आजचे युग हे इंटरनेटचे आहे. आपले शासनही संगणकाद्वारे शिक्षण या संकल्पनेवर भर देत आहे. इंटरनेटद्वारे शिक्षण देणे आणि घेणे, ही प्रक्रिया अधिक दृढ होताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरातून अनेकजण शैक्षणिक मोबाईल अॅप्स तयार करीत आहे. पण ग्रामीण भागात अशा प्रकारचे शैक्षणिक अॅप्स तयार होणे दुर्मिळच. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील
लक्ष्मण तांडा बेळंब ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील युवा शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनी मोबाईल, टॅब, संगणक व लॅपटॉप यावर इंटरनेटशिवाय वापरता येतील असे वेगवेगळे तब्बल २१ ऑफलाईन अॅप्स तयार केले आहेत.
या अॅप्सचे वैशिष्टय म्हणजे ग्रामीण भागात वाडी, वस्त्यांवर काम करणारे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना इंटरनेटशिवाय ऑफलाईन हाताळता येतात. अनेक शिक्षक व विद्यार्थी या अॅप्सचा उपयोग करून घेत आहेत.
उमेश खोसे यांनी इ. १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खोसे यांनी हे अॅप्स बनविले आहेत. खोसे यांनी अॅप्लीकेशनची माहिती देताना सांगितले की, ही सर्व अॅप्लीकेशन इंटरनेटशिवाय चालतात. तसेच यात विद्यार्थी आंतरक्रियेस भरपूर वाव आहे. सर्व अॅप्स या ज्ञानरचनावादास पूरक आहेत.
तांड्यावरील शाळेवर मोबाईलला साधी रेंजसुद्धा येत नाही. अशा तांड्यावरील शाळेचे आज स्वत:चे संकेतस्थळ आहे. ही अॅप्स मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये वापरता येतात. हे अॅप इंटरनेटशिवाय वापरता येत असल्यामुळे मुले मोबाईलवर खेळ खेळण्यापेक्षा या अॅपचा शैक्षणिक वापर करत आहेत.
यामध्ये पाठांतरापेक्षा कृतीवर भर देण्यात आलेला आहे. हे अॅप उघडल्यानंतर प्रत्येकवेळी प्रश्नांचा क्रम व पर्याय बदलतात. तसेच शेवटी बरोबर किंवा चुकीचे उत्तर कळते.
प्रायोगिक तत्वावर या अॅप्सला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे सर्व अॅप्स डाऊनलोड करता येतात. या सर्व अॅप्समध्ये चित्र व शब्दांचा समावेश आहे. चित्रावर क्लिक केल्यास चित्र मोठे होते. या सर्व अॅप्सची साईज खूप कमीअसुन फक्त ४ एम. बी. आहे. त्यामुळे ते लवकर डाऊनलोड होतात. जि. प.शाळेच्या नावाने ब्लॉग बनविला आहे. या ब्लॉगवर शैक्षणिक माहितीचा खजिना असून अल्पावधीत याला अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. या ब्लॉगवर शिक्षक,पालक व विद्यार्थी तसेच १ ली ते ८ वी च्या कविता, परिपाठ, वाचनीय साहित्य, ऑफलाईन टेस्ट, वेगवेगळे सॉफ्टवेअर, दिनविशेष, बोधकथा, शालेय अभिलेख आदिंची माहिती आहे.
प्रधान सचिव नंदकुमार यांनी व शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भायकर यांच्या प्रेरणेने सध्या सर्व महाराष्ट्रात प्रगत शाळा व तंत्रस्नेही चळवळ जोर धरू लागली आहे. याच प्रेरणेने खोसे या तांड्यावरील शिक्षकाने शैक्षणिक अॅप्स व शैक्षणिक असे शाळेचे संकेतस्थळ बनविल्याने सर्वत्र त्यांचे
कौतुक होत आहे. एका तांड्यावरील शाळेत कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रातला वापर महत्वाचा असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
खोसे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील हे कार्य पाहून उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायते व शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उमेश खोसे यांनी तयार केलेले हे अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी त्यांच्या पुढील शैक्षणिक संकेतस्थळाला भेट द्यावी...
लेखक - शिवाजी कांबळे
अंतिम सुधारित : 8/3/2023
गुगल प्ले स्टोअरमध्ये हे ॲप माय झेडपी जळगाव नावाने...
देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या 'महाव...
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तूत मोबाईल वरून कृ...
सध्या संगणक आणि अँन्ड्राईड फोनचा जमाना आहे. त्यात ...