অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी

उत्तम पॅकेजिंगचा वापर करून पदार्थ आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त टिकविण्यास मदत होते. पदार्थ ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोचवण्यासाठी "पॅकेजिंग' हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विविध दुग्धपदार्थांसाठी वेगवेगळे पॅकेजिंग वापरून संशोधनाअंती काही निष्कर्ष काढले गेले आहेत.

दुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी मर्यादा येतात. पदार्थ टिकविण्यास मदत होण्यासाठी, ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोचवण्यासाठी "पॅकेजिंग' हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बाजारात "ब्रॅन्ड' तयार करण्यासाठीही पॅकेजिंग महत्त्वाचे कार्य पार पाडते.

आपल्या देशात दुग्ध पदार्थांचे उत्पादन हे लहान स्तरावर जास्त प्रमाणात केले जाते. आरोग्याच्या दृष्टीने हे पदार्थ व्यवस्थित न हाताळलेले व पॅकिंगकडे दुर्लक्ष केलेले असतात, हे सर्वज्ञात आहे. अपूर्ण पॅकेजिंग असलेले किंवा पॅकिंग नसलेले पदार्थ हे त्यांच्या गुणधर्मात अनेक बदल दर्शवितात त्यामुळे याचा परिणाम वितरणावर होतो.

उत्तम पॅकेजिंगचा वापर करून पदार्थ आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त टिकविण्यास मदत होते. पॅकेजिंगसाठी ग्रीस प्रूफ पेपर, व्हेजिटेबल पारचमेंट पेपर (बटर पेपर), प्लॅस्टिककोटेड पेपर, पेपर बोर्ड इत्यादी अनेक कागद आणि त्यापासूनच्या पॅकेजिंगचा समावेश होतो. पॅकेजिंगसाठी काचेचादेखील उपयोग होतो. काच रंगीत किंवा रंगहीन असते; परंतु यात प्रकाशामुळे पदार्थ लवकर खराब होतो. सुगंधी दुधासाठी कमी वजनाच्या काचेच्या बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत.

प्लॅस्टिकमध्ये अनेक प्रकारचे प्लॅस्टिक पॅकेजिंग उपलब्ध असून, आधुनिक तंत्राने ते वापरले जाते. प्लॅस्टिक हे वेगळ्या कागदांबरोबर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक एकत्र करून "लॅमिनेट' तयार करतात.

विविध दुग्धपदार्थांसाठी वेगवेगळे पॅकेजिंग वापरून संशोधनाअंती काही निष्कर्ष काढले गेले आहेत.

खवा

  • पीएफए कायद्यानुसार खवा टिकविण्यासाठी कुठलाही पदार्थ वापरण्यास बंदी आहे. यामुळे खवा पॅकिंगला महत्त्व आहे. ऍल्युमिनियम फॉईल आणि एलडीपीई प्रकारच्या पॉलिथिनमध्ये खवा पॅक करून तो 13-15 अंश से. तापमानास ठेवल्यास 14 दिवसांपर्यंत टिकवता येतो.
  • खवा गरम असताना (90 अंश से.) टिन कॅन्स (लॅकर्ड असलेले म्हणजे कॅन्सचा आतील भाग हा रेझीन किंवा रेझीन ड्रायिंग ऑइल ...................कॉम्लेक्‍स............. जे आतून लावून सुकल्यानंतर आत फिल्मसारखे तयार होईल. मध्ये भरल्यास या कॅन्समध्ये खवा 14 दिवसांपर्यंत चांगल्या (37 अंश से. तापमान असल्यास) स्थितीत टिकतो.
  • लॅमिनेट्‌सचा वापरही खवा पॅकिंगसाठी करतात. दोनपेक्षा जास्त किंवा तीन ते सात थर (वेगवेगळ्या पॅकेजिंग मटेरिअलचे) मिळून लॅमिनेट्‌स तयार होत असतात. पेपर/ ऍल्युमिनियम फॉईल/ एलडीपीई (लो डेन्सिटी पॉलिइथिलीन) फिल्म अशा प्रकारच्या लॅमिनेटमध्ये खवा पॅक केल्यास ते पॅकेट 37 अंश से. तापमानास ठेवल्यास दहा दिवसांपर्यंत, तर हेच पॅकेज रेफ्रिजरेटरला ठेवल्यास 60 दिवसांपर्यंत खवा आपले गुणधर्म उत्तम राखेल. पॉलिइथिलीनमध्ये खवा पॅक करून 7+1 अंश से. तापमानास ठेवल्यास टिकण्याची क्षमता 25 दिवसांपर्यंत असते.

बर्फी, पेढा

  • बर्फी गरम अवस्थेत निर्जंतुक केलेल्या पॉलिस्टर टब (250 ग्रॅम) मध्ये भरून मल्टिलेअर नायलॉन पाऊचमध्ये हवाबंद पॅक केल्यास 30 अंश से. तापमानास 52 दिवसांपर्यंत टिकते. यामध्ये हवाबंद पॅकिंग न करता 30 अंश से. तापमानास साठवल्यास बर्फी 16 दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहते.
  • सर्वसाधारण पॅकेजमध्ये साधारण तापमानाला पेढा (25-30 अंश से.) दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. निर्जंतुक केलेल्या श्रिंक रॅपमध्ये तीन आठवड्यांपर्यंत पेढे टिकतात. कार्डबोर्डमध्ये (आतून पर्ल फिल्म) 5 अंश से. तापमानास पेढे 30 दिवसांपर्यंत टिकवता येतील.

रसगुल्ला, गुलाबजामून

  • दोन्ही पदार्थ बाजारात टिन कॅन्समध्ये मिळतात; परंतु हे कॅन्स आतून लॅकर्ड असायला हवेत. यामुळे अन्नपदार्थ व कॅनचा थेट संपर्क न होता पदार्थ खराब होणार नाही. गुलाबजामून, रसगुल्ला या प्रकारच्या कॅन्समध्ये साधारण तापमानाला 180 दिवसांपर्यंत टिकतात.
  • पॉलिस्टरीन कपमध्ये पॅक केलेले गुलाबजामून 5 अंश तापमानास 30 दिवसांपर्यंत राहू शकतील. रसगुल्ले टिनमध्ये पॅक करताना रसगुल्ला व साखरेच्या पाकाचे प्रमाण 40-60 ठेवल्यास व पदार्थ गरम अवस्थेत टिन (निर्जंतुक) मध्ये भरल्यास (पदार्थ तापमान 90 अंश से.) तो सहा महिन्यांपर्यंत अंगभूत गुणधर्म टिकवून ठेवू शकतो. गुलाबजामून साखरेच्या पाकात सर्वसाधारण तापमानास 5-7 दिवस भरल्यास टिकवण्याच्या क्षमतेत वाढ करता येईल.

पनीर

साधारण तापमानास (30+3 अंश से.)
  • पनीर एक दिवस किंवा त्याहीपेक्षा कमी टिकते. रेफ्रिजरेटर (पाच ते सात अंश से.) तापमानास पनीर सहा दिवस टिकत असले तरी त्याचा पृष्ठभाग 3 दिवसांनी पिवळा पडण्यास व पनीर थोडे कडक होण्यास सुरवात होते. हे टाळण्यासाठी पनीर ऍल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केल्यास रेफ्रिजरेशन तापमानास सहा दिवसांपर्यंत उत्तम स्थितीत टिकते.
  • स्वच्छ उत्पादनाचे तंत्र वापरून तयार केलेले पनीर बाजारात सहज मिळणाऱ्या क्‍लिंग फिल्ममध्ये पॅक केल्यास ते एक आठवडा ते बारा दिवसांपर्यंत (रेफ्रिजरेशन तापमानाला) चांगले राहते. श्रिंक फिल्ममध्ये पॅक केलेले पनीर रेफ्रिजरेटर तापमानाला 16 दिवसांपर्यंत टिकते.
  • पनीरचे छोटे तुकडे करून ते टीन कॅनमध्ये पॅक करून टिन कॅनना 15 मिनिटांसाठी ऑटोक्‍लेव्हिंग केले (प्रेशर कुकरसारखे), तर 25-30 अंश से. तापमानास सदर टिन कॅन्समधले पनीर 50 दिवसांपर्यंत टिकते.
  • पनीर पाच टक्के मिठाच्या द्रावणात बुडवून ठेवल्यास ते 6 अंश से. तापमानास 12 दिवसांपर्यंत टिकेल. इव्हीए/.........इव्हीए/ इव्हीडीसी/ एव्हीए अशा प्रकारच्या चार विशिष्ट फिल्ममध्ये पॅक केल्यास रेफ्रिजरेशन तापमानाला 90 दिवसांपर्यंत पनीर टिकवता येते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले.


