पारंपरिक जीवनपद्धतीला तडा देत भारतीय नारी आता सर्व क्षेत्रात आपले नाव उंचावत आहे. आपल्या जीवनात सकारात्मकेची जोड देत अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून उन्नती करीत आहेत. अशा महिलांचे कार्य म्हणजे ‘महिलांना आता कुणीही कमी लेखू नये, असा दबदबा निर्माण करणारा आवाजच आहे’. शेळीपालन, दुग्धव्यवसाय, शेतमाल ग्रेडींग, रोपांची नर्सरी आदी व्यवसाय महिला बचत गटांमार्फत सुरू असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र एका अनोख्या व्यवसायातून उभारी घेत असलेल्या खामगांव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील कलांगण महिला बचत गटाचे काम वेगळेच आहे. या गटाने रेशीमवर आधारित ज्वेलरी निर्माण केली आहे. तसेच विलींग पेपरवरील कलाकुसरही त्यांची वाखाणण्यासारखी आहे.
खामगांवसारखे शहर जवळ असल्यामुळे या महिला बचत गटाला त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळविणे सोपे गेले. रेशीम धाग्यांच्या गाठी आणून बचत गटातील महिला त्यापासून कानातील दागिणे, नाकातील नथणी, बांगड्या, हार, साडी पिन, तोरड्या आदी ज्वेलरी बनवितात. रेशीम व अन्य ज्वेलरीचे साहित्य जळगांव, मुंबई व अकोला येथून आणतात. त्यापासून प्रत्येक स्त्रिला आकर्षित करून घेण्याची क्षमता असलेले दागिण्यांची निर्मिती करण्यात येते. अशा या अनोख्या ज्वेलरीमुळे खामगांव व परिसरातील महिला बचत गटाच्या दागिण्यांची आतुरतेने वाट बघत असतात. बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सविता किशोर देशमुख यांनी बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेला आधीचा व्यवसाय बंद करीत एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
सुटाळा खुर्द येथील महिलांना एकत्रित करीत आपल्या कलागुणांच्या उपयोगातून नवीन उत्पादने करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सचिव वैशाली देशमुख यांची समर्थ साथ लाभली. तसेच भाग्यश्री भूषण इगवे, रूपाली शालीग्राम टेकाडे, संगीता राजपूत, मेघा दूधे या महिला सदस्यांनी आपल्या कला-गुणांचे सादरीकरण करीत अनोखी रेशीम ज्वेलरी आकारास आणली आहे. एवढ्यावरच हा बचत गट थांबला नाही, तर विलींग पेपरद्वारे, प्लायवूडद्वारे लग्न समारंभासाठी लागणाऱ्या विविध वस्तू बनविण्यास गट अग्रेसर राहिला आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. अशा अविस्मरणीय प्रसंगाला लागणारे साजही महत्त्वाचे ठरतात. त्यामध्ये वर, वधू यांना लागणारे जेवणाची ताटे, बसण्यासाठी चौरंग यांचा प्रामुख्याने समावेश असतो. वऱ्हाडामध्ये लग्नात मुलींसोबत रूखवंत देण्याची प्रथा आहे. या रूखवंतामध्ये घर सुशोभीत करणाऱ्या वस्तू असतात. सदर वस्तू कलांगण महिला बचत गट उत्कृष्टरित्या बनवितो. त्यामध्ये वर-वधूचे ताट, चौरंग, दरवाजाचे तोरणे, लोकरीच्या पर्स, आकर्षित करणारी बैलजोडी, घरात दर्शनी भागात ठेवण्याच्या वस्तू, लाईटच्या व्यवस्थेसह असलेले दिवे, वर-वधूंचे श्रृंगार साहित्या आदींचा समावेश आहे. सध्या बनविलेल्या वस्तूंपेक्षाही जास्त मागणी या बचत गटाकडे आहे. केवळ खामगांव व परिसरापूतेच कलांगण महिला बचत गटाच्या वस्तू मर्यादीत नाही, तर जिल्ह्यात वस्तू विक्रीस जात आहे. स्टेशनरी दुकांनामधूनही ही रेशीम ज्वेलरी आता चांगलाच भाव खावून जात आहे. महिलांच्या अप्रतिम सृजनशीलतेला नक्कीच चांगला दर मिळत आहे. दिवाळी, रक्षाबंधन, दसरा, गणेशोत्सव, गौरी पूजन, मकरसंक्रांत आदी सणांच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर नवनवीन वस्तू हा बचत गट तयार करीत असतो. या बचत गटाला आयडीबीआय बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. बँकेचे पासबूक तयार झाले असून गटाचे काम बघून बँकेने त्यांना अर्थपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कलांगण महिला बचत गट कच्चा माल व लागणारी मजुरी वजा जाता चांगला नफा मिळवित आहे. विलींग पेपरवरील कलाकुसर तर या बचत गटाची अगदी दर्जेदार आहे. महिलांचे बाजूबंद, बिंदीया, साडी पीन, हार, कानातील दागिणे असे कितीतरी वस्तू हा बचत गट तयार करून आपले नावाचा वेगळा ठसा उमटवित आहे. केवळ पारंपरिक व्यवसायात गुंतून संथ गतीने आर्थिक विकास साधणारे अनेक बचत गट आहेत. मात्र अशा कल्पक व्यवसायातून कलांगण महिला बचत गटाचे कार्य वेगळेपण जपणारे आहे. त्यांच्या या व्यवसायातून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे. खामगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या या बचत गटाला विविध प्रदर्शनांमधूनही वस्तू विक्रीची संधी मिळत आहे. तरी कल्पक कामाचे कौतूक होणे स्वाभाविक आहे आणि ते होत आहे.
- निलेश तायडे, माहिती सहायक, बुलडाणा
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/20/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य ग...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विच...