অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मला गवसलेला जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल

मला गवसलेला जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल

“बरेच कष्ट, प्रयत्न करून जोनाथन वेगानं उंच उडायला शिकतो. आपण कमावलेलं हे विशेष कौशल्य थव्यामधल्या इतर समुद्रपक्ष्यांना सांगावं, त्यांनासुद्धा मुक्तपणे उंच उडायला शिकवावं अशा हेतूनं तो थव्याकडे परततो; पण थव्यातल्या समुद्रपक्ष्यांना त्याचं यश समजत नाही. त्याचं वागणं विचित्र आणि त्यांच्या आजवरच्या संस्कृतीला सोडून आहे असं त्यांना वाटतं. याची शिक्षा म्हणून ते त्याला वाळीत टाकतात. अगदी साहजिक आहे, आपल्या समाजातसुद्धा हे असंच घडतं की! कुणी काही नवीन करत असेल, तर त्याला होणारा विरोध हा ठरलेलाच असतो...

काही पुस्तकं अशी असतात की, जी पुन्हापुन्हा वाचावीशी वाटतात आणि ती जितक्या वेळा वाचावीत; तितकी जास्त उलगडतात, उमगतात, आवडतात. रिचर्ड बाख यांचं ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ हे पुस्तक याच तर्‍हेचं. वाचू तितक्या वेळा नवीन अर्थ घेऊन येणारं...

जेमतेम शंभर पानांच्या या पुस्तकात लेखक रिचर्ड बाख जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल नावाच्या एका समुद्रपक्ष्याची गोष्ट सांगतात. ही गोष्ट तीन भागांत घडते. पहिला भाग सुरू होतो तो जोनाथनच्या स्वगतापासून. इथं तो स्वतःशीच म्हणतो की ‘इतर समुद्रपक्ष्यांचं जीवनध्येय हे निवळ रोजचं जेवणखाण वेळेवर मिळवणं इतकंच आहे. त्यासाठीच ते उडतात आणि जिवंत राहतात. मी मात्र त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. मला ‘फक्त’ उडायचंय. मोकळ्या आकाशात उंचचउंच जायचंय. सतत उडत राहायचंय. कुणी दुसर्‍यानं ठरवलेल्या ध्येयासाठी नव्हे; तर मला माझ्या स्वतःच्या स्वप्नासाठी जगायचंय, परिपूर्ण व्हायचंय.’

आणि यासाठी हा जोनाथन समुद्रकिनारी एकटाच सराव करतो. हवेत किती अंशात सूर मारला की काय होतं, पंख किती आणि कसे वाकवले वा आखुडले की काय होतं असा त्याचा अभ्यास चालू असतो. त्यात त्याला कधी यश येतं, कधी अपयश. तरीसुद्धा तो हार न मानता स्वतःच्या क्षमता जाणून घेऊन त्या अजून विस्तारण्याचा प्रयत्न करतो. हवेत हवं तसं उडण्यासाठी सतत धडपडत राहतो.

सुरुवातीलाच येणारे समुद्रपक्ष्यांच्या ‘उडण्या’च्या संदर्भातले बारकावे पुस्तक पहिल्यांदा वाचताना फार क्लिष्ट आणि तांत्रिक वाटतात. काय चाललंय काही कळत नाही असंच वाटतं. साहजिकच आहे - कारण पुस्तक वाचणारे आपण कितीही झालं तरी जमिनीवर चालणारे, पळणारे मनुष्यप्राणी आहोत! आपल्याला उडणं आणि त्यातले बारकावे कसे बरं कळणार? (पेशाने वैमानिक असलेले लेखक रिचर्ड बाख मात्र याला अपवाद ठरत असावेत!) पण पुस्तक वाचतावाचता हळूहळू सवय होत जाते.

बरेच कष्ट, प्रयत्न करून जोनाथन वेगानं उंच उडायला शिकतो. आपण कमावलेलं हे विशेष कौशल्य थव्यामधल्या इतर समुद्रपक्ष्यांना सांगावं, त्यांनासुद्धा मुक्तपणे उंच उडायला शिकवावं अशा हेतूनं तो थव्याकडे परततो; पण थव्यातल्या समुद्रपक्ष्यांना त्याचं यश समजत नाही. त्याचं वागणं विचित्र आणि त्यांच्या आजवरच्या संस्कृतीला सोडून आहे असं त्यांना वाटतं. याची शिक्षा म्हणून ते त्याला वाळीत टाकतात. अगदी साहजिक आहे, आपल्या समाजातसुद्धा हे असंच घडतं की! कुणी काही नवीन करत असेल, तर त्याला होणारा विरोध हा ठरलेलाच असतो.

आपल्याला मिळालेल्या वागणुकीमुळं जोनाथन दुखावतो आणि थव्यापासून दूर निघून जातो. एकट्यानंच एका बेटावर राहून उडण्याचा आनंद घेत जगायला लागतो. हे ठिकाण त्याचं स्वतःचं असतं, कुणी दुसर्‍यानं बनवलेले नियम पाळण्याचा वा मोडण्याचा विचार त्याला इथं करावा लागत नाही. तो एकटा असला, तरी स्वतंत्र असतो.

