पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. परंतु आर्थिक पार्श्वभूमी चांगली नसल्यामुळे एखादा लहान उद्योग / व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी त्यांना काही अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या हेतूने पंतप्रधानांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरु केली. हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योजक बनण्याचा राजमार्गच आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 18 मार्च 2016 रोजी विधीमंडळाच्या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी केलेल्या भाषणामध्ये मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीतजास्त तरुणांना मिळावा यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वय करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल, या समितीच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करुन बँकांशी समन्वय साधण्यात येईल, त्यासाठी सन 2016-17 मध्ये रु. 20 कोटी नियतव्यय प्रस्तावित आहे, असा उल्लेख केला होता.
या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. या योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी खालील तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.
यासाठी मुद्रा बँक योजना ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू आणि होतकरु व्यक्ती आणि बेरोजगार यांना व्हावा. या हेतूने राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर समिती नेमून या समितीमार्फत योजनेचा प्रचार, प्रसार आणि समन्वय करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या समितीतील अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करतील. तसेच विशेष निमंत्रित म्हणून योजनेशी संबंधित क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तींना बैठकीच्यावेळी निमंत्रित करतील.
या योजनेच्या प्रसिद्धीसाठी आणि लोकांना आवाहन करण्याच्या दृष्टीने खाजगी व्यक्ती, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी उद्योजक, उद्योजकांच्या संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात येईल. चिकाटीने आणि मेहनतीने स्वत:च्या पायावर उद्योग व्यवसाय उभारलेल्या व्यक्ती व संस्था यांच्या यशकथा तयार केल्या जातील व त्या यशकथांना विशेष प्रसिद्धी देण्यात येईल.
लेखक - मनोज शिवाजी सानप,
जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/2/2020
पंखाना बळ आणि उडण्याची संधी मिळाली तर ग्रामीण भागा...
शेत ही देखील आपली उत्पादकताच आहे, असे ठासून सांगणा...
या माहितीपटात उद्योग म्हणजे काय नवउद्योजकांना कोणत...
रा.कृ.वि.यो अंतर्गत ग्रामीण भागात ठाणबंद पध्दतीने ...