेंद्र आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयात सु. वीस लाख ग्रंथ आहेत. रेहोव्होट या उपकेंद्रातील ग्रंथालयात कृषिविज्ञानविषयक ग्रंथ अधिक असून तेथे परिस्थितिविज्ञान ग्रंथांचा स्वतंत्र विभाग आहे. या विद्यापीठात १,२०० अध्यापक आणि २३,२५० विद्यार्थी होते (२०१३). हे विद्यापीठ जगातील ज्यू विद्यार्थ्यांचे मानबिंदू असून अरब राष्ट्रांतील विद्यार्थीही येथे अध्यापनार्थ येतात.
लेखक: जगतानंद भटकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/8/2024
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...