ग्रामीण भागात ज्या तरुणांना नोकरीऐवजी व्यवसाय आणि अन्य लहान उद्योग उभे करणे सोयीचे होते. यासाठी भारत सरकारने मुद्रा योजना कार्यान्वित केली. त्याचे सकारात्मक परिणाम समोर दिसून येवू लागले आहेत. कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे येतात. कोकणातील तरुणांना मुंबई महानगर जवळ असल्याने तेथे रोजगाराची सोय उपलब्ध होते. परंतू मुंबईत येणारा लोंढा आणि उपलब्ध रोजगार याची मर्यादा लक्षात घेता पर्यायी रोजगार निर्मिती आवश्यकच आहे. म्हणूनच स्वत:कडे असलेल्या क्षमता ओळखून रोजगार उभा करणे आवश्यक ठरले. म्हणूनच कोकणात मुद्रा योजनेचा लाभ आज मोठ्या प्रमाणावर तरुण घेवू लागले. 8 एप्रिल 2015 पासून कोकण विभागात या योजनेची सुरवात झाली आणि लहान मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. आता या दोन वर्षात या योजनेचा मोठा विस्तार झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण 79096 लाभार्थीना 642.11 कोटी रुपयाचे कर्ज आतापर्यंत वितरीत करण्यात आले. पालघर जिल्ह्यात 12450 लाभार्थीना 65.09 कोटी रुपये कर्ज वितरीत करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात 8409 लाभार्थीना 111.18 कोटी रुपयाचे कर्ज वितरीत करण्यात आले. तर रायगड जिल्ह्यात 16484 लाभार्थीना 169.05 कोटी रुपयाचे कर्ज वितरीत करण्यात आले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8142 लाभार्थ्यींना 108.96 कोटी रुपयाचे कर्ज वाटप झाले.
मुद्रा योजनेअंतर्गत शिशु कर्ज योजना, किशोर कर्ज योजना, तरुण कर्ज योजना या माध्यमातून संपूर्ण कोकणात उद्योगाचे एक नवे पर्व सुरु झाले. मुद्रा बँक योजनेच्या उद्घाटन प्रसंगी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते. “देशातील लघुउद्योगांना आर्थिक सहाय्य करणे हा भारतीय अर्थव्यवस्थेला समृध्द करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. सचोटी हाच छोट्या उद्योजकांसाठी सर्वात मोठा ठेवा असून ह्या सचोटीला मुद्रेची जोड मिळाल्यामुळे छोटे उद्योग अधिक यशस्वी होतील. भांडवलाशिवाय वंचित असलेल्या उद्योगांना भांडवल पुरविणे हा मुद्रा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.’’ हीच संकल्पना सर्वत्र राबविली होती.
या निमित्ताने मुद्दाम नमुद करावेसे वाटते की, मुद्रा योजनेचा लाभ केवळ तरुण उद्योजकांनी नव्हे तर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर घेतला आहे. कोकणातील महिला उद्योजक या क्षेत्रातही अग्रेसर आहेत. पारंपारिक लहान व्यवसायासोबतच नव्या व्यवसायाची देखील यात भर पडली आहे. स्टेशनरी दुकानापासून ब्युटी पार्लर पर्यंतचे आधुनिक उद्योग महिला करु लागल्या आहेत. मुद्रा योजनेत लहान व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज देण्यात येते.
शिशु कर्ज या मध्ये 50 हजार रुपये पर्यंत कर्ज, किशोरांसाठी 50 हजार ते 5 लाखांपर्यत व तरुण कर्ज योजनेत 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते. या तीन कर्जावर आकर्षक व्याज दर आकारण्यात येतो. कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. या योजनेत दिलेले हे मुद्राकार्ड मुख्यत: कृषि क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतू नुकतेच कृषि क्षेत्राला पुरक असणाऱ्या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळते.
छोटे व्यवसाय जसे भाजीपाला विक्री करणारे, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीन टाकणे, खाणवळ, स्वत:चे ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारच्या कुठलाही लघूउद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
मुद्रा कार्ड म्हणजे मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट आणि रिफायन्यान्स एजन्सी, मुद्रा कार्ड हे डेबिट/क्रेडीट कार्ड सारखे काम करते. आपल्याला मंजूर करण्यात आलेली रक्कम आपल्या आवश्यकतेनुसार मुद्रा कार्डच्या सहाय्याने बँकेच्या ए.टी.एम.मधून काढू शकतो. मुद्रा योनजेत सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, अल्प कर्ज देणाऱ्या पतसंस्था या योजनेत सहभागी आहेत.
या योजनेची मुळ संकल्पना म्हणजे सुक्ष्म पतपुरवठा (मायक्रो फायनान्स) आहे. मायक्रो फायनान्समुळे लघु उद्योजकांना चालना मिळून छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येते. या छोट्या छोट्या सक्षमतेतून राष्ट्र संपन्नतेकडे जाण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे व्यक्तीगत विकासाबरोबर राज्य आणि देशाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये लघु उद्योजकांना आपले योगदान देता येणार आहे.
केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्रित विकासाची पारदर्शी संकल्पना जेव्हा या जनतेसमोर योजनेच्या रुपाने मांडते तेव्हा योजना अधिक यशस्वी होते हेच मुद्रा योजनेचे यश म्हटले पाहिजे. कोकण विभाग यात अग्रेसर आहे याचा अभिमान असणे स्वाभाविक आहे.
लेखक - डॉ.गणेश व.मुळे
उपसंचालक (माहिती), कोकण विभाग, नवी मुंबई
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/31/2023
सर्वसाधारणपणे शासन सहकारी संस्था, सहकारी बॅंका, रा...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शेतकऱ्यां...
सांगलीच्या मंगलमूर्ती चौक, संजयनगर येथील श्री न्यू...
शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण