অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी पर्यटनातून उद्योजक

कृषी पर्यटनातून उद्योजक

शेत ही देखील आपली उत्पादकताच आहे, असे ठासून सांगणाऱ्या संध्या बस्ते यांची यशकथा

झारवड बुद्रुक (ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक) या दुर्गम गावात संध्या बस्ते यांनी वैतरणा नदीच्या परिसरातील आपल्या शेतीचे रूपांतर कृषी पर्यटन केंद्रात केले आहे. सेंद्रिय धान्य, फळभाज्यांच्या उत्पादनाबरोबरच पाहुणचारातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे अवघ्या तीन वर्षांतच हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. 


नाशिक शहरात जाहिरातीच्या कार्पोरेट जगतात कार्यरत असलेल्या संध्या बस्ते यांनी 2002 मध्ये नाशिकपासून साधारणतः चाळीस किलोमीटर अंतरावरील झारवड बुद्रुक या दुर्गम भागात औषधी वनस्पती लागवडीच्या उद्देशाने 29 एकर जमीन घेतली. आठवड्यातले पाच दिवस शहरात काम केल्यानंतर दोन दिवस निसर्गाजवळ घालवायचे होते. डोंगराच्या उताराला सिट्रोनेला आणि लेमन ग्रास या सुगंधी वनस्पतींची लागवड 12 एकर क्षेत्रावर केली. देशाच्या विविध भागांतून आणून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचे छोटे छोटे प्लॉट तयार केले. पुढे इथल्या मूळ आदिवासी संस्कृतीला धक्का न पोचवता जमिनीचा योग्य व्यावसायिक उपयोग करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून कृषी पर्यटनाचा पर्याय समोर आला. 2004 मध्ये बारामती (जि. पुणे) येथे झालेल्या कृषी पर्यटन केंद्र प्रशिक्षण कार्यक्रमात संध्या यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर पुढची दिशा अधिक स्पष्ट होत गेली.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर हा तसा आदिवासीबहुल तालुका असून, खरिपात भात हे मुख्य पीक आहे. पावसाळ्यात हिरवळ पसरलेल्या डोंगरदऱ्या, धबधबे, ओल्याचिंब पायवाटा हा निसर्गाविष्कार शहरवासीयांना लुभावत असताना शेतकरी मात्र भात लागवडीच्या धांदलीत व्यस्त असतात. चारशे ते पाचशे लोकवस्तीचं निसर्गरम्य झारवड बु. गाव हे पूर्वेस डोंगर व तिन्ही बाजूने वैतरणेच्या पाण्याने वेढलेलं आहे. पाण्याने वेढलेला हा छोटासा डोंगरच बस्ते यांचं "मुक्त पर्यटन केंद्र' बनला आहे.
या गावातील असंख्य प्रकारच्या वृक्षराजीतून डोंगराच्या मधोमध आल्यानंतर पारंपरिक स्थापत्य रचनेचं गोलाकार विश्रामगृह असून जवळच शेततळं आहे.

एका बाजूला विस्तीर्ण डोंगर आणि धरणातील विशाल जलाशयाला सामोरी असलेली पर्यटकांसाठी निवासगृहे उभारण्यात आली आहेत. आजूबाजूला पसरलेली तांबडी माती, उंच झाडावर जाण्यासाठी लावलेली दोराची शिडी असो, की डोंगरावरून रोपवेच्या माध्यमातून दीड किलोमीटर पाण्यावरून अवघ्या अर्ध्या मिनिटात सुसाट जाण्याचा थरार असो... बच्चे कंपनीची धमाल होणारच!
- दरवर्षी जुलैअखेरपासून ते जानेवारीअखेरपर्यंत असा सहा महिने कृषी पर्यटनाचा हंगाम चांगला चालतो. "मुक्त'मध्ये शनिवारी व रविवारी अधिक संख्येने पर्यटक येतात. मागील तीन वर्षांत दोन हजार पर्यटकांनी पर्यटन केंद्राला भेट दिली आहे.

मुक्त कृषी पर्यटनाचं वेगळेपण

पारंपरिक पद्धतीने होतं पाहुण्यांचं स्वागत 
सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीची कृतिशील ओळख 
निसर्ग व पर्यावरणाची अभ्यासपूर्ण माहिती 
भोजनासाठी पर्यटकच खुडतात भाजी 
दुर्मिळ औषधी झाडांची थेट ओळख 
सुगंधी वनस्पतींपासून तेल काढण्याचा प्रक्रिया उद्योग 
मुलांसाठी रानमेवा आणि पारंपरिक खेळ 
मौजमजेबरोबरच आंतरिक शांततेवर भर 
सेंद्रिय उत्पादनासाठी "इकोसर्ट' प्रमाणित 
स्वतःच्या शेतातील उत्पादनांचा 99 टक्के वापर

नीरव शांततेचं स्थान

श्रीमती बस्ते म्हणाल्या, की शहरी गोंगाट आणि कोलाहलापासून सुटका करून घेण्यासाठी माणूस निसर्गाकडे धाव घेतो. केवळ पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसोर्टस्‌ही माणसाला जी आंतरिक शांतता देऊ शकत नाहीत, ती देण्याची क्षमता कृषी पर्यटनात आहे. रात्री लुकलुकणारे चांदणे, काजव्यांची चमचम, ग्रह- ताऱ्यांचे सहज दर्शन, जलाशयाने वेढलेला भवताल, ध्यानासाठी आवश्‍यक ती शांतता केंद्रामध्ये जाणीवपूर्वक टिकवून ठेवली आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे...

संध्या यांचे वडील श्री. नागनाथ बस्ते यांना दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या संवर्धनाची आवड होती, त्यामुळे संध्या यांना बालपणापासूनच अनेक औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग यांची माहिती झाली आहे. शेकडो प्रकारची झाडे मागील आठ वर्षांत देशभरातील विविध भागांतून आणून केंद्रात जाणीवपूर्वक वाढवली आहेत. या झाडांवर त्यांची प्रजाती, शास्त्रीय नावे यांचे छोटेसे लावलेले फलक पर्यटकांच्या माहितीत भर घालतात. 
फळझाडे : हिरवे अंजीर, फणस, आंबा, चिकू, केळी, काजू, बदाम, पेरू, जांभूळ, करवंद, फालचा 
फुलझाडे : वॉटर लिली (पाच रंगीत प्रकार), केवडा, अनंत, गोकर्ण, जाई, जुई, जास्वंद, गुलाब, पळस, सोनचाफा, कदंब, गुलमोहर 
औषधी झाडे : आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, रिठा, गुळवेल, कापूर, निरगुडी, वड, कडुनिंब, निलगिरी, तुळस, कळलावी, सागरगोटा, वाळा, सिट्रोनेला, गवती चहा, कोरफड 
इतर विशेष : बांबू, कडुनिंब, साग, शेवगा, लाजाळू, बेशरम, घाईटी, कारवी, साबुदाणा, मेहंदी, सावळी, पांढरी गुंज, सिल्व्हर ओक 
मसाला झाडे : लवंग, वेलची, मिरे, तेजपान
""प्रारंभी भांडवल गुंतवून, कष्ट करून शेतीमाल पिकवल्यानंतर बाजारातील मध्यस्थांनी ठरवलेल्या दराने माल विकायचा, हे मला पटत नव्हते. म्हणूनच मी शेतीतून उत्पादन घेण्याऐवजी कृषी पर्यटनावर भर दिला. केवळ "शेत' असणे हीच खरं तर आपली उत्पादकता आहे. यातून मी अगतिक, परावलंबी नाही, तर माझ्या शेताची स्वतंत्र मालक आणि उद्योजक असल्याचा अनुभव येतो.'' 
- संध्या बस्ते

सेंद्रिय शेती आणि प्रक्रिया पदार्थ

  • मुक्त कृषी पर्यटनात संपूर्णपणे सेंद्रिय शेती केली जाते, त्यासाठी इकोसर्ट प्रमाणपत्र मिळवलेले आहे. खरीप हंगामात भात, नागली, वरई, उडीद; तर रब्बी हंगामात गहू, चवळी, मठ, बाजरी याशिवाय कुर्डू, खुरासणी ही गळिताची पिकेही घेतली जातात. यासाठी मुख्यत्वे देशी व स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण वाणांना प्राधान्य दिले जाते. बहुतांश उत्पादने पर्यटकांनाच विकली जातात.
  • वैशिष्ट्यपूर्ण चवीचा पॉलिश न केलेला सकस तांदळासोबत कैरीचे पन्हे, सरबते, लोणचे, पापड यासारखे अन्य प्रक्रियायुक्त उत्पादनेही विकली जातात.
  • दहा देशी गाई असून त्यांपासून दूध मिळते. शेतीसाठी शेणखत उपलब्ध होते.

शेती आणि पर्यटनासाठी मागील तीन वर्षांत झालेला खर्च (रुपयांत)

कायमस्वरूपी 20 मजूर आहेत. त्यांची मजुरी ---- 5 लाख 
ट्रॅक्‍टर, डिझेल --- 50 हजार 
विजेचा खर्च --- 1 लाख 50 हजार 
-------------------------- 
एकूण -- 7 लाख 
(यामध्ये पर्यटकांच्या सुविधेसाठी केलेल्या बांधकामाचा खर्च धरलेला नाही.)

कृषी पर्यटनातून मिळालेले उत्पन्न (रुपयांत)

वर्ष --------------- उत्पन्न 
2011 ---- 2 लाख 
2012 ---- 5 लाख 
2013 ----- 6 लाख 
---------------------- 
एकूण 13 लाख

सुनियोजित "मार्केटिंग' महत्त्वाचे...

  • श्रीमती संध्या यांनी नाशिक शहर व जिल्ह्याच्या भागात फलकांच्या माध्यमातून आपल्या कृषी पर्यटन केंद्राची जाहिरात केली आहे.
  • येऊन गेलेल्या संतुष्ट पर्यटकांकडून झालेल्या तोंडी जाहिरातीचा अधिक लाभ होतो.
  • जाहिरातीसाठी गतवर्षी संकेतस्थळ बनविले आहे.
संपर्क : 
संध्या बस्ते : मोबाईल : 9822021306 
मुक्त कृषी पर्यटन केंद्र, 
झारवड बुद्रुक, ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate