फिनिक्स पक्षाचे उदाहरण आपण अनेकदा ऐकतो. हलाखीच्या अवस्थेतून भरारी घेऊन आपले अस्तित्व निर्माण करणारे बचत गट आणि त्यांच्या सदस्यांमध्ये निर्माण झालेला विश्वास पाहिला की, हे उदाहरण डोळ्यासमोर येते. लातूर जिल्ह्याच्या भूकंपग्रस्त नांदुर्गा तांडा येथील बचत गटांचे आजचे कार्य पाहिले की याची मनोमन खात्री पटते. या गटांनी साधलेल्या उन्नतीची ही यशकथा...
लातूर जिल्ह्यातील किल्लारीचा परिसर 1993 च्या भूकंपामुळे हादरला होता. तेथील रहिवाशांचे जीवन पूर्णपणे उद्धस्त झाले. संसाराचा गाडा ओढायचा कसा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. त्या परिस्थितीत तात्कालिक मदत करण्यासाठी अनेक जण सरसावले, परंतु ते किती दिवस पुरणार... अशातच इंग्लंडच्या एका अशासकीय संस्थेची जेन ऑब्रे ही महिला नांदुर्गा तांड्यावरील लोकांच्या आयुष्यात देवदूत बनून आली. तांड्यावर सर्व बंजारा वस्ती.
हाताला काम म्हणजे केवळ ऊसतोडीच अशी त्यांची तेव्हाची भावना होती. याशिवाय आपण काही काम करू शकू, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी कधी केल्याचे त्यांना आठवत नाही. जेन ने त्यांच्या पारंपरिक दागिने आणि वस्त्रांच्या कारागिरीमध्ये उत्सुकता दाखवून त्यांची निर्मिती आणि विक्री करण्याबाबत रहिवाशांकडे चौकशी केली. तथापि, ते आपण तयार करू शकू, याबाबतचा विचारही त्यांना शिवला नाही.
जेन ला मात्र त्यांच्यातील कारागिरीच्या क्षमतेबाबत विश्वास वाटला. तिने मग दिल्लीच्या एका अशासकीय संस्थेशी संपर्क साधून नांदुर्गा येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. दिल्लीहून खास आलेल्या फॅशन डिझायनर सिरत नरेंद्र यांनी येथील रहिवाशांना खास बंजारा स्टाईलचे डिझाईन्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले. बालाजी पवार या स्थानिक रहिवाशाला यात विशेष गती असल्याचे लक्षात आले आणि थोड्याच कालावधीत ते उत्तमरित्या कारागिरी करण्यात तरबेज झाले.
नंतरच्या काही वर्षात जेन आणि दिल्लीच्या संस्थेने रहिवाशांकडून दागिने बनवून घेतले. त्यांची विविध ठिकाणी प्रदर्शन व विक्री केली.. नफाही कमावला.. आणि काही कालावधीनंतर या रहिवाशांची साथ सोडून ते निघून गेले. पवार आणि इतर स्थानिकांची विवंचना पुन्हा सुरू झाली.
फरक मात्र एक होता.. आता त्यांच्याकडे पारंपरिक दागिने आणि वस्त्रावरील नक्षीकामाचे प्रशिक्षण घेतलेला एक उत्तम कारागिर होता. त्यांच्या रूपाने नांदुर्ग्याच्या लोकांना पुन्हा उठून उभे राहण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला होता. पवार यांनी नांदुर्गा आणि शेजारील लिंबाळा तांड्यावरील महिलांना एकत्र करून प्रत्येकी ११ महिलांचे असे ७ गट तयार केले. सर्वांना कारागिरीचे प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. मनुष्यबळ तयार झाले.. आता प्रश्न होता आर्थिक आधाराचा.. तो सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे विचारणा केल्यानंतर त्यांचे काम पाहून केंद्राकडून दोन लाख रूपयांचे कर्ज मंजूर झाले... आणि सुरू झाली खरी फिनिक्स भरारी... हा क्षणच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये...