जोनाथनचा अहोरात्र सराव सुरू असताना, त्याच बेटावर त्याच्यासारखेच उडू शकणारे अजून दोन समुद्रपक्षी गोष्टीच्या पुढच्या भागात जोनाथनला भेटतात. ते त्याला एका नव्या जगात घेऊन जातात. गंमत म्हणजे या नवीन जगातले सगळेच समुद्रपक्षी जोनाथनसारखे असतात. त्यांनापण उडायला आवडत असतं. त्यांना पाहून जोनाथनच्या मनात येतं की ‘आपल्याला अजून उंच, स्वच्छंद उडायला शिकायचंय. हा तर समुद्रपक्ष्यांचा स्वर्ग आहे! कारण खूप कष्ट करून वेगानं उडायला शिकलेले ठरावीक समुद्रपक्षीच इथवर पोहोचू शकले आहेत.’ या पक्ष्यांमधल्याच चियांग नावाच्या एका समुद्रपक्ष्याला जोनाथन आपला गुरू बनवतो. चियांगचं म्हणणं अगदी सोप्पं असतं ‘एका पंखापासून दुसर्‍या पंखापर्यंतचं तुमचं शरीर म्हणजे केवळ एक विचार आहे. या विचाराचं बंधन जर तोडाल, तर तुम्ही काहीही करू शकाल.’ आणि चियांगगुरूंसोबत जोनाथन चक्क विचारांच्या वेगानं उडायला शिकतो.

थोड्या दिवसांनंतर चियांग गुरू ते जग सोडून अजून पुढच्या जगात निघून जातात. जाता-जाता, ‘सर्वांवर प्रेम कर’ ही शिकवण जोनाथनला लक्षात ठेवायला सांगतात. ही शिकवण प्रत्यक्षात उतरवण्याच्या उद्देशानं जोनाथन आपल्या सुरुवातीच्या जगातल्या समुद्रपक्ष्यांच्या थव्यात परत येतो. इथं त्याला काही मित्र, तर काही शिष्य समुद्रपक्षी भेटतात. जोनाथन त्यांना वेगानं आणि उंच उडायला शिकण्यात मदत करतो. पुढे हा नवशिक्षित गट थव्याला जाऊन मिळतो आणि जॉनथन आपलं काम संपलं असं म्हणून पुढच्या जगात निघून जातो; हा गोष्टीचा तिसरा भाग.

गेली कित्येक वर्षं जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलची गोष्ट इथंच संपायची, परंतु 2014 साली पुस्तकात गोष्टीचा चौथा भाग नव्यानं जोडण्यात आला. रिचर्ड बाख यांना 2012 साली फार मोठा जीवघेणा विमान-अपघात झाला होता. त्यांना बराच काळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या काळात अनुभवलेल्या जीवनमरणाच्या द्वंद्वाचा अनुभव जगाला कळवावा या हेतूनं त्यांनी जोनाथनच्या गोष्टीचा चौथा भाग लिहिला. आणि गोष्ट बदलली. काहीतरी वेगळं आणि विशेष करून दाखवणार्‍यांना समाज कसं लेखतो, त्यांच्या कृतींचं आणि विचारांचं पुढं काय होतं, याचा धांडोळा जोनाथनच्या पुढच्या जगात जाण्याच्या निमित्तानं या शेवटच्या भागात येतो.

1970 साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ पुस्तकाच्या करोडो प्रती आजवर जगभरात छापल्या गेल्या आहेत. मराठीसह जगातल्या अनेकविध भाषांमध्ये जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलच्या या रूपककथेचे अनुवाद करण्यात आले आहेत. संक्षिप्त रूपातलं ई-बुक, ऑडिओ बुक या स्वरूपांत जोनाथन उपलब्ध आहे. या पुस्तकावर आधारित एक छोटा अ‍ॅनिमेटेड चित्रपटही बनवला गेलाय.

पुस्तक असो, ऑडिओ बुक अथवा चित्रपट. जोनाथनची गोष्ट अगदीच छोटीशी. वरवर पाहावं तर अगदी साधी-सरळ-लहान मुलांसाठी लिहिल्यागत वाटणारी; पण जर प्रत्येक पानावर, वाक्यावर, शब्दावर थांबून विचार केला; तर जागोजागी दडलेली रूपकं आणि प्रतीकं खुणावायला लागतात. जसं की, जेव्हा जोनाथन आपल्या शिष्यांना सांगतो ‘फक्त विचार करा की, तुम्हांला जिथं जायचं आहे; तिथं तुम्ही आधीच पोहोचलेले आहात.’ बस्स! यातलं ‘उडणं’ म्हणजे काय? किंवा ‘जायचं तिथं आधीच पोहोचणं’ म्हणजे काय? विचार करावा तेवढे अर्थ! असंच जेव्हा जोनाथननं ‘पुन्हा भेट कधी?’ विचारल्यावर चियांग गुरू बोलतात ते वाक्य- ‘स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे गेलं की उरतं फक्त ‘इथे’ आणि ‘आत्ता’ - तिथे तर आपण कायमच सोबत आहोत!’  वाह! काय बरं लिहावं यापुढं? रिचर्ड बाख यांच्या लिखाणातली ही गंमत स्वतःच वाचून काय ती अनुभवावी! तीही फक्त एकदा नव्हे, तर पुन्हाऽ पुन्हाऽऽ!

जोनाथनशी ओळख झाली, तेव्हापासून कित्येकदा मी त्याला भेटलोय. तरीसुद्धा दर भेटीत तो नवा वाटतो. दर वेळी नवनवे अर्थ दाखवतो. एकेका अर्थाचा जसजसा शोध घ्यावा, तसतसा जोनाथनसोबत माझा मला मी स्वतः अधिकाधिक समजत, कळत जातो!

(जोनाथन सीगल आणि रिचर्ड बाख यांच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी  :http://www.jonathanlivingstonseagull.com/the-book/)

पुस्तकाचे नाव: जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल

लेखकाचे नाव: रिचर्ड बाख

प्रकाशन: हार्पर कोलिन

पृष्ठे: 131

लेखक: प्रसाद सांडभोर, बेंगलोर, संपर्क : xprsway@gmail.com

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate