रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे यांनी आंबा पल्पनिर्मितीत खात्रीशीर ब्रॅंड व त्यासाठी बाजारपेठही तयार केली आहे. पल्पनिर्मिती करताना गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणतात. त्यांच्या या उद्योगाची हंगामात सुमारे 150 ते 200 टन आंब्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. वडिलांकडून त्यांना मिळालेला प्रक्रिया उद्योगाचा हा वारसा आता तिसऱ्या पिढीने सांभाळण्याची तयारी केली आहे.
कोकणचा हापूस सर्वत्र लोकप्रिय आहे. वर्षातून केवळ दोन ते तीनच महिने त्याची चव चाखायला मिळते. मात्र प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ बनविले तर या हापूसची चव बाराही महिने चाखायला मिळते. हाच प्रक्रियेचा म्हणजे पल्पनिर्मितीचा उद्योग (याला कॅनिंग असेही म्हणतात) कोकणातील शेकडो व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन देऊन गेला आहे. वर्षाला काही लाख टन आंब्यांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये दिसून येतात.
रत्नागिरी जिल्ह्यात श्रीक्षेत्र गणपती पुळ्यापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटरवर मालगुंड गाव वसले आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कवी केशवसुतांचे हे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रगतिशील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे हे इथले रहिवासी. ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. हा व्यवसाय सांभाळून आपली आंबा बाग व शेती सांभाळतात.
डॉ. विवेक यांचे वडील डॉ. यशवंत भिडे यांनी 1977 मध्ये आंब्यावर प्रक्रिया करणारा म्हणजे पल्पनिर्मितीचा "कॉटेज' स्वरूपातील पहिला उद्योग सुरू केला. त्यासाठी शासनाच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून अनुदान घेतले होते. सुरवातीला दहा ते वीस टन आंब्याचा पल्प तयार करून त्याची विक्री केली जात होती. सन 1999 पासून कॉटेज स्वरूपातील या उद्योगाचे रूपांतर आणखी थोडे वाढले. डॉ. विवेक यांनी पुढे या व्यवसायाची सूत्रे सांभाळण्यास सुरवात केली. आंबा पल्प तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान बाजारात आले होते. शासनाच्या अनुदान तत्त्वावरील योजनाही होत्या. जास्तीत जास्त आंब्यांवर प्रक्रिया करून त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय डॉ. भिडे यांनी घेतला.
पल्पसाठी लागणाऱ्या आंब्यात 20 टक्के आंबा आपल्या बागेतला वापरला जातो. मात्र उद्योगाचा विस्तार केल्याने 80 टक्के आंबा मालगुंड आणि अन्य परिसरातील बागायतदारांकडूनही विकत घेतला जातो. या उद्योगातून दोन महिने सुमारे शंभर लोकांना रोजगार मिळतो.
पॅकिंग मॅंगो पल्पचे दर (रू.) (एमआरपी)
450 ग्रॅम 120
850 ग्रॅम 225
3.1 किलो 580
भिडे यांनी सांगितले गुणवत्तेचे निकष
डॉ. भिडे यांचे चिरंजीव यज्ञेश म्हणजे प्रक्रिया उद्योगातील त्यांची तिसरी पिढी त्याची पुढील जबाबदारी सांभाळत आहे. व्यवसायातील स्पर्धा वाढल्यामुळे नवे प्रयोग आणि नवे मार्केट विकसित करण्यावर भिडे यांचा भर आहे.
आंबा पल्प उद्योग व मार्केटच्या अनुषंगाने भिडे म्हणाले, की आंब्याचा प्रक्रिया उद्योग तसा दोन महिनेच असतो. ते किफायतशीर ठरण्यासाठी किमान आठ महिने तो सुरू राहायला हवा. त्यासाठी आपल्या भागातील मोठ्या प्रमाणात पीक व बाजारपेठ हे दोन घटक अनुकूल हवेत.
त्या दृष्टीने अननस किंवा टॉमेटोचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांना गटशेती करावी लागेल. लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचा मदतीचा हात हवा. त्या माध्यमातून शासकीय कार्यालये, लष्करी कॅंटीन, विमानसेवा आदी ठिकाणी पल्प पुरवणे शासनाला शक्य आहे.
वेंगुर्ला येथील कोकण हापूस आंबा बागायतदार व विक्रेते सहकारी संस्थेचे भिडे अध्यक्ष आहेत. संस्थेमार्फत रत्नागिरी हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीई) देण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे.
संपर्क - डॉ. विवेक भिडे - 9422051503
लेखक : राजेश कळंबटे
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...