অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'महावितरण'चे मोबाईल ॲप

देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या 'महावितरण'ने जवळपास सर्वच ग्राहक सेवा आज ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. यापुढे या सर्व सेवा 'महावितरण' मोबाईलवर उपलब्ध करून देत आहे. विजेसंबंधीच्या सेवा ग्राहकांना सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून 'महावितरण'च्याच माहिती तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त असणारे चार मोबाईल ॲप विकसित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

‘महावितरण ॲप’ (ग्राहकांसाठी)



राज्यात २ कोटी ४० लाखांहून अधिक असलेल्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी हे ॲप आहे. या ॲपद्वारे वीजबिल पाहणे, ते ऑनलाईन भरणे आदी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बिले भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसोबतच मोबाईल वॅलेट, कॅश कार्डचा वापर करता येतो. एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन असतील तर ते एकाच खात्यातून (username) हाताळता येतात. विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्याची सोडवणूक झाली की नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदविण्याची व ते अद्यावत करण्याची सुविधा या ॲपमध्ये दिली आहे. ज्या ग्राहकांचे रीडिंग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश जाईल. त्यानंतर त्या ग्राहकांना आपल्या मीटरचा फोटो काढून रीडिंग नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतील. सेवांबद्दलचा अभिप्राय देखील नोंदवता येतो. ग्राहकांसाठीचे ॲप 'गुगल प्लेस्टोअर', 'ॲपॲप स्टोअर', 'विंडोज स्टोअर' तसेच महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते Android, Windows, iOS ऑपरेटींग सिस्टीमवर काम करते.

मोबाईल ॲप (कर्मचाऱ्यांसाठी)



अभियंते व जनमित्रांना त्यांच्या कामासाठी फिरावे लागते, सर्वेक्षण करावे लागते. फिल्डवर काम करताना अनेक महत्त्वाच्या नोंदी करावयाच्या असतात. आता या नोंदी कागदावर न करता थेट मोबाईल ॲपमधून केल्याने वेळेची व श्रमाची बचत होणार आहे. या सर्व कामांसाठी तीन स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केले असून ते कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कवर उपलब्ध केले आहेत.

नवीन कनेक्शन ॲप



उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील सर्व कनेक्शन या ॲपद्वारे देता येतात. सर्वेक्षणानुसार किती पोल व वायरची गरज आहे? मीटर क्रमांक आदी नोंदवता येतो. तांत्रिक कारणांमुळे एखादे कनेक्शन देता येत नसेल तर त्याचे सबळ कारण ॲपमध्ये नोंदवावे लागेल. तसेच अभियंत्यास त्याच्या क्षेत्रातील प्रलंबित कनेक्शनची संख्याही त्यात दिसेल.

मीटर रीडिंग ॲप



हे ॲप जनमित्रासह रीडिंग घेणाऱ्या एजन्सीसाठीही उपयुक्त आहे. मीटरवरील रीडिंगचा फोटो काढून ॲपवर लोड करावा लागतो. मोबाईलद्वारेच हे काम होत असल्याने वेगळ्या कॅमेऱ्याची गरज पडणार नाही. ऑपरेटर व अभियंते त्यांच्याकडील फीडर, रोहित्र व ग्राहकांचे मीटर रीडिंग या ॲपद्वारे करू शकतील. मीटर रीडिंग घेताना अक्षांश-रेखांशासह लोकेशन नोंदवले जात असल्याने रीडिंगसाठी प्रत्यक्ष जाणे आवश्यक असणार आहे.

कर्मचारी मित्र’ ॲप


तातडीच्या तसेच देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद करणे आवश्यक असल्यास शाखा अभियंता त्याची नोंद ॲपमध्ये करेल. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे, त्यांना मोबाईल संदेश पाठविण्याचीही सोय ॲपमध्ये केली आहे. वीज बंद ठेवण्याचे नेमके कारण समजल्यामुळे ग्राहकांचा रोष कमी होण्यास मदत होईल. यामध्ये भार व्यवस्थापन, लोकेशन कॅप्चर, फीडर रीडिंग, डिस्कनेक्श्न मॅनेजमेंट या पर्यायांचाही वापर कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे करता येईल.

लेखक - ज्ञानेश्वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती.
संकलन- उप माहिती कार्यालय बारामती.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate