অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्पभूधारक पोल्ट्री व्यावसायिक

दुष्काळी जत तालुक्‍यात मिळाला पूरक व्यवसायाचा पर्याय

सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्‍यातील वळसंग येथील सुमारे तीस महिलांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक कुक्कुटपालन सुरू केले आहे. अंडी व पक्ष्यांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ व संधीचा फायदा घेत व्यवसायात स्थैर्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पूरक व्यवसायाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा पर्याय त्यांनी दुष्काळी भागात तयार केला आहे, ही त्यातील विशेष बाब आहे. 
"ति..ति..ति..या..या..' अशी सौ. आशाताईंनी वेगळ्या ढंगाने दिलेली हाक ऐकू येते. दोन ते चार मिनिटांत इतरत्र फिरणाऱ्या कोंबड्या आशाताईंजवळ येऊन थांबतात. पुढ्यात ठेवलेले खाद्य खाण्यासाठी त्यांच्यात स्पर्धाच लागते. काही क्षणात खाद्य संपवून कोंबड्या पुन्हा शिवारात पळतात.
जत तालुक्‍यातील वळसंग (जि. सांगली) गावातील घरासमोर दिसणारे हे दृश्‍य. सौ. आशाताई यांच्यासारख्या सुमारे तीस महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून गावात कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. पक्ष्यांबरोबर अंडी विकून या व्यवसायात स्थिरस्थावर होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

वीस पक्ष्यांपासून ते दीड हजार पक्षी

जत तालुक्‍याचा उल्लेख केवळ दुष्काळी प्रश्‍नासाठी नेहमी येतो. जतपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील वळसंग गाव दुष्काळी पट्ट्यातील. पण गेल्या वर्षाच्या कालावधीत या गावातील महिलांमध्ये मात्र उत्साह संचारला आहे. शेतीपूरक व्यवसाय करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली आहे. श्रद्धराया, केंचराया व जयभवानी या तीन महिला शेतकरी गटांनी कुक्कुटपालनाच्या व्यवसायात आगेकूच केली आहे.
कृषी विभागाच्या "आत्मा" योजनेअंतर्गत येथील महिलांचे तीन गट तयार करण्यात आले. सुमारे तीस महिला (अल्पभूधारक) त्याअंतर्गत कार्यरत आहेत. पूर्वी त्यांच्यापैकी कोणी आपल्याच शेतात, तर कोणी दुसऱ्यांच्या शेतात काम करीत कसाबसा उदरनिर्वाह करीत होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये "आत्मा"च्या वतीने कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक महिलेने आपल्या कुवतीनुसार हा व्यवसाय सुरूही केला. वीस पक्ष्यांपासून ते दीड हजार पक्षी त्यासाठी विकत घेतले. त्यासाठी बचत गटांतून आर्थिक मदत घेतली. व्यवसायातील सर्व महिला नवख्या होत्या. प्रशिक्षण व एकमेकींशी सल्लामसलत यातून त्यांनी पक्ष्यांचे व्यवस्थापन सुरू केले.

अंडी विक्रीतून नफा

एकत्रित अकरा जणांच्या शिंदे कुटुंबाच्या सदस्य असलेल्या सुलोचना, सौ. आशा यांच्याकडे तीस कोंबड्यांचे व्यवस्थापन आहे. घरगुती स्वरूपात व्यवसाय करताना गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी देशी कोंबड्यांची 50 पिल्ले आणली. त्यासाठी केवळ बाराशे रुपयांची गुंतवणूक केली. पिल्ले आणून त्यांचे संगोपन केले. ती मोठी झाल्यानंतर विक्रीचे नियोजन केले. सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत प्रति पक्ष्यांची त्यांच्या वयानुसार विक्री सुरू केली. काहींनी उत्पन्नाचा मुख्य स्रोत अंडी हाच ठेवला.
कोंबड्या प्रति आठवड्याला साठ ते सत्तर अंडी देतात. जत शहराचा आठवडी बाजार मंगळवारी असतो. त्यात अंड्यांची पाच रुपयांना प्रति नग दराने विक्री होते. आठवड्याला साडेतीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत रक्कम मिळते. 
पक्षी विक्रीपेक्षा अंड्यांच्या विक्रीतून नियमित नफा मिळत असल्याचे आशाताईंनी सांगितले. या कामी त्यांना संपूर्ण कुटुंब मदत करते. माफक नफा असला तरी उदरनिर्वाह स्थिर सुरू होईल इतकी रक्कम नक्कीच मिळत असल्याने पुढील काळात कोंबड्यांची संख्या वाढविण्याचा विचार या महिलांचा आहे.
एकत्रित येऊन केला व्यवसाय यशस्वी 
मालन पाटील, गोकुळा सावंत व सुरेखा सावंत यांनी एकत्रितपणे सुमारे दीड हजार पक्षी विकत घेऊन त्यांची गावच्या बाहेर मळा भागात जोपासना केली आहे. बचत गटांतून प्रत्येकीने तीस हजार रुपये कर्ज काढले. मालनताईंच्या घराशेजारील शेडमध्ये सुमारे पंधराशे कोंबड्या आहेत. नगर जिल्ह्यातून त्यांनी देशी पक्षी आणले. गेल्या सात महिन्यांत दीड हजार कोंबड्या त्यांनी विकल्या आहेत. आता दुसरी बॅच विक्रीच्या तयारीत आहे. विक्रीच्या पहिल्या बॅचमधून नव्वद हजार रुपयांचा निव्वळ नफा त्यांना झाला.

स्थानिक परिस्थितीनुसार मार्केट ओळखले

स्थानिक परिस्थिती पाहून विक्री केली की कसा फायदा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे या महिलांच्या व्यवसायाकडे पाहता येईल. जतमध्ये गेल्या काही वर्षांपासून पवनचक्‍क्‍यांचा व्यवसाय जोमात आहे. त्यांच्या उभारणीच्या निमित्ताने देशभरातून कामगार येथे येतात. गावरान पक्ष्यांसाठी कामगार हेच थेट ग्राहक उपलब्ध झाले आहेत. बहुतांशी घरच्या घरीच पक्ष्यांची खरेदी होते. बाजारभावापेक्षा चांगला दर मिळतो. आता वळसंग व आसपासच्या परिसरात या महिलांच्या कुक्‍कुटपालनाची चांगली प्रसिद्धी झाली आहे. गावरान कोंबड्या कोणत्याही वेळेत मिळत असल्याने घरगुती ग्राहक सहज उपलब्ध होत असल्याचे मालनताईंनी सांगितले.

समन्वय महत्त्वाचा...

एकमेकींच्या विश्‍वासावरच कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर बनत असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले. अशीच उदाहरणे अन्य महिलांचीदेखील आहेत. या सर्वांनी उत्पादन खर्च वजा करून आता नफ्यात व्यवसाय सुरू केला आहे.

वळसंगच्या महिलांचे कुक्‍कुटपालन-दृष्टिक्षेपात

* कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतल्याने पक्षी व्यवस्थापन सुलभ 
* आपापल्या कुवतीनुसार पक्ष्यांची संख्या ठेवणे व जोपासना 
* सामूहिकेतवर अधिक भर 
* बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत 
* स्थानिक परिस्थितीचा फायदा घेत यशस्वी विक्री 
* कोंबड्यांबरोबरच अंडीविक्रीतून मिळविला नफा 
* एकमेकींच्या विश्‍वासावर फुलविला व्यवसाय
जतसारख्या दुष्काळी तालुक्‍यात या महिलांनी दाखविलेली जिद्द प्रेरणादायी आहे. आम्ही केवळ प्रशिक्षण, तांत्रिक माहिती व आत्मविश्‍वास त्यांना दिला. त्या जोरावर त्यांनी कुक्कुटपालन यशस्वी केले. आज तीस कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न त्यामुळे मिटला आहे. पुढील काळात याला व्यापक स्वरूप देणार आहोत. 
-मुकुंद जाधवर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, जत
वळसंगमध्ये महिलांच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या संघटनांची जबाबदारी कन्याकुमारी बिरादार यांच्याकडे आहे. त्या म्हणाल्या, की 
1) इथल्या महिला अल्पभूधारक व अल्पशिक्षित आहेत. पण त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य दडले आहे. महिन्याला होणाऱ्या बैठकांतून आम्ही अडचणीची देवाण-घेवाण करतो. 
2) हा व्यवसाय कोणत्याही कारणाने बंद पडता कामा नये. त्या दृष्टीने कोणाला पक्ष्यांची गरज आहे किंवा अन्य समस्या आहेत त्या जाणून पूर्ण केल्या जातात. 
3) परसबागेतील कुक्कुटपालन सांभाळून शेती व घरी लक्ष देणेही महिलांना शक्‍य होत आहे. 
शेळीपालन, गटशेतीतून भाजीपाल्याचे प्रयत्न भविष्यात करणार आहोत.

वळसंग पोल्ट्री व्यवसाय दृष्टिक्षेपात

-लसीकरण, पक्ष्यांचे आरोग्य यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घेतली जाते. 
-प्रति हजार पक्ष्यांमागे प्रति महिना एक महिला सुमारे दहा हजार रुपयांचे उत्पन्न घेईल असा प्रयत्न आहे. 
-आठवड्याला बाजारात एक महिला सुमारे 70 ते 80 अंडी विकते. अंड्यांचा प्रति नग दर पाच ते सात रुपये आहे. 
-पक्ष्यांची विक्री वजनावर व मागणीनुसार होते. लहान वयाच्या पक्ष्यांना प्रति नग 150 ते 200 रुपये व मोठ्या पक्ष्यांना 250 ते 300 रुपये दर मिळतो. 
-माडग्याळ व जत अशा दोन बाजारपेठा विक्रीसाठी आहेत. गिरिराज व गावरान पक्षी असल्याने त्यांना मागणी चांगली आहे.
जशी मागणी असेल तशा संख्येने कोंबड्या विकतो. नुकतेच एक ग्राहक 50 कोंबड्या एकावेळी घेऊन गेले. प्रति नग 130 रुपयांनी विक्री केली. थेट ग्राहकांना विक्रीतून अधिक फायदा होतो. उर्वरित पक्षी व्यापाऱ्यांना देतो. किलोला 130 रुपये दराने ते विकत घेतात. सुमारे अडीच ते तीन महिने वयाची कोंबडी असेल तर ती 250 ते 300 रुपयांना जाते. सध्या आमच्याकडे 900 पक्षी आहेत. 

मालन पाटील
संपर्क - कन्याकुमारी बिरादार, 9764171721 
संघटक

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate