शेतकरी एकत्र आले तर गावाचे चित्र पलटवू शकतात. निदान पिढयान पिढया बंदिस्त असलेले रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतात. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावशे ते आव्हाणे हा शिवरस्ता हे त्याचे ज्वलंत उदाहरण !
जवळपास सहा किलोमीटर लांबीचा हा रस्ता.
रस्त्याला लागून सुमारे तीनशे शेतक-यांची साधारणतः साडेपाचशे-सहाशे हेक्टर शेतजमीन गेली पन्नास साठ वर्षे शेतक-यांनी ब-याच ठिकाणी अतिक्रमणे केल्याने हा रस्ता बंदच. शेतात जाण्या-येण्यास अडचणच. अनेकांना मिनतवा-या करुन आपला शेतमाल काढावा लागत असे. रस्ता मोकळा व्हावा असे बहुतेकांना वाटायचे, रस्ता अडवून बसलेल्याना सांगायचे कुणी ? उगाच वादास निमंत्रण अशी भीती.
महसूलच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानाखाली लोकसहभागातून शिवरस्ते मोकळे करणार असल्याची माहिती शेतक-यांपर्यत पोहोचली. त्यांनी शेवगावच्या तहसीलदारांना एक उत्स्फूर्त निवेदन सादर केले. रस्ता मोकळा करण्यासाठी वर्गणी जमवून जेसीबीचा खर्च करण्याची तयारी दाखविली. तहसीलदार गणेश मरकड , मंडळ अधिकारी शंकरराव गुंजाळ यांनी समक्ष शिवरस्त्याची पाहाणी केली. ठिकठिकाणी अडथळे , बांधबंदिस्ती, अतिक्रमणे, झाडंझुडपं अशी विदारक स्थिती त्यांनी चक्षुवैसत्यम पाहिली. शेतक-याशी त्यांनी चर्चा केली. काहींनी शिवरस्ता मोकळा करण्याचे मान्य केले. तर काही सबबी सांगू लागले. दांडगाईने शिव मोकळी करणार नाही अशीही निर्वाणीची भाषा करु लागले.
शेवटी कायद्याचा आसूड ओढण्याचे तहसीलदारांनी ठरविले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 140 ची तरतूद, भारतीय दंड विधानाच्या कलम 353 ची तरतूद, तहसीलदारांनी समावून सांगितली. सहकार्य न करणारे नरमले दोन्ही बाजूनी आठ-आठ मीटर रुंदीचा शिवरस्ता मोकळा करण्यात आला. जेसीबीच्या सहाय्याने लगेचच चर घेऊन हद्दी निश्चित करण्यात आल्या. दोन पिढयांपासून शेतात जाण्याची अडचणही दूर झाली
तहसीलदार एवढयावरच थांबले नाहीत. त्यांनी हा रस्ता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेाखाली घेतला. दुष्काळात लोकांना रोजगार मिळावा. आता या रस्त्यावरुन दुचाकी, चारचाकी वाहने सर्रास ये-जा करीत आहेत. शेतकरी एकत्र आले नसते तर त्यांना एकीचे महत्व समजले असते का ? कायद्यानेही का होईना त्याचे महत्व कळले. हेही नसे थोडके प्रशासन आणि शेतकरी यांनी हातात हात घालून काम केले तर गावचे चित्र बदलू शकते. गाव एकसंध होण्यास मदतच होते. राजस्व अभियानचाच हा महिमा !
लेखक : जिल्हा माहिती कार्यालय , अहमदनगर
स्त्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 8/12/2020
ही गोष्ट आहे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याच...
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध...