गाव विकासाची आलेली प्रत्येक योजना नेटाने राबवून संघटनात्मक शक्तीतून गावाचा विकास करण्याचा ध्यासच जणू गावकऱ्यांना झाला आणि त्यातूनच उभा राहिला गाव विकासाचा "कळस"...
ही गोष्ट आहे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे पश्चिम प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या "कळस" गावची.
गावचे मुळ नाव येखळवाडी. घनदाट जंगलात एक शिवमंदिर होते. दुरुन त्या शिवमंदिराच्या कळसाचे दर्शन तेवढे व्हायचे. हळुहळु या मंदिराच्या आजुबाजुला गावकऱ्यांनी वस्ती केली, तिथे गाव वसले आणि नाव पडले "कळस".
अहमदनगर शहरापासून 70 आणि पुणे शहरापासून 120 कि.मी अंतरावर असलेल्या आणि डोंगरकुशीत वसलेल्या कळस गावाच्या तीन बाजूला डोंगर आणि एका बाजुला पठार आहे. डोंगर परिसरातून अनेक ओढे नाले उगम पावून गावात प्रवेश करतात. गावाची हद्द 1324.57 हेक्टरची. बहुतांश जमीन काळी कसदार तर काही तांबड्या मातीची. गावाचं ओलिताखालील क्षेत्र 698 हेक्टर तर जिरायत क्षेत्र 219 हेक्टर. पूर्वी गावात पाणी भरपूर होतं तेंव्हा मोठ्याप्रमाणात केळी पिकायची अलिकडे पावसाचे प्रमाण घटले तसा गावकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल केला. बाजरी, कडधान्य, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा अशा इतर पिकांकडे गाव वळालं.
गावची कुटुंब संख्या 383 तर लोकसंख्या 2179. येथील ग्रामपंचायत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी म्हणजे 1956 साली अस्तित्वात आलेली. कै. पुंडलिकराव गलांडे हे ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच. सध्या महादेव दगडू गाडगे हे गेल्या सात वर्षांपासून सरपंच म्हणून काम पाहात आहेत. गावातील एकी आणि शहरात गेलेल्यांबरोबरचा समन्वय आणि संघटन एकदम उत्तम आहे. गावात जिल्हा परिषदेच्या "ब" वर्ग शाळेबरोबर रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कुल आहे.
गाव विकासाचा ध्यास गावकऱ्यांना पोपटराव पवारांच्या हिवरेबाजार गावापर्यंत घेऊन गेला. हिवरेबाजारला भेट दिल्यानंतर गाव विकासाची दिशा खऱ्या अर्थाने स्पष्ट झाली आणि गाव एकदिलाने विकासाच्या कामाला लागलं.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावानं भाग घेतला. गावातील वेडीबाभूळ, गाजर गवत काढलं गेलं. गावातील केरकचरा गोळा झाला, सार्वजनिक इमारती, मंदिरे यांना रंगरंगोटी करून झाली. पण तरीही स्पर्धेत यशस्वी होण्यात गाव कमी पडलं. पण अपयशाने हरेल ते गाव कसले असा विचार करून गावानं नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने पुन्हा या अभियानात सहभाग घेतला. 2007 साली गावानं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. गावाला मिळालेला हा पहिला पुरस्कार. पुरस्कारांची ही मालिका गावानं नंतर सतत चालूच ठेवली. 2010 साली याच अभियानात गाव पुन्हा तालुक्यात पहिले तर 2011 मध्ये जिल्ह्यात तिसरे आले. आता गावकऱ्यांचे स्वप्नं आहे राज्यस्तरावरील प्रथम पुरस्काराचे. गाव त्यासाठी आता कष्ट घेत आहे.
या अभियानादरम्यानच गावाने निर्मलग्राम अभियानात भाग घ्यायचे ठरवले. गावची कुटुंब संख्या 383. गावानं झपाटून काम केले. सुतार-गवंडी मदतीला आले. हा हा म्हणता दोन महिन्यात गावातील सर्व कुटुंबाकडे शौचालये बांधून पूर्ण झाली. गाव 100 टक्के हागणदारीमुक्त झाले. 2008 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गावाला निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गावानं आता तंटामुक्त ग्राम अभियानात भाग घेतला. ग्रामसभा झाली. . . तंटामुक्त गाव समिती स्थापन झाली. 2010-11 साली गाव तंटामुक्त तर झालेच पण तालुकास्तरावर ज्या दोन गावांना विशेष पुरस्कार मिळाला त्यात कळस चा समावेश झाला.
या सर्व योजनांचे सार आणि ग्रामविकासाचा खऱ्या अर्थाने "कळस" असणारी " पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना" जाहीर झाली आणि गावानं या योजनेतही हिरिरीने सहभाग घेतला.ग्रामसभा झाली, कार्यप्रणाली ठरली. रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमी, सार्वजनिक रिकाम्या जागा, शेतबांध अशा विविध ठिकाणी 2500 झाडांची लागवड झाली. गावातील निवृत्तीमामा येवले यांनी स्वखुशीने विनामोबदला या झाडांना पाणी देण्याची, त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. कर वसुलीसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी घरोघर जाऊन भेटी दिल्या. करवसुलीचे महत्व पटवून सांगितले त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर वसुल झाला.
2011-12 मध्ये गावानं 2020 तर 2012-13 मध्ये 4000 नवीन रोपांची लागवड केली. कळस गावानं पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पूर्ण करावयाचे तीन ही वर्षाचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केले आणि गाव तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पर्यावरण विकास रत्न पुरस्काराने सन्मानित झाले.
गावानं लोकसंख्येच्या तीन पट झाडं लावली पण आता दुष्काळात आव्हान होते ते वृक्ष जगवण्याचे. गावानं रस्त्याच्या कडेनं पाईपलाईन टाकली. प्रत्येक रोपाला पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. गावातील संघटना, युवक मंडळे, गणेश मंडळे, महिला मंडळे पुढे आली. त्यांनी आर्थिक आणि श्रमाची कामे वाटून घेतली. झाडांना आळी बनवणे, गवत काढणे यासारखी कामे करण्यात आली आणि पाणी टंचाईच्या काळातही झाडं हिरवाईने फुलून राहिली.
गावानं एकूण 8440 झाडं लावली. त्यापैकी 6445 झाडं जगवण्यात गावाला यश आलं. लहान रोपांना संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या. प्रत्येक झाडाला क्रमांकाचा टॅग लावण्यात आला. तलावातील सकस माती या झाडांच्या बुंध्यांवर टाकण्यात आली आणि गावातील प्रत्येक माणसानं वृक्षसेवक होऊन झाडं जगवण्याच काम केलं.
गावातील पाणी स्त्रोतामध्ये उत्सव मुर्तींचे विसर्जन करण्याचं गावानं आता थांबवलं आहे. त्यासाठी सार्वजनिक विहिरीशेजारी एक खड्डा खोदला असून त्यातील पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन गेलं जाते तर निर्माल्यापासून खत.
इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सौर कंदिलाचे वाटप करण्यात आले आहे. गावात सहा गोबरगॅस आहेत. छतावर पडणारे पावसाचे पाणी शास्त्रोक्त पद्धतीने साठवण्याची संकल्पना गावाने राबविली असून गावातील 15 टक्के ग्रामस्थ या संकल्पनेचा उपयोग करीत आहेत.
सांडपाण्याचे संकलन करून त्यावर ग्रामस्थांनी परसबागा फुलवल्या आहेत. लोकसहभाग हा कळसच्या विकासाचा पाया आहे. गावातील स्मशानभूमीचा विकास लोकसहभागातूनच झाला आहे. गावात लोकवर्गणीतून विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधण्यात आले आहे. गावात मोफत वाचनालय आहे. गावातील रोप लागवड आणि त्याच्या संरक्षक जाळ्यांसाठी ग्रामस्थांनी देणगी दिली आहे.
गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन चांगले असून नॅडपपद्धतीने त्यातून खत निर्मिती केली जाते.
गावातील रस्त्यांवर आणि घरात सीएफएल बल्बचा वापर करणे सक्तीचे करण्यात आल्याने गावात उर्जा बचत होते आहे. गावात 10 शेतकऱ्यांकडे गांडूळखत निर्मिती प्रकल्प आहे. गावातील सर्व कुटुंबाने निर्धुर चुलीचा वापर सुरु केला आहे. कुकडी कॅनॉल च्या लाभक्षेत्रात विहिर खोदण्यात आली असून पाईपलाईनद्वारे त्याचे पाणी गावात आणले जाते. ते 40 हजार लिटर क्षमतेच्या टाकीत चढवले जाऊन तेथून गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. आजघडीस गावात टँकर येतो पण त्याचे पाणी वाटपही अशाच पद्धतीने होत असल्याने पाणी टंचाईच्या काळात गाव एका वेगळ्या पद्धतीने हंडामुक्ते झाले आहे.
गावातील पाणी व्यवस्थापन महिला बचतगटाकडे आहे. पाणीपट्टीच्या 80 टक्के रक्कम महिला बचतगटाला दिली जाते. त्यातून त्यांचा रोजगार भागतो. 20 टक्के रक्कम ग्रामपंचायत विकास कामांसाठी राखून ठेवते.
गावाला 40 वर्षांपासून सामुहिक विवाहाची परंपरा आहे. गावातील गरिब ते श्रीमंत अशा सर्वांचे विवाह या विवाह सोहळ्यात संपन्न होतात. गावातून दरवर्षी कळस ते आळंदी अशी पायी दिंडी जाते. सर्व लोकोत्सव ग्रामस्थाच्या सहभागाने साजरे होतात.
यशवंत ग्राम समृद्धी योजनेमधून ग्रामसचिवालयाची दुमजली इमारत बांधण्यात आली आहे.
गावात रोहयो-जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. गावातील विद्यार्थी आणि नागरिक गावाचं नाव आणखी उज्ज्वल करण्यात योगदान देत असून गावातील अंगणवाडी "अहिल्याबाई होळकर आदर्श अंगणवाडी" पुरस्काराने गौरवांकित करण्यात आली आहे.
गाव विकासातील लोकसहभाग लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने आदर्श ग्राम माता पुरस्कार, आदर्श स्त्री व्यक्तिमत्त्व पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार गावात सार्वजनिक ठिकाणी सर्वप्रकारचे फ्लेक्स लावण्यास बंदी आहे. गावात संपूर्ण दारुबंदी असून ग्रामसभेच्या ठरावानुसार मिरवणूक, वरातीमध्ये डी.जे वाजवण्यास बंदी करण्यात आली आहे.
लेखिका : डॉ. सुरेखा म. मुळे
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 11/2/2019
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध...
शेतकरी एकत्र आले तर गावाचे चित्र पलटवू शकतात. निदा...
सांगली जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि पश्चिमेकडील भाग...