मुंबईतील बांद्रा रेक्लमेशन म्हाडा मैदानात महालक्ष्मी सरस 2016 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे भेट दिली. विविध वस्तूंचे स्टॉल पाहता पाहता एक स्टॉलजवळ माझे पाय नकळत थांबले. नजर स्टॉलवरील वस्तूंवरून फिरू लागली. बांबूपासून हस्तकलेच्या एकाहून एक सुबक गृहोपयोगी वस्तु बनवून विक्रीसाठी ठेवल्या होत्या. तेथे आशाबाई बारे यांच्यासोबत भेट झाली. त्या महालक्ष्मी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. उत्सुकतेपोटी त्यांच्याकडून बचत गटाविषयी माहिती जाणून घेतली.
आशाताई म्हणतात की, मनीपुर, मोर्शी तालुक्यातील (जि. अमरावती) हे छोटेसे गाव आहे. गावात उद्योगधंदे नसून सर्व शेतीवर चालते. माझ्याजवळ शेती नाही. दुसऱ्यांकडे शेतात काम करायचे म्हटले तर बारमाही शेतीचे काम नाही. अशा परिस्थितीत घराचा आर्थिक भार सांभाळायचा कसा? घरात 4 मुले, पती, मी आम्ही सहा जण. त्यात शेतमजुर म्हणून मिळणारी मजुरी फारच कमी. पती व मी शेताच्या मजुरीने घराचा गाडा सांभाळतो.
उद्योग म्हटला तर कुठला करायचा हा प्रश्न. आमचा बांबुपासून टोपल्या, फ्लॉवर पॉट, फुलोरी, आकाश कंदील, टेबल लॅम्प बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. शेतातून आल्यावर वस्तू तयार करायची व दारोदारी विकायला न्यायची. यावेळी मला या व्यवसायातून फारसा नफा नव्हता, फक्त रोजी रोटी व्हायची. ज्या दिवशी शेतीची मजुरी नसली तर हे काम करायचे अशा पद्धतीने काम करत असतांना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याकडून मला हाच व्यवसायातून तुमची कशी प्रगती होऊ शकते याबाबत मार्गदर्शन मिळाले आणि त्यांच्याकडूनच मला व्यवसायाची प्रेरणा मिळाली.
एकटीच्या मेहनतीने व्यवसाय चांगला प्रगत होऊ शकत नाही, हे मी जाणले व बन्सोड साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी पुढचे पाऊल उचलले. माझ्यासारख्याच वस्तू तयार करुन दारोदारी विकणाऱ्या माझ्या सारख्या महिलांची मी भेट घेतली. याच व्यवसायातून आर्थिक उन्नतीचा मार्ग सांगितला. 2004-05 मध्ये 12 महिलांनी मिळून एक बचत गट तयार केला आणि बचत गटाला व्यवसायाकरिता इंडियन बँकेकडून 25,000 चे कर्ज मिळाले. यात बांबू घेतले. सर्वांनी एकत्रित येऊन कामाची सुरुवातीपासून विक्रीपर्यंतचे नियोजन केले. स्थानिक बाजारपेठ, गावात माल विक्रीसाठी जावू लागला. घरातही आम्हाला ऑर्डर मिळत गेल्या. अधून मधुन भुयार साहेबांचे आम्हाला मार्गदर्शन मिळत गेले. यातूनच उद्योगाला आज चांगली चालना मिळाली. बँकेचे कर्ज न घेता दररोज 3 हजाराचा माल तयार करतो. आमचा उद्योग आज 1,50,000 च्या घरात आहे. वर्षातून जिल्हा, तालुकास्तरावर होणाऱ्या प्रदर्शनात सहभाग घेऊन चांगला नफा मिळवत आहे. बांद्रा येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात दिवसात 60,000 ची विक्री झाली.
शेतमजुरी न करता या उद्योगातून मुलांचे शिक्षण, घर, गाडी या सुविधा पुऱ्या झाल्या आहेत. माझ्या बचत गटासाठी कर्ज घ्यायची गरज पडली नाही. प्रदर्शने व स्थानिक बाजार यांच्या माध्यमातून उद्योगाची एवढी प्रगती झाली. जर बचत गटासाठी बारमाही मार्केट शासनाने उपलब्ध करुन दिले तर नक्कीच आमच्या उद्योगाची अधिक प्रगती होईल.
या उद्योगासाठी लागणारा बांबु शेतकऱ्याकडून विकत घ्यावा लागतो. बांबुचे 1, 2 नग घरी आणायला वनअधिकारी परवानगी देतात. हे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहे. राज्य शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान आमच्यासारख्या गरीब महिलांचा बचत गट तयार करुन क्षमता बांधणीचे काम करत आहे. ग्रामीण भागातील उत्पादनाच्या विक्रीपासून व्यवसायवृद्धीसाठी जबाबदारी पेलत आहे. नक्कीच उमेदच्या मार्गदर्शनातून आमच्या उद्योगाला भरारी मिळेल...
लेखिका: संगिता बिसांद्रे, प्रतिवेदक
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 4/23/2020
खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करताना साधारणपणे 2.5...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
वेलंग (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील प्रयोगशील शे...
ऊस तोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे...