सांगली जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि पश्चिमेकडील भागाला लाभलेली निसर्गसंपदा यामुळे जिल्ह्याची आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेले चांदोली अभयारण्य आणि येथील घनदाट वृक्षवल्ली पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. त्यातच भर म्हणजे राज्य शासनाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी दिलेली गती महत्त्वाची आहे. जिल्ह्यात शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत आतापर्यंत सव्वाशे कोटीहून अधिक झाडे लावण्यात आली असून यंदाच्या पावसाळ्यात किमान 24 लाख झाडे लावण्याचा संकल्प जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांनी केला आहे. तर मग चला करुया वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज मानून जिल्ह्यात वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लागावीत यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच जिल्ह्यातील सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता आतापर्यंत पूर्व भागात वृक्षारोपणामध्ये अडचणी निर्माण होत होत्या, पण सुदैवाने गेल्या काही दिवसात जिल्ह्यात राबविलेला जलसंधारणाचा प्रभावी कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान आणि जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागात साठविण्यात येत असलेले पाणी यामुळे यंदा संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपणाला निश्चितपणे गती लाभेल. पावसाअभावी पूर्व भागात वृक्षारोपणाच्या मोहिमेला मर्यादा आल्या मात्र पश्चिम भागात झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्यामुळे बऱ्यापैकी वृक्षारोपणाचे काम होऊ शकले. यंदाच्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा भरीव कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्याचे नियोजन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले असून सर्व प्रशासकीय यंत्रणांना अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे निर्देश दिले आहेत. यंदा जिल्ह्यात विविध नर्सरीमधून तयार करण्यात आलेली 24 लाख रोपे जिल्ह्यात लावण्याबरोबरच आणखीन रोपे तयार करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामध्ये शैक्षणिक, सहकारी, सेवाभावी संस्थांबरोबरच शासकीय कार्यालये आणि नागरिकांनीही सक्रिय योगदान देणे काळाची गरज आहे.
जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 1 कोटी 26 लाख 37 हजार रोपे लावण्यात आली असून यंदाच्या पावसाळ्यात 24 लाख रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना वृक्षारोपन आणि वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेत सक्रिय केले आहे. जिल्ह्यास यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी यासाठी शासकीय विभागाबरोबरच जनतेनेही या कामी सक्रिय योगदान देणे गरजेचे असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या शेतात आणि परिसरात अधिकाधिक झाडे लावून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यात पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले आहे.
वृक्षारोपणाच्या या मोहिमेत वन तसेच सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच कृषी विभाग, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, उद्योग विभाग, परिवहन विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बालकल्याण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा विभाग, सहकार विभाग, सर्व साखर कारखाने, बँका, पतसंस्था, विकास सोसायट्या, बाजार समित्या, वृक्षप्रेमी संस्था तसेच विविध औद्योगिक संस्था या सर्वांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सर्वांच्याच सहकार्याने वृक्षारोपणाची चळवळ यशस्वी करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ विभागाच्या जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प, त्याअंतर्गत कालवे तसेच पुनर्वसीत गावठाणामध्ये आणि कार्यालय परिसरामध्ये झाडे लावण्याची विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसेच शेततळी, कंपार्टमेंट बंडीग, फलोत्पादन उपक्रमाबरोबरच जिल्ह्यातील अन्य सर्वच शासकीय यंत्रणांनी आपापल्या कार्यालय परिसरात तसेच कार्यक्षेत्रातील उपक्रमांमध्ये अधिकाधिक झाडे लावण्याचे नियोजन करुन कार्यवाही सुरु केली आहे.
वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी केला आहे. जिल्ह्यात वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे काम अधिक गतीने आणि लोकसहभागातून व्हावे यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात सुरु असलेली वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करुन संपूर्ण जिल्हा नजिकच्या काळात वृक्षाछादित बनविण्यात संपूर्ण जिल्हावासियांनी वृक्षारोपणाच्या या चळवळीत सक्रिय व्हावे. -एस. आर. माने, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली.
माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ०२ जुलै, २०१५