वेलंग (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील प्रयोगशील शेतकरी शेखर पाटणे यांनी ऊस लागवड खर्च कमी करण्यासाठी रोपेनिर्मितीची सोपी पद्धत विकसित केली. गरजेतून विकसित केलेली कमी खर्चाची ही रोपवाटिका निश्चितच फायदेशीर ठरणारी आहे.
- अमित गद्रे
ऊस लागवड रोप पद्धतीने केल्यास 100 टक्के क्षेत्रावर उगवण पूर्ण होऊन उत्पादनात वाढ मिळते. सध्याची पाणीटंचाई, लागवड खर्चात बचत करण्यासाठी वेलंग येथील शेखर पाटणे यांनी स्वकल्पनेतून गरजेइतक्या ऊस रोपेनिर्मितीला सुरवात केली. ते म्हणाले, की मी एक डोळा पद्धतीने लागवड करतो. मला ट्रे किंवा पिशवीतील रोपांचा खर्च परवडत नव्हता. उपाय शोधताना खतांच्या पोत्यांच्या पट्ट्यांची कल्पना सुचली. त्यावर रोपे तयार केली तर मुळे जमिनीत घुसण्यास प्रतिबंध होऊन पट्टीवर मुळांची वाढ नियंत्रणात राहते हे लक्षात आले. पहिला प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर या वर्षी 30 गुंठ्यांवरील लागवडीसाठी माझ्या पद्धतीने रोपे तयार करून लागवड केली.
पाटणे यांनी सांगितले रोपवाटिकेचे तंत्र
- माझे लागवड क्षेत्र 30 गुंठे असले तरी पहिल्याच प्रयोगात एक एकरासाठी लागणारी सहा हजार रोपे तयार केली. नेहमी गरजेपेक्षा 20 टक्के जास्त कांड्या लावाव्यात.
- सप्टेंबरमध्ये मशागतीनंतर तीन फूट अंतराने सरी. लावणीच्या दोन सरी सोडून तिसऱ्या मोकळ्या सरीत रोपे तयार करण्याचे नियोजन.
- रोपेनिर्मितीसाठी सरीत पट्ट्या पसरण्यासाठी 50 पोती लागली. एक एकर लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्र लागले. प्रत्येकी 100 फूट लांब खताच्या पोत्याच्या पट्ट्या अंथरल्या. एका पोत्यापासून 15 फूट अंतराची पट्टी तयार होते.
- पट्टीच्या कडा सरीच्या बगलेतील मातीने बुजविल्या. पट्टीवर दोन बोट जाडीचा मातीचा थर दिला. त्यात पुरेसे शेणखत, क्लोरऍन्ट्रानिलीप्रोल (दाणेदार) व डीएपी मिसळून एक डोळ्याची कांडी लागवड केली.
- फुले-265 जातीचे दहा महिने वयाचे प्रमाणित बेणे निवडले.
- त्यानंतर बेणेप्रक्रिया
रोपेनिर्मिती
- बेणेप्रक्रियेनंतर सरीत अंथरलेल्या पट्टीवरील शेणखत- मातीच्या मिश्रणाच्या बेडवर कांडीवरील डोळ्याची बाजू वर करून कांड्या आडव्या ठेवल्या. बेणे लावल्यानंतर पट्टीच्या कडेने मातीत लहानशी चळी घेऊन ती माती बेण्यावर अंथरूण हलकासा दाब दिला. चळीमुळे पट्टीवर जादा झालेले पाणी निघून जाते.
- बेणे लागवड पूर्ण झाल्यावर गरजेनुसार पाणी. चार दिवसांनी तणनाशकाचा वापर. बेण्याची उगवण 15 दिवसांत पूर्ण (पारंपरिक पद्धतीमध्ये 15 ते 25 दिवस लागतात).
- रोपवाटिकेत बेणे लागवडीनंतर 20 व्या दिवशी युरिया सरीत विस्कटून दिला. 21 व्या दिवशी 19ः19ः19 या विद्राव्य खताची फवारणी. क्लोरपायरिफॉस व त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी.
- सुमारे 30 दिवसांत चार पानांची रोपे तयार झाली. पुनर्लागवडीच्या दिवशी कात्रीने रोपांची वरची निम्मी पाने कापली, यामुळे लागवडीनंतर रोपांचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
अशी केली रोपांची पुनर्लागवड
- नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुनर्लागवडीचे नियोजन
- काढणीपूर्वी दोन दिवस आधी रोपांच्या सरीला पाणी दिले. पट्टीची दोन्ही टोके उचलल्याने रोपे आपोआप मातीतून वर आली. रोपे मातीसहित घमेल्यात भरून लागवडीच्या ठिकाणी नेली.
- पुनर्लागवडीत एक मजूर दोन फूट अंतरावर चळी घेऊन दुसरा मजूर रोप व्यवस्थित लावून दाबून घेतो.
- लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी हलके पाणी, चार दिवसांनी तणनाशकाचा वापर.
- सध्या शेतात 100 टक्के रोपे चांगल्या प्रकारे रुजली. उसाला माती परीक्षणानुसार रासायनिक खते दिली आहेत.
- गेल्या पाच वर्षांपासून पाटणे यांना एकरी सरासरी 80 टन उत्पादन मिळते. यंदाही या प्रयोगातून एकरी किमान 70 ते 75 टन उत्पादनाची खात्री आहे. ते म्हणतात, की पुढील वर्षी ऊस बेणे टंचाई जाणवणार आहे. पारंपरिक पद्धतीत एक एकर बेणे मळ्यापासून 15 ते 20 एकर क्षेत्र लागवड होते. माझ्या पद्धतीने याच क्षेत्रातून किमान 100 एकरांपर्यंत लागवड होऊ शकते. उपविभागीय कृषी अधिकारी कृष्णराव धुमाळ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे.
- पाटणे यांनी 30 गुंठे क्षेत्र निवडले असले तरी एकराच्या हिशेबाने सहा हजार रोपे तयार केली.
त्यासाठी रासायनिक खतांची मोकळी पोती (60 नग) - 150 रुपये, एक डोळ्याच्या सहा हजार कांड्या - 2400 रु., बेणेप्रक्रिया साहित्य, लावण, तणनाशक, खते, कीडनाशके, ऊस तोडणी, वाहतूक, कांडी करणे, बेणेप्रक्रिया असा एकूण 4200 रुपये खर्च आला. हा हिशेब पाहता प्रति रोप निर्मिती खर्च 70 पैसे येतो. बाजारात सध्या प्रति रोप अडीच ते साडेतीन रुपयांनी विकले जाते. ऊस तोडणी, वाहतूक, कांडी करणे, बेणेप्रक्रिया ही शेतकरी गटाच्या माध्यमातून केल्याने खर्चात बचत झाली.
पाटणे यांच्या उसाच्या रोपवाटिकेसाठी कोकोपीट, ट्रे, रोप वाहतुकीचा खर्च नाही. आमच्या संशोधन केंद्रावरही अशा पद्धतीने रोपेनिर्मिती करून केलेल्या ऊस लागवडीचे निष्कर्ष चांगले आहेत. शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने रोपवाटिका करून खर्चात बचत करावी.
- डॉ. सुरेश पवार
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा
संपर्क - शेखर पाटणे - 9423968228, 9765090927
माहिती संदर्भ : अॅग्रोवन