दही

दह्यासाठी पॉलिस्टरीनचे कप बऱ्याच ठिकाणी वापरतात. पॉलिप्रोपॅलीन, पीव्हीसी यांचाही वापर करता येईल. पॉलिस्टरीन किंवा पॉलिप्रोपॅलिनच्या कपात दही पॅक करून 5 अंश से. तापमानास फ्रिजला ठेवल्यास, ते सात दिवसांपर्यंत टिकू शकते.

बासुंदी

  • बासुंदीची सर्वसाधारणपणे टिकण्याची क्षमता ही 37 अंश से. तापमानास 2 ते 3 दिवस आहे. 4 अंश सेंटिग्रेड तापमानास बासुंदी 10-15 दिवसांपर्यंत टिकते. ऍल्युमिनियम फॉईलमध्ये 5 अंश से. तापमानास ठेवलेली बासुंदी 30 दिवसांपर्यंत उत्तम स्थितीत राहील.
  • काचेच्या बाटलीत किंवा पॉलिप्रोपॅलीन कपमध्ये पॅक केलेली बासुंदी 7 अंश तापमानास 25 दिवसांपर्यंत टिकते. याच प्रकारात पॅकिंग करून 90 अंश से. तापमानास 10 मि. ठेवल्यास टिकवण्याची क्षमता 15 दिवसांनी वाढवता येईल.

श्रीखंड

30 अंश सेल्सिअस तापमानाला ठेवलेले श्रीखंड 2-3 दिवसांत खराब होते. परंतु रेफ्रिजरेशनला (40 अंश से.) ठेवलेले श्रीखंड 40 दिवसांपर्यंत रंग, चव इत्यादी टिकवून ठेवते. श्रीखंडासाठी पॉलिस्टरीन आणि पॉलिप्रोपॅलिनमध्ये पॅक करून 10 अंश सें.ग्रे.ला. ठेवलेले श्रीखंड 180 दिवसांपर्यंत टिकवता येते.

लस्सी

एलडीपीई (60-80 मायक्रॉन) पाऊचमध्ये पॅकिंग करून 5 अंश से. तापमानास ठेवलेली लस्सी 7 दिवसांपर्यंत टिकवता येईल.

दुग्ध पदार्थांसाठीचे पॅकेजेस

दुग्धपदार्थ - पॅकेजचा प्रकार

दुग्धपदार्थ पॅकेजचा प्रकार
सुगंधी दूध, लस्सी एलडीपीई, एचडीपीई, टिन कॅन, काचेच्या बाटल्या
तूप, आटवलेले दूध, दही, श्रीखंड पॉलिप्रोपॅलिन, पॉलिस्टरीन
पेढा, बर्फी, कलाकंद, चीज, चोकोबार कार्डबोड बॉक्‍स, वॅक्‍स कोटेड पेपर इ.
गुलाबजामून, रसगुल्ला, तूप, पनीर टिन कॅन, लॅमिनेटेड पाऊच, एचडीपीई इत्यादी.

 

संपर्क: डॉ. धीरज कंखरे 9405794668
(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate