मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या आणि भूसावळ-सुरत या पश्चिम लोहमार्गाशी जोडल्या गेलेल्या धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावाची ही गोष्ट. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला पार नरडाणा स्टेशनपर्यंत वाढल्याने आजुबाजूच्या तीस खेड्यांची मुख्य बाजारपेठ आणि दळणवळणाचं हे केंद्र. त्यामुळेच गावाची उद्योग, शेती आणि इतर व्यवसायातही आघाडी.
सर्वधर्मसमभावात गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या या गावानं "पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजने" त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि लोकांची मानसिकता बदलत गावाचा चेहरामोहराच बदलला. ग्रामसभांच्या माध्यमातून योजनेत लोकसहभाग वाढवला. कधीही घराबाहेर न पडणाऱ्या महिला गावाच्या विकासात हिरीरीने सहभाग घेऊ लागल्या. शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून योजनेचे महत्व गावकऱ्यांना पटवून दिले.
एकेकाळी स्वच्छता, वृक्ष लागवड, पाणी बचत, कचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या मुद्दांवर उदासीन असलेल्या गावानं कात टाकली. गावाची गल्ली-बोळ स्वच्छ, सुंदर झाली, गावातील कचऱ्याचं सुयोग्य व्यवस्थापन झालं आणि गाव दुर्गंधीमुक्त झालं. गावात मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड झाली. लावलेली झाडं जगवण्याची गावकऱ्यांनी शपथ घेतली आणि गाव हिरवाईने नटून येत असतांना पाण्याची बचत आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश घरोघर गेला. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी, घरपट्टी-नळपट्टीचा वेळवर भरणा, सौर उर्जा साधणांच्या वापराला गती यासारख्या कामातून गावाचं रुप पालटलं. गावातील आजार कमी झाले. इतर गावांना नरडाणा गावच्या विकासाचा हेवा वाटावा इतका सुंदर गाव, गावकऱ्यांनी योजनेच्या माध्यमातून उभा केला.
गावात 80 युनिट असलेले आणि 1 ते 35 युनिट असलेले असे आदर्श सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त तर झालेच पण अनेक वर्षाची उघड्यावर शौचास जाण्याची पद्धत बंद झाली. गावात वैयक्तिक शौचालये बांधण्यास देखील यातून प्रेरणा मिळाली. आपल्याच गावाचं बदलेलं रुप पाहतांना गावकऱ्यांच्या मनात आणखी चांगले काम करण्याची उर्मी दाटून आली.
शासनानं ही या कर्तृत्ववान गावाची दखल घेत अनेक मान-सन्मानानं गौरवलं. पाण्याची शुद्धता आणि स्वच्छता राखल्याबद्दल गावाला मागील तीन वर्षांपासून "हिरवे कार्ड" मिळाले आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हा पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामसभा आयोजनाबद्दल "गौरव ग्रामसभा" स्पर्धेअंतर्गत जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार, गावातील मुला-मुलींचे विवाह 18 आणि 21 वर्षांवरील असल्याबद्दल चा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने गाव न्हावून निघाला. ग्रामसुधारणेचा वसा घेतलेल्या गावानं त्यापुढे जाऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतही पुरस्कार पटकावला.
गावानं चांगलं काम तर केलं पण त्यात सातत्य असायला पाहिजे आणि सातत्य राखणं हे खरं आव्हानात्मक आणि खडतर काम आहे याची गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांना जाणीव आहे. म्हणून गाव विकासाची पुढची दिशा आणि नियोजन गावानं पक्कं केलं आहे. गावात एक व्यक्ती दहा झाडं याप्रमाणात वृक्ष लागवड करणे, लावलेली झाडं जगवणे, संपूर्ण शिवाराचे पाणी जमिनीत जिरवणे, छताचे पाणी जमीनीत मुरवून पाण्याचे पुनर्भरण करणे, श्रमदान आणि लोकसहभागातून बंधारे बांधून पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवणे यासारखी अनेक महत्वाची काम गावानं आखून आणि योजून ठेवली आहेत.
सौ. शिवप्रिया उदय सिसादे या गावच्या महिला सरपंच, उपसरपंच उपेंद्र सिसोदे आणि ग्रामसेवक व्ही.एस.सैंदाणे यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करीत आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेने गावाची दशा बदलून विकासाची नवी दिशा दिल्याची भावना त्यांच्या मनात आहे म्हणूनच योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आणि गावाचा अधिकाधिक विकास करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
लेखिका : शब्दांकन: डॉ. सुरेखा मुळे
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 5/9/2020
एकेकाळी अस्वच्छता त्यामुळे येणारे अनारोग्य यामुळे ...
गावानं ठरवलं तर गावं किती चांगलं काम करू शकतात याच...
राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व...
राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी ...