অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटक

आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटक

कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो. काही संकटांची आगावू चाहूल लागते तर काही संकटे अचानक येऊन मनुष्य जीवन उद्ध्वस्त करुन जातात आणि आपत्ती कोणतीही असो त्यामुळे जिवीत व वित्तहानी होतेच. आपत्ती काळात स्वत:चा, कुटुंबाचा, समाजाचा व गावचा बचाव करायचा असेल तर योग्य ती पूर्वतयारी, मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. यासाठी आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटकांची माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊ या….

आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रतिबंध, विमोचन, सज्जता, आपत्तीचा आघात, प्रतिसाद, पूर्ववत्तता व पुनरुत्थापन अशा प्रमुख घटकांमध्ये दर्शविली आहेत. प्रतिबंध या घटकातील सर्व कृती ह्या आपत्ती टाळण्याच्या दिशेने आखल्या जातात. तसेच आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेनेही नियोजन केले जाते. विमोचन या विभागातील सर्व कृती अशा तऱ्हेने आखलेल्या असतात, की येऊन गेलेल्या आपत्तीचा कमीत कमी परिणाम देशावर व लोकांवर होईल. सज्जता विभागामध्ये आखणी केली जाते की, कोणत्याही आपत्तीला त्वरीत व प्रभावी प्रतिसाद द्यायला शासन / प्रशासन, जनता व व्यक्ती तयार होतील. आपत्तीचा आघात या चक्रातील टप्प्याचे नावच सर्व गोष्टींचा खुलासा करते. ज्या वेळेस आपत्ती कोसळते ती वेळ म्हणजेच आपत्तीचा आघात आपत्तीव्यवस्थापन चक्रातील या टप्प्याचे अस्तित्त्वच या गोष्टीची सतत आठवण करुन देणे की आघाताची तीव्रता प्रत्येक आपत्तीमध्ये वेगवेगळी असते व ती त्या आपत्तीच्या तीव्रतेच्या सापेक्षच असते. या टप्प्यावरच बाकीचे सर्व व्यवस्थापन अवलंबून असते.

आघाताला प्रतिसाद द्या, आघात होण्यापूर्वी व झाल्यानंतर तात्काळ द्यावाच लागतो. फक्त मांडणीच्या सोयीसाठी या क्रमात तो आपत्तीच्या आघाताच्या टप्प्यानंतर लगेचच ठेवलेला आहे. कारण हीच वेळ अशी असते की, झाडून साऱ्या प्रतिसाद यंत्रणा कामाला लागतात. या टप्प्याला आपत्कालीन प्रतिसाद असेही म्हणतात. हा टप्पा हेच दर्शवतो की, आपत्तीचे विमोचन आणि निवारण लवकरात लवकर होण्याकरिता आपत्कालीन उपाय, निवास अथवा पुनर्वसनाकरता अवलंबले जातात. आपत्तीच्या तिव्रतेवरती प्रतिसाद अवलंबून असतो, म्हणजेच तिव्रता अधिक असेल तर वेळप्रसंगी शासन आणीबाणी किंवा युद्धसदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर करते व युद्धपातळीवर प्रतिसादात्मक उपायाचे आयोजन केले जाते.

पूर्ववत्तता या चक्रामध्ये आघातानंतर त्याच्या तीव्रतेनुसार जनजीवन विस्कळीत होते. काही प्रसंगात गावच्या गावे किंवा संपूर्ण शहरे उद्ध्वस्त होतात. अशा वेळेस जनजीवन पूर्ववत होण्यास म्हण्जेच आपत्तीपूर्व जसे होते तसे होण्यास जो काळ लागतो व पुनरुत्थापन हा टप्पा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रसंगी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. या टप्प्याने प्रयोजनास या चक्रामध्ये याच हेतूने करण्यात आलेले आहे, की आपत्तीच्या आघाताच्या राष्ट्राच्या हितासाठीच उपयोग व्हावा, जसे की, राष्ट्रीय योजनांची आखणी करतानाच आपत्तीचा व त्यातून उद्भवलेल्या बदलाचा राष्ट्रहितासाठी उपयोग करणे सुलभ व्हावे.

सुयोग्य आपत्कालीन नियोजनाच्या आखणीमध्ये पर्यायाला पर्याय ठेवणे हे जागतिक स्तरावर मान्यता पावलेले तत्व आहे. ज्या देशांच्या आपत्ती नियोजनाची आखणी केलेली नव्हती, अशा देशांना आपत्तीच्या आघाताची तीव्रता सर्वाधिक जाणवली, तर तिथे यासाठी सुनियोजित आखणी झालेली होती. अशा देशांना आपत्तीची तीव्रता कमीतकमी जाणवली. यावरुनच आपत्ती निवारणाच्या नियोजनाच्या आखणीचे महत्त्व आपल्या लक्षात येते. भविष्यकालीन आपत्तीचा वेध व त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांचे आयोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यायी आयोजनातील आखणीतील सुसूत्रता होय.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रथमोपचाराला महत्त्व देऊन जीवन वाचविणे, जखमी मनुष्याची स्थिती अधिक खालावण्यापासून रोखणे व स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करुन दुखापतीपासून आराम देणे व प्रत्यक्ष वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. अशा वेळी कोणतीही व्यक्ती ज्याने अधिकृत प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्राकडून प्रशिक्षण घेतले आहे असे प्रथमोपचार तज्ञाने वेगात पण शांत डोक्याने अचूकपणे आपले काम केले पाहिजे.

प्रथमोपचार तज्ञाची निरीक्षणशक्ती चांगली असावी, स्वत:चा जीव धोक्यात न घालता परिस्थितीचे निरीक्षण करुन निर्णय घ्यायची क्षमता असावी. आत्मविश्वासाने तणावाखाली काम करताना सुद्धा तो शांत राहू शकणारा असावा. त्याच्याकडे नेतृत्वगुण असावे. गर्दी नियंत्रित करणे, लोकांना सूचना देणे व बघ्याकडून मदत मिळविणे अवगत व्हावे. त्याला त्याच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव असावा. जखमी / रुग्णाच्या स्थितीवरुन त्याला त्याचा आजार ओळखता आला पाहिजे वा त्यानुसार वेळेत प्रथमोपचार केला पाहिजे.
त्यांच्याकडे उत्तम निर्णयशक्ती असावी. लोकांशी बोलण्याची कला चांगली अवगत पाहिजे. जखमीला, त्यांच्या काळजीत पडलेल्या नातेवाईकांना शांत करुन त्यांच्यात विश्वास जागृत करता आला पाहिजे. जरुरीपेक्षा जास्त आत्मविश्वास न दाखविता काम करावे, स्वत:च्या मर्यादा कळल्या पाहिजेत, गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना फाजील दिलासा देणे टाळता आले पाहिजे व आपले कौशल्य दाखवून प्रथमोपचारामध्ये नियमितपणे अचूक प्रथमोपचार पद्धती वापरता आली पाहिजे तरच आपत्कालीन नियोजनाची फलश्रुती मिळेल.

लेखक - आश्रुबा सोनवणे,
जिल्हा माहिती कार्यालय,
उस्मानाबाद
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate