অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोलीस दलांचे ‘ॲप’

सध्या संगणक आणि अँन्ड्राईड फोनचा जमाना आहे. त्यात महाराष्ट्र पोलीसही मागे नाहीत. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोबाईल ॲप तयार केले आहे. शिवाय वाहन चोरीच्या तक्रारी पाहता त्यासाठीही वेबसाईट सुरू केली आहे. रेल्वे प्रवाशांसाठी प्रतिसाद ॲप, नागरिक व पोलीस समन्वयासाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे. याविषयी जाणून घेऊया.


महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘प्रतिसाद’ॲप

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागातर्फे ‘प्रतिसाद’ॲप लाँच करण्यात आले आहे. संकटकाळी प्रतिसाद ॲपमधील इमरजन्सी बटन दाबताच नियंत्रण कक्षातील संगणकावर अलर्ट देता येतो. मदत मागणाऱ्या व्यक्तीपासून तीन कि. मी. अंतराच्या आतमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी यांना ॲपद्वारे मोबाईलवर अलर्ट दिला जातो.या ॲपद्वारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मदत मागणाऱ्या व्यक्तींची पूर्ण माहिती, लोकेशन व तेथे मदत मागणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर त्याची तक्रार नोंद झाल्याचा मेसेज दिला जातो. या मेसेजमध्ये तक्रारीचा आय.डी. क्रमांक, त्याच्या जवळच्या भागात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन दिला जातो. तसेच मदत कोठपर्यंत आली आहे, याची माहितीदेखील सतत पुरविली जाते. गुगल प्ले स्टोअरवर व ॲपल स्टोअरमधून हेॲप डाऊनलोड करुन घेता येते.

वाहन चोरीची तक्रार व माहिती देण्यासाठी वेबसाईट सुविधा

चोरीला गेलेल्या वाहनाबाबतची तक्रार व माहिती पोलीस विभागास देण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. तक्रार घरबसल्या देण्यासाठी ऑनलाईन सुविधा www.vahanchoritakrar.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली आहे. हे ॲप वापरण्यासाठी नागरिकांनी www.vahanchoritakrar.com या वेबसाईटवर प्रथम नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर चोरी गेलेल्या वाहनाबाबतची माहिती त्यातील विहीत नमुन्यात भरावी. ही भरलेली माहिती संबंधित आयुक्तालयाच्या किंवा जिल्ह्याच्या समन्वय अधिकारी यांच्या कार्यालयात जाईल.प्राप्त झालेली माहिती समन्वय अधिकारी संबंधित पोलीस ठाण्यास पाठवतील व त्याप्रमाणे तक्रार दाखल करणाऱ्या नागरिकाला एसएमएस प्राप्त होईल. एसएमएस प्राप्त झाल्यानंतर वाहन चोरीची तक्रार अथवा माहिती देणाऱ्या नागरिकाने ऑनलाईन तक्रार अर्जाची प्रत घेवून संबंधित पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रारी अथवा माहितीची एफ.आय.आर. नोंदविला जाईल. या प्रणालीचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पोलीस महासंचालकांतर्फे करण्यात येत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रतिसाद रेल्वे ॲप


रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे पोलिसांद्वारे प्रतिसाद ॲप लाँच करण्यात आले आहे. या ॲपद्वारे बॅग चोरी, साखळी चोर, दरोडेखोर यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात येणे शक्य होणार आहे. या ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार तत्काळ नोंदवू शकता. ही तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनाही ऑनलाईन दिसणार असल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

या ॲप मध्ये घडणाऱ्या घटनेचा थेट फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्याचीही सुविधा पुरविण्यातत आली आहे.www.punerailwaypolice.in, www.nagpurrailwaypolice.in आणि www.mumbairailwaypolice.in या वेबसाईट ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

पोलीस-नागरिक समन्वय व मदतीसाठी पोलीस मित्र महाराष्ट्र ॲप

महाराष्ट्र पोलीस दलाने पोलीस व नागरिक समन्वयासाठी जवळचे पोलीस स्टेशन व पोलीस दलाच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी ‘पोलीस मित्र महाराष्ट्र’ हे ॲप महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. 

गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करता येते. नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर स्वत:ची संपूर्ण माहिती भरुन रजिस्टर झाल्यानंतर पोलीस मदत मिळवा, पोलीस मित्र म्हणून नोंदणी करणे व रिपोर्ट ॲन इनसिडेंट हे स्क्रिन ओपन होते. पोलीस मदत मिळवा, हे बटन दाबल्यानंतर नागरिकांना स्क्रिनवर जवळचे पोलीस स्टेशन, अंतर व जाण्याचा मार्ग दिसतो. सर्व हेल्पलाईन क्रमांकावर थेट संभाषण करता येते किंवा कोणतीही अनुचित घटना घडत असेल तर त्याचा फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग संबंधित पोलीस स्टेशनला थेट पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

रजिस्टर झालेल्या नागरिकांपैकी ज्यांना पोलीस मित्र म्हणून काम करायचे आहे, ते ऑनलाईन फॉर्म भरुन पोलीस मित्र बनू शकतात. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पोलिसांना मदत करु शकतात. पोलीस मित्र ॲपद्वारे नागरिक पोलिसांशी जोडले गेल्याने पोलिसांना त्याची मोठी मदत मिळत आहे. या ॲपचे नजिकच्या काळातील यश म्हणजे नाशिकमध्ये एका पोलीस मित्राने दरोडे टाकणारी पुण्याची कुख्यात शिकलकर टोळी नुकतीच पकडून दिली आहे.

संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate