स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडीपालन चांगला रोजगार आहे. या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी असते. हा व्यवसाय व्यापारी दृष्टीने चालविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्याकडून अधिक मांस उत्पादनासाठी सशक्त गिरिराज कोंबडीची पिल्ले ग्रामीण युवकांना माफक दरात उपलब्ध करून दिली जात आहेत. नव्यानेच हॅचरी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना पिल्ले नियमित उपलब्ध होत आहेत.
शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुटपालन करण्यासाठी करडा प्रक्षेत्रावर गिरिराज कोंबडीपालन प्रात्यक्षिक तसेच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
गिरिराज कोंबडीची वैशिष्ट्ये -
1) गावठी कोंबड्यांप्रमाणे विविध रंगांत आढळतात.
2) कोणत्याही वातावरणात एकरूप होतात.
3) रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
4) मांस व अंडी भरपूर प्रमाणात मिळतात. (आठ आठवड्यांत सुमारे एक किलो)
- अंडी वर्षाकाठी 160 ते 180 मिळतात.
-मांस चविष्ट असते.
-74 टक्के मांस मिळते.
-या कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी 166 दिवस
-अंड्यांतून सशक्त पिल्ले जन्माला येतात.
-सफल अंड्यांचे प्रमाण 87 टक्के. या कोंबडीला एक किलो वजनासाठी 2.6 किलो खाद्य द्यावे लागते.
गिरिराज कोंबडीचे व्यवस्थापन -
खाद्य व्यवस्थापनासह सुरवातीपासून ते बाजारपेठेच्या टप्प्यापर्यंत कोंबडीची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्ष्यांपासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो. गिरिराजची एक दिवसांची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आणल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो. तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. दुसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून प्रतिजैविक (ऍन्टिबायोटिक) द्यावे लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून रोगापासून संरक्षण मिळते. पाचव्या ते सहाव्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे. सातव्या दिवशी लासोटा लस द्यावी. लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे. 14-15 व्या दिवशी गंभोरा लस द्यावी. त्याच्या दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे. 25-30 दिवसांच्या दरम्यान व 40-50 दिवसांदरम्यान लिव्हर टॉनिक 20 मि.लि. प्रति 100 पक्ष्यांना द्यावे.
गिरिराज कोंबडीचे लसीकरण व औषधी उपचार असे...
खाद्य -
सुरवातीला एक- दोन दिवस भरडलेला मका द्यावा. त्यानंतर चार आठवडे स्टार्टर खाद्य द्यावे. नंतरचे चार आठवडे फिनिशर खाद्य द्यावे. सरासरी एका पक्ष्याला मोठे होईपर्यंत (आठ आठवड्यांचे) 2.6 किलो ग्रॅम खाद्य द्यावे. तसेच आठ आठवड्यांनंतर खाद्य देत राहिल्यास त्याच प्रमाणात त्यांची वाढ होत राहते.
खालीलप्रमाणे खाद्य द्यावे
वरील प्रमाणे खाद्य दिले तर खाद्याचे नुकसान होणार नाही आणि वजन व्यवस्थित येईल.
तापमान -
गिरिराज कोंबड्यांच्या पिल्लांना खालीलप्रमाणे उष्णता किंवा लाइटचा प्रकाश व्यवस्थित दिल्यास त्यांची चांगली वाढ होते. मरतुकीचे प्रमाण कमी राहते व त्याचा परिणाम वाढीवर चांगला होऊ शकतो.
कोंबडीचे घर -
पक्ष्यांना एक दिवसाच्या पिल्लापासून ते दोन महिने म्हणजे बाजार पेठेत नेण्यापर्यंत एक चौरस फूट जागा लागते. तसेच 100 पक्ष्यांना 10 x 10 चौ. फू. क्षेत्रफळाची खोली बांधावी लागते. कोंबडीचे घर पूर्व- पश्चिम बांधावे. जागा उंच ओट्यावर असावी. पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी. कोंबडीच्या घरात सतत खेळती हवा असावी. घर मुख्य रस्त्यापासून 1 ते 1.50 किलोमीटर अंतरावर असावे. यामुळे कोंबड्यांना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही.
गिरिराज कोंबडीचे अर्थशास्त्र (100 पिल्ले) -
ही कोंबडी मास उत्पादनासाठी चांगली वाव असल्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो. नफा- तोटा असा.
प्रति पक्षी 62 रु. खर्च येतो.
उत्पादन- खर्च = निव्वळ नफा
9360-6260 = 3100
जर 100 पक्ष्यांची बॅच दर 30 दिवसांनी घेतली तर वर्षभरात 10 बॅचेस मिळतील. म्हणजेच सर्व खर्च वजा जाता आपल्याला निव्वळ नफा 31,000 रु. वर्षभरात मिळू शकतो.
टीप - पिल्ले जास्त घेतल्यास वर्षाला जास्त नफा मिळू शकतो
शेतकऱ्यांनो, कृषी विज्ञान केंद्राच्या हॅचरीचा लाभ घ्या
वाशीम जिल्ह्यात कुक्कुटपालन करणारे शेतकरी पुढे येत आहेत. करडा कृषी विज्ञान केंद्रातर्फे त्यांची गरज लक्षात घेऊन गिरिराजा पोल्ट्री हॅचरी सुरू करण्यात आलेली आहे. या हॅचरीमधून एका वेळेला 15,000 अंडी व 5000 अंडी उबवणीची क्षमता आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व किमान 50 टक्के रक्कम भरल्यानंतर कुक्कुटपालन शेतकऱ्यांना जागेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सोबतच कृषी विज्ञान केंद्राद्वारे तयार करण्यात आलेले खाद्यही उपलब्ध होणार आहे.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, करडा येथे कार्यरत आहेत.)
संपर्क -9423611700
माहिती संदर्भ : अॅग्रोवन