बालाजी पवार यांच्याकडे भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यांना पोलिस दलात नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली होती. परंतु व्यवसायाचे महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी तेथेच लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. त्यांनी स्वत: घेतलेल्या प्रशिक्षणाच्या उपयोग करून महिलांना प्रशिक्षीत केले. ऊसतोडीला जाणाऱ्या महिला आता कारागिरी शिकू लागल्या... त्यात हळूहळू तरबेज होऊ लागल्या... गरजेनुसार त्यांच्या घरी देखील काम देण्यात येऊ लागले. व्यवसाय वाढू लागला... आणि दोन लाखांच्या कर्जाची बघता बघता परतफेड झाली. बचतगटांच्या हातात खेळते भांडवल वाढू लागले. काम नाविण्यपूर्ण असल्याने मागणी देखील वाढू लागली.
या सात बचतगटांमध्ये साधना, सोनिया, बंजारा, भरारी, इंदिरा, जगदंबा आणि जय सेवालाल महिला बचत गट यांचा समावेश असून सोनाबाई राठोड या गटांच्या अध्यक्ष तर बालाजी पवार यांच्या पत्नी बबिता पवार या सचिव म्हणून काम पाहत आहेत. नाविण्यपूर्ण कलाकृती बनविण्याची आणि त्यांच्या विक्रीची जबाबदारी पवार पती पत्नींनी स्वत: पेलली असून काम वाढविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
कोणतीही डिझाईन एकदा पाहिली की पवार आता सहज आणि सफाईने बनवितात. सध्या त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या उत्पादनांमध्ये हार, अंगठी, चुडी, बाजूबंद, हासलो, चोखा, घुगरी, चाँद, घुंगर (कंबरपट्टा), घागरा, चोळी, पारा अशा बंजारा समाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या बंजारा स्पेशल वस्तुंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उत्पादनांना प्रतिसादही मोठा आहे.
थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे नांदुर्ग्याच्या बचतगटांचे काम वाढू लागल्याने बालाजी पवार यांनी आता बचत गटांबाहेरील महिलांनाही प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली आहे. भांडवलाची जेव्हा कधी कमतरता भासते तेव्हा किल्लारीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा या गटांना मदत करते. नियमित वेळेत कर्जाची परतफेड करीत बचत गटांनीही बँकेचा विश्वास संपादन केलाय. आता त्यांना भांडवलाची चिंता भासत नाही.
राज्य शासनामार्फत वांद्रे (पश्चिम) येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महालक्ष्मी सरस या बचत गटांच्या प्रदर्शनात आपली कला प्रदर्शित करण्याची संधी त्यांना मिळू लागली आणि गटाचे काम खऱ्या अर्थाने जगासमोर आले. या कामी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) ने त्यांना स्टॉल मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या प्रदर्शनात दररोज सरासरी २५ ते ३० हजारांची विक्री होत असल्याचे श्रीमती बबिता पवार यांनी अभिमानाने सांगितले.
बंजारा समाजाचे वैशिष्ट्य असलेल्या दागिण्यांची आणि कपड्यांवरील डिझाईन्सची लोप पावत चाललेली कला जपण्याची आणि लातूर येथे त्याचे कायमस्वरूपी संग्रहालय निर्माण करण्याची इच्छा आता पवार यांच्या मनात घोळू लागली आहे. यासाठी शासनाकडून मदतीची त्यांना अपेक्षा आहे.
शासन देखील बचतगटांच्या उन्नतीसाठी सातत्याने नवनवीन योजना राबवित आहे. विभागीय पातळीवर बचतगटांचे मॉल स्थापन करणे तसेच इतर मॉलमध्ये बचतगटांच्या उत्पादनांसाठी राखीव जागा ठेवणे असे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे नुकतेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. नांदुर्ग्याच्या बचतगटासारख्याच इतरही बचतगटांना अशा निर्णयांचा लाभ होईल आणि त्यांच्या प्रगतीमुळे दुष्काळग्रस्त भागातील रहिवाशांच्या संसाराला हातभार लागेल हे निश्चित.
नव्हत्याचे होते करून जीवन जगण्याबरोबरच शेकडो महिलांना प्रशिक्षण देऊन उभे करणाऱ्या नांदुर्ग्याच्या या बचतगटांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
लेखक: ब्रिजकिशोर झंवर, सहायक संचालक (महान्यूज)
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 8/7/2020
दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...