অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एफडीआय : बहुराष्ट्रीय कंपन्या

एफडीआय : बहुराष्ट्रीय कंपन्या

बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे मुख्य कार्यालय एका देशात असते, पण ती अनेक देशांमध्ये काम करते. बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्याची मुख्यालये अमेरिका, युरोपियन युनियन, जपान अशा श्रीमंत देशांमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र तिसऱ्या जगातील देशांमध्येही बहुराष्ट्रीय कंपन्या उदयास आलेल्या दिसतात.

2006 च्या सुरुवातीला सिंगल ब्रँड रिटेलमध्ये (म्हणजे नोकिया, गुस्सी, रिबॉक वगैरे) 51 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला सरकारनं परवानगी दिली होती.  ती वाढवून 100 टक्के केली आहे तर मल्टी ब्रँडमध्ये 51 टक्के FDI ची परवानगी दिली आहे. वालमार्ट, टेस्कोसारख्या मोठ्या जागतिक ब्रँडला भारतीय किराणा बाजारपेठ खुली करायच्या गेल्या 20 वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालंय.

मल्टिब्रँड रिटेलमध्ये रिटेलिंग क्षेत्रातील बलाढय़ कंपन्यांना (उदाहरणार्थ - वॉलमार्ट, सिअर्स रोबूक, कारफोर, टेस्को इ.) भारतात बिग बाजारसारखे मॉल उघडता येतील. पण त्यासाठी त्यांना भारतातला एखादा स्थानिक भागीदार सोबत घ्यावा लागेल. अशा संयुक्त उपक्रमात विदेशी कंपनी ५१ टक्के भांडवल टाकेल. भारतीय भागीदार ४९ टक्के भांडवल लावील.

एफडीआयची चर्चा रंगलीय आणि त्या निमित्तानं सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे वाल-मार्ट.गेली 20 वर्ष बंगळुरुमध्ये वालमार्टचं मोठ्ठं जागतिक पुरवठा कार्यालय आहे. भारत आणि श्रीलंकेतल्या उत्पादका कडून टॉवेल-टेबलटॉपपासून दागिण्यांपर्यंत विविध उत्पादनं खरेदी करायची आणि जगभरातल्या वालमार्टच्या दुकानात पोचवायची हे काम या कार्यालया मधूनच अनेक वर्ष सुरु आहे. भारतात वालमार्टनं मित्तल यांच्या भारती एन्टरप्रायजेससोबत भारती-वालमार्ट प्रायवेट लिमिटेड या जॉईंट व्हेंचरची ‘बेस्ट प्राईस’ या नावानं मोठे 9 मॉल्स सुरु आहेत.

वालमार्टनं भारती रिटेलला तांत्रिक पाठबळ पुरवलं आहे, त्यामुळेच दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तराखंड राज्यात एप्रिल 2008 पासून भारती रिटेलची 139 सुपरमार्केट्स सुरु आहेत. वालमार्ट हे अमेरिकतल्या सॅम वाल्टनच्या संकल्पनेतून आणि अनुभवातून 1962 साली अस्तित्वात आलेलं मोठ्ठं किराणा दुकान किंवा दुकानांची साखळी आहे. या दुकानात साधारण टाचणी ते मोटारी अशी हजारो उत्पादनं एका छताखाली आणि किफायतशीर किंमतीला किंवा मोठ्या डिस्काऊंटवर मिळतात. वन स्टॉप शॉप ही संकल्पना जगभरातल्या ग्राहकांना प्रचंड भावली आणि अल्पावधीतच जगभरात वालमार्टचं जाळं पसरलं. आज 15 देशात 2000 पेक्षा वालमार्ट स्टोअर्स आहेत, त्या भागातली इकॉनॉमी वालमार्टनं बदलली आहे.

लेखक : अतुल पगार (मास्टर्स ऑफ जर्नालिझम)

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate