युरोप खंडात शेतशिवारापर्यंत चांगले रस्ते दिसतात. येथील शेतकऱ्यांनी विजेची स्वतःच्या शेतावरच निर्मिती, थेट विक्री व्यवस्था, कृषी प्रक्रिया, दूध प्रक्रिया, यांत्रिकीकरण या माध्यमातून उत्पादकता आणि गुणवत्ता यांचे सातत्य राखले आहे.
युरोपमधील शेतकरी द्राक्षे, भाजीपाला, पशुपालन, कृषी प्रक्रिया उद्योग हे व्यावसायिक पद्धतीनेच करतात. सहा महिने कडाक्याची थंडी, केवळ सहा महिन्यांचा पीक उत्पादन कालावधी, अत्यंत कमी लोकसंख्या, त्यामुळे मजुरांची टंचाई, अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडत येथील शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेत स्वतःचे वेगळेपण जपले आहे.
अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही हॉलंडमधील गुलाब शेती असलेल्या एका गावाला भेट दिली. येथील शेतकरी उत्तर युरोपातून गुलाबाचे बी आणून त्याची रोपे तयार करतात. त्यातील दर्जेदार रोपांची निवड करून मुख्य शेतात लागवड केली जाते. गुलाबाचे कलम करताना, डोळा बांधताना तेथे रबर बांधून वापरायला एक छोटी सोपी अशी क्लिप लावली जाते. त्यामुळे डोळे बांधण्याचे काम अत्यंत कमी वेळात आणि कमी श्रमांत केले जाते. येथे हिवाळा अत्यंत कडक असतो. त्यापूर्वी गुलाब झाडांची छाटणी केली जाते. त्या काळात झाडे सुप्तावस्थेमध्ये जातात. वसंत ऋतूनंतर झाडांना पालवी आणि फुलोरा येतो.
1) या गावातील गुलाब उत्पादक दर वर्षी गुलाब महोत्सवाचे आयोजन करतात. संपूर्ण गावात गुलाब फुले, गुलाब वेलींचा वापर करून वेगवेगळ्या सजावटी केल्या जातात.
2) गुलाबापासून बनविलेले पोशाख धारण केलेली माणसे, कार्टून, नक्षीकाम, गुलाबाच्या फुलांनी मढविलेल्या कमानी, छत्र्या अशा अनेकविध पद्धतींनी संपूर्ण गाव सुशोभित केले जाते.
3) महोत्सवामध्ये गुणवत्तापूर्ण गुलाब फुले, रोपे, सुगंधी द्रव्ये, अत्तरे, गुलकंद, वाळलेल्या पाकळ्यांचा वापर करून केलेल्या उत्पादनांची विक्री केली जाते.
4) महोत्सवाचे जवळपास दहा वर्षांचे वेळापत्रक तयार आहे. जगभर महोत्सवाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येते.
5) जगभरातील पर्यटक, गुलाबतज्ज्ञ, डिझायनर्स, व्यापारी, गुलाब प्रक्रिया उत्पादनांचे ग्राहक येथे भेटी देतात. यादरम्यान अनेक व्यापारी सौदे होतात. शेतकरी व ग्राहक, दोघांचाही त्यात फायदा होतो.
या महोत्सवामध्ये स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते.
6) आपल्या राज्याच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास ज्या गावांमध्ये 60 ते 70 टक्के एकच पीक/ फळा-फुलांचे/ भाज्याचे उत्पादन होते, त्या ठिकाणी असे महोत्सव आयोजित करता येतील.
1) अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही बेरकेनफील्ड येथे एका सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेताला भेट दिली. या शेतकऱ्याने दोन बायोगॅस प्रकल्प उभारले होते. या बायोगॅसचा वापर त्याने वीजनिर्मितीसाठी केला होता. यामध्ये तयार झालेली वीज खासगीरीत्या विकली जाते. या प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यास अर्थसाह्य केले होते.
2) बायोगॅस संयंत्रामध्ये शेतातील गवत, मका, काडीकचरा, शेणाचा वापर करण्यात येतो. गरजेनुसार परिसरातील शेतकऱ्यांकडून गवत, काडीकचरा, शेणही विकत घेतले जाते. त्याचप्रमाणे जवळपासच्या प्रक्रिया उद्योगातील टाकाऊ माल, हॉटेल, तसेच इतर ठिकाणचा ओला कचरा हा शेतकरी स्वखर्चाने उचलतो. प्रक्रिया उद्योगातील टाकाऊ माल उचलण्यासाठी संबंधितांकडून मोबदलाही देण्यात येतो. त्यामुळे ज्या वेळी शेतातील हिरवा काडीकचरा उपलब्ध नसतो, त्या वेळी अशा ठिकाणांहून येणाऱ्या टाकाऊ मालावर बायोगॅस प्रकल्प नियमितपणे चालू राहतो.
3) या शेतकऱ्याने बायोगॅस प्रकल्पाच्या शेजारीच मोठा जेनरेटर सेट उभारलेला होता. त्या ठिकाणी ग्रिड टाकलेले होते. तेथून विजेचे उत्पादन व पुरवठा केला जातो.
न्युटरस्टॅडेट या ठिकाणी आम्ही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याच्या शेताला भेट दिली. शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब शेतीसंबंधित कामांमध्ये सहभागी होते. त्याची पत्नी शेतमालाची विक्री आणि खर्चाच्या व्यवहाराची जबाबदारी अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळत होती.
1) हा शेतकरी कोबी, फ्लॉवर, कांदा, बटाटा, टोमॅटो, झुकिनी, तसेच इतर अनेक भाज्यांची हंगाम आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार लागवड करीत होता. मजूरटंचाईमध्ये शेती व्यवस्थापनामध्ये यंत्राचा जास्तीत जास्त वापर केला जातो. शेतकऱ्याने ग्रीन हाऊसमध्ये टोमॅटो, रंगीत ढोबळी मिरची लागवड केली होती.
2) शेतामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व भाज्यांची स्वच्छता, प्रतवारीसाठी शेतकऱ्यांने ग्रेडिंग आणि पॅकिंग सेंटर स्वतःच्या शेतावर उभारले होते. बॉक्समध्ये पॅकिंग करून सर्व भाज्या शीतगृहामध्ये ठेवण्यात येतात.
3) शीतगृहाच्या जवळ काही भाज्यांची प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे, तर काही भाज्या इतर प्रक्रिया उद्योजकांकडून प्रक्रिया करून घेऊन स्वतःच्या "ब्रॅंड'ने हा शेतकरी बाजारपेठेत पाठवीत होता.
4) स्वतःच्या गरजेइतकाच शीतगृहाचा आकार ठेवल्याने त्या शेतकऱ्याला शीतगृहाचा खर्च परवडत होता. या शेतकऱ्याकडे स्वतःची रेफ्रिजरेटेड व्हॅन होती. व्हॅनमधून हा शेतकरी शहरातील मॉलमध्ये भाजीपाला पाठवितो. काही हॉटेल व्यावसायिकांसाठी हा शेतकरी भाजीपाला पुरवितो.
5) शेतकऱ्याचे शिक्षण हायस्कूलपर्यंतच झालेले होते, परंतु शेतीचे नियोजन, यंत्रांची देखभाल, ग्रीन हाऊसमधील पिकांचे व्यवस्थापन, उत्पादित शेतमालाची विक्री याबाबतचे सर्व तंत्रज्ञान या शेतकरी कुटुंबाने अवगत केले होते.
परपिग्नन येथे शेतकऱ्याच्या डोमिन डी ला डिस्टिन्सी या वायनरीला आम्ही भेट दिली. द्राक्ष बागेतच शेतकऱ्याने घर बांधले होते. या घराच्या आसपास कित्येक किलोमीटरपर्यंत द्राक्ष लागवडीचे मोठे क्षेत्र होते. घराशेजारी या शेतकऱ्याने वायनरी उभारली होती. या वायनरीमध्ये हा शेतकरी स्वतःच्या शेतातील द्राक्षांपासून स्वतः वाइन तयार करतो. द्राक्षाची जात, त्यामध्ये मिसळलेले पदार्थ, साठवण्याचा कालावधी, तसेच गुणवत्तेचे सर्व निकष पाळून हा शेतकरी दर्जेदार वाइननिर्मिती करीत होता. या शेतकऱ्याकडे अत्यंत जुन्या, तसेच विविध स्वादाच्या वाइनचा साठा होता. तयार होणाऱ्या वाइनची विक्री स्वतः शेतकरी करतो. त्यामुळे या शेतकऱ्याला वाइन उद्योगामध्ये चांगला फायदा होतो.
वाइन तयार करण्याच्या प्रक्रियेत तयार होणारे टाकाऊ घटकांचे कंपोस्ट खत तयार करून द्राक्ष बागेसाठी वापरले जाते. सेंद्रिय खतामुळे जमिनीची प्रत चांगली राहते, त्यामुळे द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यास मिळते.
गिरोना येथील एका अद्ययावत डेअरी फार्मला आम्ही भेट दिली. सदर डेअरी फार्म एका शेतकऱ्याच्या मालकीचा होता. त्यामध्ये 800 गाई, तसेच कालवडी, गोऱ्हे मिळून एकूण 1000 पेक्षा जास्त जनावरे होती. या फार्मवर गाईंचे यांत्रिक पद्धतीने दूध काढण्यासाठी स्वतंत्र मिल्क पार्लर होते. यामध्येच संकलित झालेले दूध योग्य पद्धतीने साठविण्याची यंत्रणा होती. दूध पिशवीबंद होऊनच स्थानिक बाजारपेठेत, तसेच परिसरातील शहरांमध्ये दूध विकले जात होते. दूध विक्रीची किंमत उत्पादन खर्चाचा विचार करून स्वतः शेतकऱ्याने ठरविली होती. शेतकरी व त्याची दोन उच्चशिक्षित मुले डेअरी उद्योग अत्यंत जबाबदारीने सांभाळतात. गोठ्याची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने केली जाते. गोळा केलेले शेण, मूत्र हे गोठ्यातून थेट बायोगॅस संयंत्रामध्येच पाठविले जात होते. दिवसातून चार वेळा गोठा स्वच्छ केला जात असल्याने जनावरांचे आरोग्य चांगले होते. गोबरगॅस संयंत्रातून शेतकरी स्वतः वीजनिर्मिती करतो, त्यामुळे त्याच्या गरजेइतकी वीज वापरून हा शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांना वीज विकतो. या शेतकऱ्याला बायोगॅस प्रकल्पासाठी शासकीय अनुदान मिळाले होते. या डेअरी फार्ममध्ये वर्षाला सुमारे 1,35,000 लिटर दुधाचे उत्पादन होते.
1) गुणवत्ता व उत्पादकता यांचे सातत्य राखताना युरोपामधील शेतकऱ्यांना नैसर्गिक व अनैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा वेळी शेतकरी गट एकत्र येऊन वीजनिर्मिती ते कृषिमालाच्या विक्री व्यवस्थापनापर्यंत खासगी उद्योगधंद्यांची उभारणी करीत आहेत. त्यामुळे येथे कृषी व्यवसाय स्थिरावला आहे.
2) बार्सिलोना येथील बाजारपेठेत फेरफटका मारताना आम्ही एका स्थानिक सुपर मार्केटमध्ये गेलो. त्या ठिकाणी फळे, भाज्या, मासे, चिकन, मटण, पोर्क, अंडी, ब्रेड या उत्पादनांचा विभाग पाहिला. त्यांच्या किमती आपल्याकडील किमतींच्या किमान चार-पाच पट दिसून आल्या. कोथिंबिरीच्या चार काड्यासुद्धा व्यवस्थित पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्याची किंमत एक डॉलर होती. बाकी इतर भाज्यांच्याही किमतीबाबत हीच परिस्थिती आहे. या बाजारपेठेत निर्यातीला चांगली संधी आहे, परंतु या बाजारपेठेसाठी त्यांच्या नियमांनुसार गुणवत्तापूर्ण उत्पादनाची गरज आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नाविन्यपूर्ण नवनवीन संकल्पनांची नियोजनबध्द आखणी कर...
बारड (जि. नांदेड) परिसर पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिद...
सर्कलवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावातील शेत...
शासनाने बचत गटांच्या उत्पादनांसाठी विविध ठिकाणी प्...