भोयरेखुर्द येथील पाच स्वयंसाहाय्य गटांनी मिळून एक ‘संयुक्त महिला समिती’ तयार केली.
या समितीमार्फत आम्ही महिलांनी कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही १५% द.सा.द.शे. व्याज दराने ऑगस्ट १९९८ मध्ये रु.२३,५००/- चे कर्ज घेतले. दर दोन महिन्यांना (विलायती) जातीच्या ५०० पिल्लाची एक बेच आम्ही खरेदी करत होतो. त्याची वाढ करून दोन महिन्यांनी ती बाजारात विकार होतो. अशा प्रकारचे चक्र चालू होते. या सर्व गोष्टीचा कारभार संयुक्त महिला समितीमार्फत करत असू. सर्व खर्च वजा जाता व कर्ज परतफेड करून आम्हाला थोडाफार फायदा झालेला होता. पण हा कुक्कुटपालन व्यवसाय करताना सुरुवातीला आम्हला अनेक अडचणींना तोंड दयावे लागले.
पिल्ले आणल्यानंतर त्यांची खूप काळजी घ्यावी लागते हे आम्हाला माहिती होते. परंतु सर्वच महिलांना यासाठी वेळ देणे शक्य नव्हते. ह्या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्याकरिता आम्ही आमच्याच गावातील अनुभवी श्री. गायकवाड यांची निवड केली. त्या व्यक्तीकडे स्वतःची शेड होती ती भाडयाने घेण्याचे ठरविले. छोटया पिल्लांना रात्रीच्यासाठी लाईटचा प्रकाश व ऊब हवी असल्यामुळे लाईटिंगची व्यवस्था करावी लागली. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनासाठी लागणाऱ्या पिल्लाची खरेदी, खाद्यपुरवठा, वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारीही महिलांनी त्याच व्यक्तींवर सोपवली. परंतु हे सर्व प्रत्यक्षात करताना बऱ्याच अडचणींना तोंड दयावे लागले.
पिल्ले दोन महिन्यांची झाल्यावर त्यांची खरेदी-विक्री करण्याचे ठरवले. धाब्यावर जास्त भाव मिळत असल्यामुळे काही पिल्लांची विक्री धाब्यावर करण्याचे ठरवले, पण धाब्यावर काही गिऱ्हाईक मिळाले नाही. त्यामुळे एका व्यक्तीच्या विश्वासावर पिल्ले विक्रीची जबाबदारी दिली, परंतु पिल्लांच्या विक्रीसाठी उशीर झाला. त्यामुळे खाद्याचा खर्च वाढला आणि पिल्लांचा भावदेखील कमी मिळाला. अशा प्रकारच्या अडचणींमधून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत होती.
पुढील बेच मध्ये महिलांनी कामाची टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. प्रत्येक वेळेसच महिला कारणे सांगू लागल्या, त्यामुळे पुन्हा संयुक्त महिला समितीने एक बैठक आयोजित केली. ज्या समितीमधील महिला आहेत, त्याच जर समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत, तर त्यांच्या जागेवर ज्या महिला जबाबदारी पार पाडू शकतील अशांची निवड करण्यात यावी असा ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे बैठकीमध्ये जबाबदाऱ्यांचे देखील वाटप करण्यात आले.
त्यानंतरही आम्हाला बरेच अनुभव आले. त्यापैकी विक्री करण्याच्या ठरावानुसार एका गटातील तीन महिला पिल्लांची विक्री करण्यासाठी बाजारात आल्या, पण बाजारात भाव करताना गोंधळून गेल्यामुळे त्यांनी कमी दराने पिल्लांची विक्री केली. त्यांच्यानंतर लक्षात आले, की आपले कुठेतरी चुकले आहे. त्या खूप निराश झाल्या. पण त्यांना समजवण्यात आले, की हा आपला पहिलाच अनुभव आहे, हे नुकसान होतेच. अनुभवातून गिऱ्हाईकाशी भाव कसा करावयाचा या गोष्टी शिकावयास मिळाल्या. अशाच प्रकारच्या एक नाही अनेक अनुभवांमधून आम्ही महिला शिकू लागलो.
आता महिला गोंधळून न जाता योग्य भाव करून कोंबड्या विकतात. विक्रीतून जमा झालेले पैसे स्वतः बँकेत जमा करतात. व्यवसायामधून आमच्या महिलांना स्वतःबद्दल व गटाबद्दलचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. विचारपूर्वक महिला निर्णय घेऊन लागल्या आहेत. आणि सर्व महिलांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली. त्या सर्व व्यवसायामध्ये थोडे अडखळलो, परंतु एकमेकींच्या संगतीने आम्ही व्यवसायाच्या यशाच्या पहिल्या पायरीवर जाऊन पोहोचलो.
आपणही आमच्यासारखे अनुभव घेऊ शकता.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 4/26/2020
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...
दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...