विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला. महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या, भारतीय पोलीस सेवेतील त्या पहिल्या महिला अधिकारी होत. मूळच्या उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबाद येथील असणाऱ्या श्रीमती शुक्ला यांची सन 1988 मध्ये भारतीय पोलीस सेवेत नियुक्ती झाली. एक शिस्तप्रिय, निष्ठावान व कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख आहे.
31 मार्च 2016 पासून त्या पुणे पोलीस आयुक्तपदी कर्तव्य बजावत आहेत. पुणे पोलीस आयुक्त पदावर विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहरात लाखो नागरिक राहतात. अशावेळी त्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते अशी परिस्थिती असताना “या शहरासाठी मी काय करणार? हे मी केवळ तोंडी न सांगता माझे कामच बोलेल”, असे उद्गार त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्त केले होते. पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून आजवर 31 सराईत धोकादायक गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे. 10 गुन्ह्यांतील 78 आरोपीविरुद्ध मोका कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करुन त्यांना कारागृहात डांबून ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी फरारी असणाऱ्या कुविख्यात गुन्हेगारी टोळीला नवी दिल्ली व गुजरात राज्यातून पकडून जेरबंद केले आहे.
पोलीस हे घरापेक्षा अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे पोलीस ठाणे अथवा कार्यालय पोलिसांसाठी घरापेक्षाही महत्वाची जागा असते, असे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी पुणे शहरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी 'हितगुज' हा उपक्रम 7 नोव्हेंबर 2016 पासून सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केवळ तीन महिन्यात 550 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे निरसन केले आहे. राज्यात महिलांना निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करुन देणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे त्या मानतात. हे केवळ त्यांचे विचार नाहीत तर हे सर्व त्या आपल्या कृतीतून दाखवून देतात. आयटीयन्स आणि महिलांना तत्काळ पोलिसांची मदत मिळण्यासाठी “बडी कॉप” हेअॅप्लीकेशन पोलीस आयुक्त कार्यालयाने सुरू केले आहे. सेवा बजावण्यासाठी तत्पर असताना पोलीस ठाणे आणि पोलीस चौकीत आलेल्या नागरिकांना पोलिसांनी सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी असे त्या आवर्जून सांगतात. रुजू झाल्यापासून त्यांनी आजवर केवळ नऊ महिन्यात 2 हजार 243 सर्वसामान्य नागरिकांची भेट घेऊन, त्यांच्या तक्रारींचे निरसन केले आहे.
स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर करुन नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तो उपलब्ध करुन देणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीतून त्यांनी सामान्यांप्रती असणारी आत्मियता दाखवून दिली आहे. पारपत्र व चारित्र्य पडताळणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना टॅबलेट उपलब्ध करुन दिल्यामुळे संबंधित कर्मचारी अर्जदाराच्या घरी जाऊन पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणी करु शकत आहेत. त्यामुळे पुणेकर नागरिकांची मोठी सोय झाली असून हे काम अधिक जलदपणे होत आहे. श्रीमती शुक्ला यांनी पुणे शहरात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी 1090 ही हेल्पलाईन सुरु केली असून स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष लवकरच पोलीस आयुक्तालयात सुरु करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
श्रीमती शुक्ला यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, त्यांना सन 2004 मध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह तसेच मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांनी सन 2005 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व सन 2013 मध्ये प्रशंसनिय सेवेबद्दल पोलीस पदक देवून गौरविले आहे. अशा या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याला सलाम...
लेखक - वृषाली पाटील,
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, पुणे.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 10/18/2020
सध्या संगणक आणि अँन्ड्राईड फोनचा जमाना आहे. त्यात ...
लोकांच्या प्रशासकीय कारभाराबाबतच्या संदर्भात तक्रा...
विधिमंडळातील सभासदांवर सभागृहाच्या बाहेर वेगवेगळ्य...
शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाच...