मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य गटामुळे बदलून गेले. त्यांचे असे झाले की, माझा मुलगा श्रीराम हा चौदा वर्षांपूर्वी मजुरी करण्यासाठी बाहेरगावी गेला. तो परत चौदा वर्ष झाली तरी घरी परत आला नव्हता. त्याची आम्ही खूप चौकशी केली पण त्याचा काही पत्ता लागला नाही. नातेवाईकांनी तो मेला म्हणून सोडून दिला होता. पण माझी आईची वेडी माया कुठे स्वस्थ बसते! त्याची मी सारखी चौकशी याच्या त्याच्याजवळ करत असे. असेच एके दिवशी मला कुणीतरी सांगितले की, तुमचा मुलगा लातूरला आला आहे. त्याला भेटण्यासाठी माझा जीव अगदी आतुर झाला होता. भेटण्यासाठी व परत त्याला घरी आणण्यासाठी माझ्याजवळ इतका पैसा नव्हता. आता काय करावे? हा प्रश्न पडला. सावकाराकडून कर्ज घ्यावे तर गहाण टाकण्यासारख्या वस्तू माझ्याकडे नव्हत्या. त्यामुळे मुलाकडे कसे जावे हा प्रश्न उभा राहिला.
मग गावातील महिला स्वयंसाहाय्य गटाकडे मी गेले. त्यांना विनंती केली की, मला कृपया तुमच्या गटामधून कर्ज दया. पण गटाचा असा नियम होता की, गटाबाहेरील व्यक्तींना कर्ज देता येत नाही. पण महिलांनी विचारविनिमय करून गटामध्ये विशेष ठराव घेऊन माझ्या मातृत्वाच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी मला शेकडा तीन टक्के(३%) दराने कर्ज दिले. पण गटासाठी दोन टक्के कर्ज दर होता. मला पैसे मिळाल्यानंतर मी लातूरला गेले आणि माझ्या मुलाला घेऊन परत गावी आले.
गावी आल्यानंतर काही महिन्यांनी मी मुलाचे लग्न करून दिले. गटाकडून मी जे कर्ज घेतले हते मी चार महिन्यात परतफेड केली. मुलाच्या सुखी संसाराकडे मी जेव्हा पाहते, तेव्हा स्वयंसाहाय्य गटाने केलेली मदत मला आठवते. कारण मला माझा श्रीराम स्वयंसाहाय्य गटाने केलेल्या मदतीमुळे परत मिळाला होता. आज मी आणि माझी सून स्वयंसाहाय्य गटाची सभासद आहे. माझ्या संसारात मी खूप सुखी आहे. म्हातारपणी अजून काय पाहिजे असते? बचत केल्यामुळे माणसाचे आयुष्यच बदलून जाते, याचा अनुभव मी घेतला आहे.
तुम्हीपण आतापासूनच बचत करा. पैशाची गरज कधी पडेल हे काही वेळा सांगून येत नाही. बचत केली तर ती तुम्हाला कधीपण कामी येऊ शकते.
|
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 7/24/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा बचत...
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विच...
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...