एक मंडली सर्प (व्हायपर). नाक व डोळा यांच्यामध्ये खळगा नसल्यामुळे याचा सापांच्या व्हायपरिनी उपकुलात समावेश होतो म्हणजे ⇨ घोणसाप्रमाणेच हा ‘अरंध्र मंडली’ सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव एकिस कॅरिनेटस असे आहे. हा विषारी साप भारतात जवळजवळ सगळीकडे आढळतो. बहुधा मैदानी प्रदेशात जरी तो राहत असला, तरी १,८२९ मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो राहतो; दाट जंगलात मात्र तो नसतो. कडक उन्हाचा त्याला त्रास होत नसावा असे वाटते कारण तापलेली वाळू किंवा जमीन यावर तो पुष्कळदा दिसतो. महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढऱ्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ते बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेले असतात. डोके तिकोनी असून त्याच्यावर बाणासारखी (↑) स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते.
डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा (कंगोरा) असतो. पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दाते असतात. फुरसे दुष्ट असते. त्याला किंचित जरी डिवचले किंवा चिडविले, तर ते इंग्रजी आठच्या (8) आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासते. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून ते झटकन डोके पुढे काढते आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेते. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.
हा साप बेडूक, सरडे, पाली, लहान साप, विंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो. साधारणपणे जुलै महिन्यात या सापाची वीण होते, मादी पिल्लांना जन्म देते. हा साप लहान असला, तरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२०% माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.
लेखक-कर्वे, ज. नी.
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.