1) खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करताना साधारणपणे 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सें.मी. रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीग तयार करावेत. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सें.मी. जाडीचा थर करावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या थरावर तीन ते पाच सें.मी. जाडीचा चांगला कुजलेल्या शेणाचा थर द्यावा. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो. यावर गांडुळे सोडावीत.
2) दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, शेण, धान्याचा कोंडा, तण, गिरिपुष्प, शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासळी खत, कोंबड्यांची विष्ठा यांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर फायद्याचे ठरते. त्यांच्यातील कर्ब : नत्राचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे.
3) संपूर्ण ढिगाची उंची 60 सें.मी.पेक्षा अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. कुजलेल्या सेंद्रिय घटकांमध्ये किमान 50 टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे.
4) साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांत गांडूळ खत तयार होते. गांडूळ खत तयार झाल्यावर त्याचा शंकूसारखा ढीग करावा. ढिगाच्या वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, गांडुळांची पिल्ले यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा. तृणधान्ये आणि कडधान्ये पिकांना हेक्टरी पाच टन गांडूळ खत द्यावे. फळझाडांच्या वयोमानानुसार शेणखताच्या मात्रेच्या निम्मी मात्रा गांडूळ खताची द्यावी.
संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस तोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तूत जीवामृत निर्मि...
सध्याच्या काळात उपलब्ध हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने...