सर्कलवाडी हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील छोटेसे गाव. जिल्ह्याचा कायम दुष्काळी भाग म्हणून हा भाग परिचित आहे. या भागातील वर्षाचे सरासरी पर्जन्यमान 300 ते 400 मि.लि. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांची शाश्वत हमी नसल्याने पूर्वी लोक रोजगार आणि विद्यार्थी शिक्षणासाठी शहराकडे स्थलांतरित झाले होते. मात्र गेल्या काही वर्षांत विविध विभागांत आणि व्यवसायानिमित्ताने गावाबाहेर असलेल्या गावकऱ्यांनी आता गावाच्या प्रगतीमध्ये हातभार लावला आहे. त्यामुळे ग्राम विकास आणि शेतीमध्ये आश्वासक बदल दिसत आहेत. तरुण शेतकरी पाणी व्यवस्थापन आणि पीक बदलाकडे वळले. शेतकऱ्यांचे प्रयत्न पाहून कृषी विभागानेही विविध योजना गावात राबविण्यास सुरवात केली. ज्वारी, बाजरी पिकविणारे गाव आता फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ओळखले जाऊ लागले आहे.
कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी सचिन लोंढे गावातील कृषी प्रगतीबाबत म्हणाले, की गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी महाबळेश्वरसारखेच स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन दाखविले. काही गुंठे क्षेत्रावर असलेली स्ट्रॉबेरी आता शंभर एकरावर पोचली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादकांनी गट तयार झाल्याने लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचे प्रश्न सुटलेले आहेत. सामूहिक प्रयत्नातून सर्वच शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळत आहे. स्ट्रॉबेरीच्या बरोबरीने ढोबळी मिरची लागवडही सुधारित पद्धतीने केली जाते. दर्जेदार उत्पादनामुळे मिरचीलाही पुणे, मुंबई बाजारपेठेतून चांगली मागणी आहे. हा भाग अवर्षणप्रवण पट्ट्यात येत असल्याने पिकांना संरक्षित पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाच्या योजनेतून 40 शेततळी गावात झाली आहेत. यातील 12 शेततळ्यांमध्ये योजनेच्या माध्यमातून प्लॅस्टिक आच्छादन कागद टाकण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साठवणक्षमता वाढलेली आहे. शेतकरी पावसाळ्यात नाल्यातून वाहणारे पाणी, तसेच विहिरीतील पाणी शेततळ्यात भरून घेतात. या पाण्याचा वापर फेब्रुवारी ते जून महिन्यांच्या काळात पिकांना संरक्षित पाणी म्हणून केला जातो. संरक्षित पाण्यामुळे फळबाग, फुलशेती आणि भाजीपाला पिकांचे चांगले उत्पादन मिळत आहे.
गावातील शेतकऱ्यांकडे जमिनीचे क्षेत्र एक एकर ते पाच एकरापर्यंत आहे. एकट्या शेतकऱ्याला पीक लागवड ते विक्रीचे नियोजन करणे अवघड जाते. हे लक्षात घेऊन गावात आता स्ट्रॉबेरी, ढोबळी मिरची उत्पादकांचे गट तयार झाले आहेत. या गटाच्या माध्यमातून रोपे, आच्छादन पेपर, खतांची खरेदी केली जाते. वेळोवेळी पीक व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. कृषी विभाग आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून हंगामनिहाय चर्चासत्र, शिवारफेरीचे आयोजन होते. कृषी विभागाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत स्ट्रॉबेरी क्षेत्र विस्तार योजना 20 हेक्टर क्षेत्रावर राबविली आहे. त्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. योजनेअंतर्गत अनुदानावर 60 शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर पुरविण्यात आला आहे. सध्या पाच हेक्टर क्षेत्रावर कंदवर्गीय फुलशेती योजनेअंतर्गत दहा शेतकऱ्यांनी ग्लॅडिओलस लागवडीचे नियोजन केले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत 23 हेक्टर क्षेत्रावर नव्याने भगवा डाळिंबाची लागवड झालेली आहे.
गेल्या वर्षी गावात गतिमान कडधान्य कार्यक्रमांतर्गत 17 हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड करण्यात आली होती. याअंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा लागवडीचे सुधारित तंत्र, एकात्मिक कीड व रोगनियंत्रण, पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे एकरी चार क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन आठ क्विंटलवर पोचले. खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, जिवाणू संवर्धकांचा वापराबाबत प्रक्षेत्रावर प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे जिवाणू संवर्धकांच्या वापराबाबत शेतकरी जागरूक झाले आहेत. आंतरमशागतीसाठी कृषी विभागाने सायकल कोळपी उपलब्ध करून दिली आहेत. पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने आता पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालनाला चालना देण्यात आली आहे. या माध्यमातून भूमिहीन, अल्पभूधारक तसेच महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. गावात आता कृषी वाचनालय, व्यायामशाळांची उभारणी होत आहे. तसेच गावातील मुख्य चौकांमध्ये सौर दिवे लावण्यात येत आहेत. गावातील देवळांमध्ये असलेल्या स्पीकरच्या माध्यमातून वेळोवेळी शिवारफेरीविषयी माहिती दिली जाते.
