देवगाव हे आमचे छोटेसे गाव. खरे तर हा पूर्ण आदिवासी व मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. परंतु पाणलोटाच्या कामामुळे जणू काही एका गेल्या जन्माची पुण्याई म्हणून हे काम आमच्या गावात सुरु झाले. गावात एकूण २० स्वयंसाहाय्य गट आहेत. दर महिन्याला एकत्र येऊन आम्ही बऱ्याच विषयांवर चर्चा करायचो. पण दरवेळेस आरोग्याचाच विषय प्रामुख्याने पुढे यायचा. परंतु आमच्या गावाची परिस्थिती सांगायची म्हणजे आमच्या गावातील लोक सतत आजारी असायचे. आमच्या गावामध्ये नेहमी समाजसेविका यायच्या व सांडपाण्याच्या, आरोग्याच्या विषयावर माहिती द्यायच्या. आम्हीपण फक्त चर्चा करायचो. पण उपाय मात्र काही सुचत नव्हता.
गावात घराला घर खेटून असल्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था नीट होत नव्हती. घरासमोर चिखल असायचा. तो चिखल कोंबड्या तुडवायच्या, लहान मुलेही त्याच पाण्यात खेळायची. घरासमोर डबकी साचून त्यामध्ये डास व्हायचे. घरासमोर कोरडेपणा म्हणा किंवा स्वच्छता राहातच नसे. यासाठी काय करता येईल?
यावर उपाय म्हणून महिला समाजसेविकेने आम्हाला शोषखड्डे याची माहिती सांगितली की, साधारणतः ६ ते ८ लोकांच्या कुटुंबाकरिता शोषखड्डा तयार करण्यासाठी शोषखड्ड्याची आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक बाय एक बाय एकचा (१ x १ x १) म्हणजे एक मीटर लांबी, एक मीटर रुंद आणि एक मीटर उंच असे चारी बाजूने समान खड्डा तयार करावा लागतो. त्यांच्यावर छोटे दगड, विटांचे तुकडे, मुरूम, वाळू असे एकावर एक थर दयावे लागतात हा खड्डा भरत आळ की, त्यावर कोळसा, फुटलेल्या माठाचे किंवा विटांचे तुकडे असतील तर ते टाकावेत व सर्वात शेवटी जमिनीच्या बरोबरीने एक ते दीड शहाबादी फरशी वरून टाकावी म्हणजे ती जागा वापरामध्ये येऊ शकते.
आमच्या महिलांना ही गोष्ट करता येण्यासारखी होती. महिलांनी ठरविले की, आपण शोषखड्डे खणले तर...? देवगावातल्या सर्व गटांतल्या महिला एकत्र आल्या. सामुदायिकपणे एक बैठक घेतली व सर्व गटांच्या संमतीनुसार महिलांनी शोषखड्डे खणावयाचे ठरवले. अशा प्रकारे महिला कामाला लागल्या. महिलांच्या श्रमांतून बघता बघता १३० शोषखड्डे खणले गेले. अंगण कोरडे झाले. स्वच्छ झाले. शोषखड्ड्यावर फरशी टाकल्यामुळे महिला अंगणात धान्य वाळवायला लागल्या. बैठकीची सुद्धा व्यवस्था झाली. शक्य तिथे वाल, चवळी, दोडके, कारले, घोसाळे अशा प्रकारचे वेलाचे बी आणि पपई आणि शेवग्याचे या झाडांचे बी लावून परसबागा केल्या गेल्या. मोरीचे तोंड शोषखड्ड्यामुळे बंद झाले. रोगराईचे प्रमाण (उदा. मलेरिया, हगवण) कमी झाले. पायवाटा स्वच्छ झाल्या. हे सगळे देवगावातल्या महिलांनी केले. ते बघून इतरही लोक शोषखड्डे खणण्याची इच्छा असल्याच सांगतात.
महिलांच्या एकीतून झालेले हे काम इतरांना प्रेरणा देणार आहे. आता महिला इतर गावांमध्ये त्यांना मेळावा किंवा इतर समारंभासाठी बोलवले तर त्या महिला गावाचा कायापालट कसा झाला ह्याविषयी माहिती सांगतात. आता त्यांना ही कळले आहे स्वच्छतेचे महत्त्व म्हणून महिला सांगतात की,
करूया स्वच्छतेशी दोस्ती, मिळवू रोगापासून मुक्ती.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 7/12/2020
मी कौसाबाई कांदे. माझे आयुष्यच ह्या स्वयंसाहाय्य ग...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ ग...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...