कोकम सोल (आमसूल) -
कोकमसोल तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, लाल, ताजी, टणक अशी फळे निवडून घ्यावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन कापडाने कोरडी करून गर व साली वेगवेगळ्या ठेवाव्यात. बिया आणि गराच्या मिश्रणाचे वजन करून घ्यावे आणि त्यामध्ये दहा टक्के या प्रमाणात (एक किलो गरासाठी 100 ग्रॅम मीठ) मीठ मिसळावे. मीठ आणि गर विरघळून त्याचे द्रावण तयार होईल, ते गाळून त्यातील बिया वेगळ्या कराव्यात. या द्रावणामध्ये कोकमाच्या साली रात्रभर बुडवून नंतर 24 तास उन्हात सुकवाव्यात. याप्रमाणे चार ते पाच वेळा साली रसात बुडवून सुकवाव्यात. शेवटी त्या 50 ते 55 अंश सेल्सिअस तापमानात ड्रायरमध्ये किंवा उन्हामध्ये सुकवाव्या. रात्री या साली उघड्यावर ठेवू नयेत. अशाप्रकारे सुकविलेले कोकम सोल प्लॅस्टिकच्या पिशव्यांत हवाबंद करून कोरड्या आणि थंड जागेत साठवून ठेवावे.
अमृत कोकम -
अमृत कोकम बनविण्यासाठी उत्तम प्रतीची चांगली पक्व झालेली ताजी टणक फळे निवडावीत. फळे स्वच्छ पाण्यामध्ये चांगली धुऊन घ्यावीत. नंतर फळे कापून त्यांचे चार किंवा आठ समान भाग करावेत. बिया बाजूस काढून घ्याव्यात. साखरेचे 1ः2 या प्रमाणात घ्यावे. कोकण साली आणि साखर यांचे एकावर एक थर देऊन काचेच्या बरणीत भरून ठेवावे. पंधरा दिवसांनी तयार झालेले अमृत कोकम निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरून ते थंड आणि कोरड्या जागी ठेवावे. अमृत कोकमचा आस्वाद घेण्यापूर्वी त्यात 1ः5 किंवा 1ः6 या प्रमाणात पाणी मिसळावे. चवीसाठी चिमूटभर जिरा पावडर व चिमूटभर मीठ पेयामध्ये (200 मि.लि.) मिसळावे.
कोकम आगळ -
पिकलेल्या कोकम फळांच्या साली व गर आणि मीठ यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात येणाऱ्या रसास कोकण आगळ असे म्हटले जाते. मिठाचे प्रमाण 16 टक्के या प्रमाणात वापरले असता कोकम आगळ वर्षभर किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी चांगले राहू शकते. कोकम आगळ तयार करण्यासाठी पिकलेली, लाल ताजी टणक कोकम फळे निवडून घ्यावीत. फळे उभी आणि आडवी कापून त्याचे चार किंवा आठ भाग करावेत. साली किंवा गराचे वजन करून घ्यावे आणि त्यामध्ये 16 ते 20 टक्के (एका किलोस 160 ते 200 ग्रॅम) बारीक मीठ घालावे. कोकम साली + गर + मीठ यांचे मिश्रण चांगले हलवून घ्यावे. रस सुटण्यासाठी ते तीन दिवसांपर्यंत तसेच ठेवून घ्यावे. त्यानंतर मिश्रण गाळून घ्यावे. मिश्रणापासून तयार झालेला रस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावा. या बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
संपर्क - 02358- 282415, विस्तार क्र. -250, 242
उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली
महेंद्र धुमाळ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग
माहिती संदर्भ : अॅग्रोवन