पीक बदलामुळे गावातील दोन तरुणांनी कृषी निविष्ठा, स्ट्रॉबेरीसाठी पनेट, मल्चिंग, पनेट, बॉक्स विक्रीसाठी दुकान सुरू केले आहे. भाजीपाला, फळांच्या वाहतुकीसाठी काही तरुणांनी पिकअप गाड्या घेतल्या आहेत. यामुळे परिसरातील चार गावांना फायदा झाला आहे. सर्कलवाडी गावातून वाई- वाठार हा रस्ता जातो. या रस्त्यावर महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहतूक असते. त्यामुळे गावातील स्ट्रॉबेरी, द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांनी बागेच्या बाहेर 15 स्टॉल उभे केले आहेत. हंगामात दररोज किमान एक टन द्राक्षांची विक्री स्टॉलच्या माध्यमातून होते. सप्टेंबर ते जूनपर्यंत विक्रीचा हंगाम सुरू राहतो. फळबाग, भाजीपाला लागवड वाढल्याने गावात वर्षभर बाहेर बागांतून 150 मजूर रोजगारासाठी येतात. गावात आता वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे. कृषी विभागाच्या योजनेतून गावात शेतीमालाच्या प्रतवारी आणि पॅकिंगसाठी पॅकहाऊस उभारणी सुरू झाली आहे.
गावातील स्ट्रॉबेरी उत्पादक एकत्र येत आहेत. या माध्यमातून रोपे, खते, पॅकिंग मटेरिअल, वाहतूक असे नियोजन होत आहे. या गावातून पुणे, मुंबईच्या बरोबरीने अहमदाबाद, चेन्नई, बंगळूर या बाजारपेठांत स्ट्रॉबेरी विक्रीला जाते. हे शेतकरी आता सर्कलवाडी स्ट्रॉबेरी उत्पादक संघाची स्थापना करणार आहेत. या संघाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजना, प्रक्रिया उद्योगाची उभारणी येत्या काळात होणार आहे. गुणवत्तेमुळे परराज्यांतही सर्कलवाडीच्या स्ट्रॉबेरीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
पावसाळ्यात ओढे, नाल्यातून पाणी तसेच वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी गावात कृषी विभागातर्फे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत जल-मृद्संधारणासाठी शेतातील सलग समतल चर, सिमेंट नाला बांध, मातीनाला बांध यांचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या अभियांत्रिकी योजनेअंतर्गत गावामध्ये मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर मिळाला आहे. याबाबत माहिती देताना माजी सरपंच सचिन सावंत म्हणाले, की गावातील श्रीराम कृषी विज्ञान मंडळाकडे याची जबाबदारी आहे. या ट्रॅक्टरबरोबरीने रोटाव्हेटर, पलटी नांगर घेतला आहे. समूह शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर हा ट्रॅक्टर मशागतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाजारभावापेक्षा कमी खर्चात आता शेतीची मशागत होणार आहे. गावातच ट्रॅक्टर उपलब्ध झाल्याने मशागतीचा खोळंबा होणार नाही.
या गावातून शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी एकत्र येत गावाच्या विकासात आपला वाटा उचललेला आहे. याबाबत माहिती देताना गावचे सुपुत्र आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, की माझी या गावात शेती आहे. माझ्या कृषी शिक्षणाचा गावाच्या प्रगतीसाठी उपयोग होण्यासाठी मी 1.25 कोटी लिटर साठवणक्षमतेचे शेततळे उभारून सुधारित तंत्राने स्ट्रॉबेरी, ढोबळी मिरची, टोमॅटो लागवड स्वतःच्या शेतात सुरू केली. हरितगृहात रंगीत मिरची, जरबेरा लागवड केली. आता डाळिंब, सीताफळ लागवड झाली आहे. गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून नवीन तंत्रज्ञानाचा ओळख करून दिली. कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा संवाद वाढविला. आज शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून वार्षिक आर्थिक उत्पादकता दहा हजारांवरून एक लाखापर्यंत वाढली आहे. आज गावातील सुमारे 25 जण कृषी विभाग, महसूल विभाग, वकील, सैन्यदल, आयटी, डॉक्टर अशा विविध क्षेत्रात चांगल्या पदावर आहेत.
गावाच्या विकासात आपले योगदान देण्यासाठी आम्ही सर्वजण गेल्या वर्षी एकत्र आलो. दर रामनवमीला एकत्र येऊन इच्छेप्रमाणे रक्कम जमा करतो. गेल्या वर्षी आम्ही चार लाख रुपये जमविले. या पैशाचा विनियोग शाळेसाठी बेंच खरेदी, कूपनलिकेसाठी मोटार खरेदी, शिष्यवृत्ती, शाळेसाठी कुंपण यासाठी केला. दरवर्षी गावाच्या गरजेप्रमाणे योग्य ठिकाणी रक्कम खर्च करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. गावाला निर्मल ग्राम, तंटामुक्ती पुरस्कार मिळाला आहे. आता हरितग्राम योजनेच्या दिशेने नियोजन सुरू केले आहे. गावातील सोसायटीच्या माध्यमातून बाळासो भोईटे हे पुढाकार घेतात. गावातील सोसायटीला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतर्फे गावात सुमारे 40 योजनांमार्फत पतपुरवठा केला जातो. आज तीन कोटीपर्यंत कर्जपुरवठा झाला आहे. आम्हाला विकास पाटील (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी), कृष्णराव धुमाळ (उपविभागीय कृषी अधिकारी), प्रकाश सूर्यवंशी (तालुका कृषी अधिकारी), सचिन लोंढे (मंडळ कृषी अधिकारी) आणि कृषी सहायक श्री. फडतरे यांचे सहकार्य मिळते.
संपर्क : डॉ. सरकाळे : 9850586220
सचिन लोंढे (मंडळ कृषी अधिकारी) : 9423327984
माहिती संकलन : श्री. दत्तात्रय उरमुडे
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...