अहमदनगर विभागातील स्वयंसाहाय्य गटाच्या महिलांनी खरोखरच स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ निर्णय घेऊनच महिला शांत बसल्या नाहीत तर त्यांनी खरोखरच त्याची प्रचीती त्यांच्या कुटुंबापुढे व समाजापुढे ठेवली आहे. महिलांनी लहान लहान उद्योगधंद्याद्वारे स्वतःची आर्थिक परिस्थिती सांभाळली आहे. आता पुरुषांना देखील महिलांच्याबद्दल आदराची भावना निर्माण होऊ लागली आहे.
भोयरेखुर्द व आंबेवाडी गावामध्ये अचानक स्वयंसाहाय्य गटातील महिला सर्पदंशामुळे मरण पावल्या. त्यांची कुटुंबे ही त्यांच्यावरच अवलंबून होती व घराचा मुख्य आधार गेल्यामुळे त्या कुटुंबावर-विशेषतः मुलांवर फार मोठा संकटाचा डोंगर कोसळला. ह्या सर्व गोष्टी फक्त मानसिक दृष्ट्या सांत्वन देऊन भागणाऱ्या नाहीत. तर त्याला आर्थिक दृष्ट्या देखील हातभार लावण्याची गरज आहे. त्या महिला स्वतःच्या मुलाबाळांसाठी काहीच करू शकल्या नाही. त्या गोष्टीपासून महिलांनी निर्णय घेतला की, आमच्याही बाबतीत जर असे घडले तर आमच्या मुलांचेही असेच हाल होतील. ह्या गोष्टी विचारात घेऊन महिलांनी एकत्र येऊन काहीतरी करावे व सर्वच महिलांच्या दृष्टीने उपयोगी पडेल म्हणून महिलांनी बैठकीमध्ये ह्या विषयांवर चर्चा केली.
महिलांनी विचार केला, की आपल्या जनावरांचा आपण विमा काढतो. परंतु स्वतःचा विमा का काढत नाही? ह्या विषयावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर महिलांनी स्वतःचा विमा उतरवून घेण्याचा निर्णय घेतला. त्या करीता ‘वॉटर’(WOTRWOTR) संस्थेने विशेष परिश्रम घेऊन विमा योजनेबद्दल माहिती घेतली व महिलांनाही त्याची माहिती दिली. भारत सरकारने “राजराजेश्वरी महिला कल्याण विमा योजना” खास महिलांकरिता करण्यात आली आहे. अपघातापासून मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी ही पॉलिसी असली तरी अपघात ह्या शब्दाची व्याप्ती खालील धोक्यासाठीही केली आहे.
१.घसरून पडणे, २. कीटकदंश, साप किंवा वन्यपशू चावणे, ३. प्रसूती, ४. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ५. गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ६. स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ७. खुण, ८. बलात्कार, ९. अपघातामध्ये पती मरण पावल्यास इत्यादी. ह्या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता वार्षिक हप्ता १५/- व वरीलपैकी कोणत्या कारणाने महिलेचे निधन झाले तर रु. २५,०००/- त्या महिलेच्या वारसदारास मिळतात. त्याप्रमाणे जर ५०% अपंगत्व अपघातामध्ये महिलेचा हात, पाय, डोळा गेला तर त्यापैकी निम्मी म्हणजे रु. १२,५००/- मिळतात. दुर्दैवाने त्या महिलेच्या पतीचे जरी निधन झाले तरी देखील त्या महिलेस रु. २५,०००/- मिळू शकतात.
आज एक वर्षांपासून अहमदनगर विभागातील स्वयंसाहाय्य गटातील जवळजवळ ३०० महिला त्या योजनेमध्ये सहभागी झाल्या आहेत. म्हणजेच जिवंत असतांना तर त्या कुटुंबाची सर्वतोपरी मदत करतच आहेत, व त्या गेल्यानंतरही (मरणानंतरही) त्यांच्या कुटुंबाकरिता व मुलाबाळांकरिता महत्त्वाची सोय करीत आहेत.
त्यांची धडाडी पाहून पुरुषांना देखील अभिमान वाटतो. आपणही ह्या प्रकारचे निर्णय घेऊन उदयाची तरतूद करू शकता. या बाबतीत जवळच्या विमा एजंटना तुम्ही जरूर भेटा.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 4/24/2020
मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य ग...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...