महाराष्ट्रातील बारड (जि. नांदेड) परिसर पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिद्ध होता. मध्यंतरी बुरशीजन्य रोगाच्या समस्येतून या भागातील पानमळा शेती बंद पडली; परंतु अलीकडील वर्षांत गोविंद उपवार यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी या पिकाच्या शेतीसाठी पुन्हा पुढाकार घेतला. केवळ तीस गुंठे शेतीत पानवेलीच्या व्यवस्थापनातून त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय केली आहे.
नांदेडपासून सुमारे पंचवीस किलोमीटरवर पनवेल- निर्मल राष्ट्रीय महामार्गावर असलेले बारड (ता. मुदखेड) गाव शितला देवीचे धार्मिक स्थळ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणारा बारड परिसर बारमाही बागायती शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागाला मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्र या नावाने ओळखले जाते. येथे केळी, ऊस, हळद या पिकांसह फळबाग व भाजीपालाही पिकविला जातो. येथील शेतकरी नेहमी विविध प्रयोग करतो.
बारड परिसर पानमळ्यांसाठी (विड्याची पाने) सर्वदूर परिचित आहे. या भागात पानमळ्यांची संख्या मागील वीस वर्षांपूर्वी अधिक प्रमाणात होती. मध्यंतरी बुरशीजन्य रोगामुळे अनेक प्लॉट संपले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुन्हा बारड व चाभरा भागातील सुमारे वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी पानमळा लागवडीचा "विडा' उचलला आहे.
या भागात पाण्याची व्यवस्था असल्यामुळे हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून पानमळा शेतीकडे पाहिले जाते. येथील गोविंद उपवार यांची केवळ तीस गुंठे शेती. त्यात पानवेलीची लागवड करून त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला आहे.
उपवार पूर्वी दुसऱ्यांच्या पानमळा शेतीचे व्यवस्थापन पाहायचे. आता उपवार स्वतःच्या शेतातच पानमळा करतात. त्यांनी प्रत्येकी पंधरा गुंठ्यांचे दोन भाग करून एका भागात दोन वर्षांपूर्वी, तर दुसऱ्या भागात मागील वर्षी पानवेलीची लागवड केली. पंधरा गुंठे क्षेत्रासाठी पानवेलीच्या साडेतीन हजार ते चार हजार कांड्या लागतात. त्या चाभरा तसेच विडूळ (जि. यवतमाळ) येथून प्रतिकांडी साडेतीन रुपये याप्रमाणे विकत आणल्या.
पानवेलींना वरती चढवण्यासाठी आधाराची गरज असते, त्यासाठी शेवरीच्या झाडाची लागवड जून महिन्यात केली जाते.यानंतर तीन महिन्यांनी वेलींची लागवड केली जाते.
उपवार पानवेलींसाठी रासायनिक खतांचा जराही वापर करीत नाहीत, केवळ शेणखताचा वापर केला जातो. शक्यतो हिवाळ्यात पंधरा गुंठ्यांसाठी चार ट्रॉली शेणखत वेलींच्या बुंध्याजवळ टाकले जाते. त्यानंतर चार ट्रॉली लाल माती सरीवर पसरवली जाते. या मातीमुळे पानांना चांगली चमक येत असल्याचे ते म्हणतात.
पानवेलींना शेवरीच्या झाडावर बांधण्यासाठी सोनकेळीच्या सालीचा उपयोग केला जातो. यासाठी सोनकेळीची लागवड पानमळ्यात ठराविक अंतरावर केली जाते. साधारणत: दहा ते पंधरा फूट वाढणाऱ्या या सोनकेळीची साल काढून पाण्यात भिजविली जाते. त्यानंतर ती सुकवून, दोऱ्या काढून वेलींना सरळ जाण्यासाठी बांधले जाते. या सालीमुळे वेलींना इजा पोचत नाही. सोनकेळीत औषधी गुणधर्म असल्यामुळे डझनाला शंभर रुपये याप्रमाणे त्यांना दर मिळतो. एका वर्षात एका झाडापासून चारशे रुपये उत्पन्न मिळते, असे उपवार म्हणतात.
ओढ्याच्या काठावरील विहिरीचे पाणी पाइपलाइनद्वारे ठिबक सिंचनाने तसेच पाटाद्वारे दिले जाते. आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. उन्हाळ्यात दोन दिवसांच्या अंतराने, तर हिवाळा व पावसाळ्यात आठ दिवसांच्या अंतराने पाणी दिले जाते.
लागवडीनंतर सुमारे सहा महिन्यांनी पानांचे उत्पादन सुरू होते. सुरुवातीच्या सहा महिन्यांत महिन्याला दोन ते तीन तोडणी होतात. वर्षभरानंतर पावसाळी हंगामात दर आठ दिवसांनी तोडणी करता येते. एका तोडणीत सुमारे 70 ते 80 हजार पाने मिळतात. उन्हाळ्यात 10 ते 12 दिवसांनी, तर हिवाळ्यात 15 दिवसांनी तोडणी येते. पानांची तोडणी झाल्यानंतर त्यांची प्रतवारी करून गोल आकारात बांबूच्या टोपलीत प्रति टोपली दोन हजार पानांची मांडणी केली जाते. टोपल्या विक्रीसाठी परभणी, मनमाड, चांदवड, श्रीरामपूर, नागपूर आदी मार्केटना पाठवल्या जातात.
विड्याच्या पानाला त्याच्या चवीवरून दर मिळतो. फिक्कट पिवळा (पोपटी) रंग व चमक असल्यामुळे कपूरी पानाला बाजारात चांगली मागणी असते. परभणी, लोहा, औरंगाबाद भागात कळीदार पानाला; तर चांदवड, मनमाड, श्रीरामपूर आदी भागात कडक पानाला अधिक पसंती असते, त्यानुसार पानांची रवानगी केली जाते.
उपवार यांच्याकडील विड्याची पाने सेंद्रिय पद्धतीची असल्यामुळे त्यांना नैसर्गिक चव येते, त्यामुळे दरही चांगला मिळतो. आवक कमी असल्याने उन्हाळ्यात व हिवाळ्यात दर हजार पानांना दोनशे ते अडीचशे रुपये दर मिळतो. पावसाळ्यात तो दोनशे रुपयांपर्यंत असतो.
उपवार यांच्याकडील तीस गुंठे जमिनीवर लागवड केलेल्या पानमळ्यांची देखभाल करण्यासाठी दत्ता मुलंगे, किशन लालमे, नृसिंह कऱ्हाळे, सुभाष आमरे व गणपत कचरे या पाच पाडगेकरांचा समावेश आहे. पानमळ्यात पाणी व खत देणे, वेलींना बांधणे, शेवरीची छाटणी करणे, पानांची तोडणी करणे, प्रतवारी करणे आदी कामे त्यांना करावी लागतात. यातील नृसिंह यांच्या सूनबाई अनसूयाबाई स्वतः पंधरा फूट उंचीच्या शिडीवरून वेलींना सालीद्धारे बांधण्याचे काम करतात. ऑगस्ट व फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत उतरण (पाने वेलीवरून काढणे) केली जाते.
उपवार यांच्या तीस गुंठ्यांतील पानवेलींचे उत्पन्न वर्षाकाठी सुमारे दोन ते सव्वादोन लाख रुपयांपर्यंत जाते. महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपयांची पाने विक्री होतात (यात बदल होत राहतो). शेणखताच्या सहा ट्रॉलींसाठी तीस हजार रुपये, तीन गुंठ्यांसाठी कांड्यांसाठी सुमारे पंचवीस हजार, लाल मातीसाठी अकरा हजार व लागवड खर्च पाच हजार, शेवरीची लागवड चार हजार याप्रमाणे सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपये खर्च पहिल्या वर्षी येतो. लागवडीनंतर सुमारे तीन वर्षांपर्यंत उत्पादन घेणे चांगले, असे उपवार म्हणतात.
पानवेलींवर येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विभाग यांच्याकडून ठोस मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे, असे उपवार यांनी सांगितले. अलीकडेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील पानवेलींचा एक प्लॉट पूर्णपणे संपल्याचे ते म्हणाले.
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ ...
गावानं ठरवलं तर गावं किती चांगलं काम करू शकतात याच...
नांदेड सेफ सिटी' या प्रोजेक्टद्वारे शहरातील महत्त्...
नांदेड.. मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. ऐतिहा...