पंखाना बळ आणि उडण्याची संधी मिळाली तर ग्रामीण भागातील महिलाही गगन भरारी घेऊ शकतात, याचा आदर्श बार्शिटाकळी तालुक्यातील आळंदा रुस्तमाबाद येथील महिलांनी घालून दिला. जय जोगेश्वर महाराज शेतकरी महिला बचत गटाची स्थापना करुन शेती प्रक्रिया उद्योगाचे माध्यमातून महिलांनी कुटूंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिले आहे.
आळंदा येथील महिलांनी सामान्य गृहिणी ते उद्योजिका असा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. गावातील चंदाताई धनराज भवाने या महिलेने गावातील 11 महिलांना सोबत घेऊन जय जोगेश्वर महाराज शेतकरी महिला बचत गटाची स्थापना केली. या बचत गटात चंदाताई भवाने अध्यक्षा तर पूजा प्रभाकर उमाळे सचिव आहेत. या गटात रेखा तुपवाडे, कविता ज्ञानेश्वर भवाने, ज्योती भवाने, प्रीती भवाने, कविता काकड, मथुरा आमले, अनुसया झगडे, उषा भवाने, रुपाली ढोमणे, रंजना भवाने आदि महिलांचा समावेश आहे. आत्मा अंतर्गत शेतीपुरक उद्योजक विषयी प्रशिक्षण घेत शेतीशाळेच्या माध्यमातून उद्यमशीलतेचे बीज रोवण्यात आले.
तत्कालीन कृषी अधिकारी अरुण गावंडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोळ यांच्या पुढाकाराने व आत्माचे प्रकल्प संचालक अशोक बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माअंतर्गत 2013 साली 50 टक्के अनुदानावर सेप्रेटरची (मिनी दालमिलची) खरेदी केली. त्या नंतर दाळ उद्योगाची उभारणी या बचतगटाने केली. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत केलेली मिनी दाळ मिल 1 लाख 40 हजारमध्ये खरेदी केली. कृषी विभागाकडून 50 टक्के अनुदान मिळाले व या करीता आय.सी.आय.सी.आय या बॅकेकडून कर्ज घेण्यात आले, असे बचतगटाच्या अध्यक्षा चंदाताई भवाने यांनी सांगितले.
दाळ उद्योगाची उभारणी 2014 मध्ये करण्यात आली. पहिल्या वर्षी या प्रक्रीया उद्योगाचा प्रचार व प्रसार नसल्यामुळे केवळ 7 क्विंटल दाळीवर प्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी प्रती क्विंटल 500 रुपये भाव घेण्यात आला. 3 वेळा वाळविणे, तेल लावणे, तसेच मजुरी हा खर्च वगळता प्रतीक्विंटल 200 रुपये निवळ नफा मिळाला. मागील वर्षी 90 क्विंटल तुरदाळ 40 क्विंटल चना दाळ व 25 क्विंटल उडीद व मुग दाळीवर 600 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे प्रक्रिया करुन वर्षाकाठी दोन ते तीन लाखापर्यंत निव्वळ नफा मिळत आहे. डिसेंबर 2016 मध्ये शेवटची कर्जाची किस्त भरण्यात आली आहे. यापुढे बचत गटाला निव्वळ नफा मिळणार आहे.
मागील वर्षी कृषीसमृद्धी योजनेतून करार नाम्यावर 50 क्विंटल उडीद व तीस क्विंटल मुगाची दाळ बनविण्यात आली होती. या मिनी दालमिलच्या माध्यमातून आजुबाजुच्या परिसरातील शेतकऱ्यांना गावामध्ये दाळ तयार करुन मिळत असल्यामुळे त्यांची वेळ आणि पैशाची बचत होत आहे व बचतगटातील विधवा व परितक्त्या महिलांना गावातच रोजगार मिळत आहे, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असल्याचे बचतगटाच्या अध्यक्षा चंदाताई भवाने यांनी सांगितले.
या सोबतच बचतगटाच्या महिलांनी विविध कृषी प्रदर्शनी मधुन स्टॉल लावून तूर, चना, मुग व उडीद दाळीची विक्री केली आहे. तसेच झुनका भाकर केंद्राचा स्टॉल लावून उत्पनात भर टाकली आहे. या व्यतिरिक्त बचत गटातील महिलांनी कराराने 0.60 हेक्टर शेत वहितीस घेऊन त्यातुन कांदा बिजोत्पादन तसेच पालेभाज्या लावून अंदाजे 20 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. या व्यतिरिक्त बचत गटातून अंतर्गत बचत करुन त्या मधुन 13 हजार रुपये कर्ज घेऊन झेरॉक्स मशीन खरेदी केली आहे. यातून महिन्याला 03-04 हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती बचतगटाच्या सदस्या रेखा तुपवाडे यांनी दिली. महिलांच्या पंखात बळ मिळाले तर त्या गगन भरारी घेतात हेच या उदाहरणावरुन सिद्ध झाले आहे.
लेखक - युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, अकोला
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/6/2020
रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविल्या जाणा...
या माहितीपटात उद्योग म्हणजे काय नवउद्योजकांना कोणत...
शेत ही देखील आपली उत्पादकताच आहे, असे ठासून सांगणा...
या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनद...