सांगलीच्या मंगलमूर्ती चौक, संजयनगर येथील श्री न्यू रत्ना किराणा अँड जनरल स्टोअर्स मध्ये आजकाल गर्दी वाढली आहे. कारण दुकानाचे मालक कृष्णदेव आनंदराव रसाळे यांनी त्यांच्या दुकानाचा पसारा थोडा वाढवला आहे. आता त्यांच्या किराणा माल दुकानात हर तऱ्हेचा माल मिळू लागला आहे. त्यांच्या आयुष्यात ही संधी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमुळे प्राप्त झाली आहे.
कृष्णदेव रसाळे 1980 पासून संजयनगरमध्ये राहतात. विज्ञान शाखेमध्ये दुसऱ्या वर्गात शिकत असताना त्यांचा विवाह करण्यात आला. अचानक पडलेल्या जबाबदारीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. त्यांनी एका दुकानात दिवाणजी म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर रसाळे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, भांडवलाचा प्रश्न होताच. सुदैवाने तेव्हा उधारीवर माल मिळायचा. त्या क्रेडीटवर त्यांनी 1990 च्या सुमारास त्यांनी स्वतःचे छोटेखानी दुकान सुरू केले. 1996 साली पंतप्रधान रोजगार योजनेचा लाभ घेतला. वेळेत पूर्ण कर्जही फेडले. गेली 20 वर्षे त्यांचे हे छोटेखानी दुकान सुरू आहे. छोट्या मोठ्या स्वरूपात त्यांनी हे छोटेखानी दुकान कष्टाने, नेटाने आणि जिद्दीने चालवले. पण, आता मार्केट बदलले आहे. क्रेडिटवर माल मिळत नाही. सर्व व्यवहार रोखीने होत आहेत. उधारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे भांडवलाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला.
गेल्या वर्षी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेची माहिती त्यांना मिळाली. त्यातून त्यांनी एक लाख रुपये कर्ज घेतले. ते कर्ज फेडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत कृष्णदेव रसाळे म्हणाले, 1996 पासून मी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत आहे. मात्र, सध्या व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे भांडवलासाठी पैशाची चणचण भासत होती. ती समस्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे संपली. आता हर एक तऱ्हेचा माल मी माझ्या दुकानात ठेवत आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा मला बराचसा फायदा झाला आहे. त्यामुळे माझे गिऱ्हाईकही वाढले आहे आणि गिऱ्हाईकला पाहिजे त्या वस्तू देऊ शकत आहे.
कृष्णदेव रसाळे यांच्या घरी आई, पत्नी आणि एक मुलगी आहे. मुलगी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहे. कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पार पाडतानाच स्वतःची उन्नती साधून एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेची मदत त्यांना झाली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे अनेक होतकरू व्यावसायिकांना मदतीचा हात मिळाला आहे. स्वयंरोजगारातून स्वतःची प्रगती करण्यासाठी धडपडणाऱ्या कृष्णदेव रसाळे यांच्या सारख्यांना या योजनेमुळे प्रगतीच्या नव्या दिशा खुणावू लागल्या आहेत.
लेखक - संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी
सांगली
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/26/2023
ग्रामीण भागात ज्या तरुणांना नोकरीऐवजी व्यवसाय आणि ...
अकोल्यातल्या कुंभारी गावच्या सुमनबाईंची ही गोष्ट. ...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शेतकऱ्यां...
शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण