'आपल्या परिसंस्थेत असे बरेचसेे पक्षी आहेत; ज्यांना हवामानबदलाचे ज्ञान उपजतच असते. पाऊस, नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी ह्यांसारख्या घटनांची माहिती अशा पक्ष्यांच्या वर्तणुकीत होणार्या बदलांवरून लक्षात येते. हे पक्षी जसे हवामानातील बदलांचे सूचक असतात, तसेच परिसंस्थेतील बदलांचेही. परिसंस्थेतील अनुकूल, प्रतिकूल बदल त्यांच्या अस्तित्वावर परिणाम करणारे असतात. पावसाचे संकेत देणार्या, कोकणातील काही पक्ष्यांबद्दल घेण्यात आलेला आढावा'
आम्ही कोकणात राहणारे. पूर्वेकडे निसर्गसंपन्न सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेला त्यांच्या पायथ्याशी पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोहोंच्या मधली धरती म्हणजे आमचे कोकण. प्रचंड जैवविविधतेचे भांडार असलेल्या ह्या कोकणात माळरानापासून घनदाट जंगलाचा भाग समाविष्ट होतोे. स्वाभाविकच सर्वच प्रकारचे पक्षी कोकणात पाहायला मिळतात. वसंत ऋतू आला की निरनिराळी फळझाडे फुलू लागतात आणि पाणथळ जागेवरील; स्थानिक, पण स्थलांतरित; आणि परदेशातील स्थलांतरित असे असंख्य प्रकारचे पक्षी इथे आपापल्या सुरात ओरडताना दिसतात.
पक्षी हा घटक परिसंस्था आणि हवामान यांमधील बदलाचा निर्देशक असतो. साहजिकच, एखाद्या जातीच्या पक्ष्यांच्या संख्येवरून त्या ठिकाणच्या जंगलाचा, त्याच्या समृद्धीचा; तर त्यांंच्या स्थलांतरावरून, हालचालींवरून हवामानासंबंधीचा अंदाज बांधता येतो. ‘मोर’, ‘पाणकोंबडी’ आणि ‘पावश्या’ ह्यांचे पावसाळ्यापूर्वीचे ओरडणे पाऊस येणार असल्याची पूर्वकल्पना देणारे असते. बर्फाळ प्रदेशात बर्फ पडायला सुरुवात झाली की तिथले स्थानिक पक्षी खाद्यासाठी इतरत्र स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. पावसाळा संपत आला की आपल्या भागात ‘खाटीक’ पक्षी (श्राईक) दिसायला लागतात, तसेच ‘इंडियन रोलर’ नावाचा निळा पक्षी माळरानावर दिसायला लागतो. पावसाचे संकेत देणार्या अशाच काही पक्ष्यांबद्दल माहिती.
खंड्या
कोकणात आढळणारे ‘तिबोटी खंड्या’, ‘निळ्या कानाचा खंड्या’ आणि ‘छोटा खंड्या’ ह्या तीन प्रकारच्या खंड्यापक्ष्यांचे मे महिन्यात होणारे दर्शन पावसाच्या आगमनाचे संकेत देणारे असते. हे पक्षी मे महिन्याच्या मध्यापासून जोरात ओरडत एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. या काळात त्यांचा रंग खूप गडद होत जातो. त्यांच्या रंगांमध्ये होणारा हा बदल त्यांच्या विणीच्या हंगामाचे संकेत तर देतोच, शिवाय पावसाच्या आगमनाचेही संकेत देत असतो. त्यांच्या दिसण्याच्या प्रमाणावरून तिथली पाणथळ जागा किंवा जंगलाच्या घनतेचे प्रमाण लक्षात येते.
काळा कस्तूर व नारिंगी डोक्याचा कस्तूर
कोकणामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ‘ब्लॅक बर्ड’ व ‘ऑरेंज हेडेड ग्राउंड थ्रश’ हे दोन पक्षी आढळतात. ह्या काळात ह्या पक्ष्यांचे ओरडणे सर्वत्र ऐकू येते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून हे पक्षी घरटे बांधायला सुरुवात करतात. ऑगस्टनंतर मात्र हे पक्षी फारसे दिसत नाहीत. त्यांचे प्रमाण ज्या ठिकाणी जास्त दिसून येते, त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आढळते; कारण त्यांचे मुख्य खाद्य गांडूळ, किडे हेच आहे. मात्र अलीकडे या पक्ष्यांचे प्रमाण खूप कमी झाले असल्याचे आमच्या पाहण्यात आले आहे. सातआठ वर्षांपूर्वी यांची संख्या खूप होती. त्या काळात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यात सातत्यही होते. नंतर मात्र बदलत्या हवामानामुळे या पक्ष्यांची वीण कमी होऊन त्यांची संख्या रोडावल्याचे दिसून येते.
नवरंग
पावसाचा संकेत घेऊन येणार्या पक्ष्यांमधील आणखी एक महत्त्वाचा पक्षी म्हणजे ‘नवरंग’. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा पक्षी कोकणात सगळीकडे दिसायला लागतो. हा पक्षी त्याच्या ‘वाईट देव वाईट देव’ (व्हीऽटूऽव्हीऽटूऽ) ह्या शिट्टीने संपूर्ण जंगल जागे करतो. इंग्रजीतून ‘इंडियन पिटा’ या नावाने ओळखल्या जाणार्या या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ‘पिट्टा ब्राच्युरा’ असे आहे. नावाप्रमाणेच नऊ रंग असणारे, 18 ते 20 सें. मी. आकाराचे हे बुटके पक्षी उड्या मारत एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. साधारण सन 2000पासून आम्ही या पक्ष्यांचा अभ्यास करत आहोत.
नवरंग ह्या पक्ष्याच्या कोकणातल्या आगमनानंतर दीड महिन्यात पावसाळा सुरू होतो असे आजवरच्या पाहण्यात आढळून आले आहे. हे पक्षी फक्त विणीसाठीच कोकणात येतात. ‘मे’ ते ‘ऑगस्ट’ हा ह्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. ह्या पक्ष्याचे घरटे जमिनीपासून साधारण 5 ते 15 फूट उंचीवर झाडाच्या बेचक्यात असते. नरमादी दोघेही काड्या जमवून फुटबॉलच्या आकाराएवढे पोकळ घरटे बांधतात. साधारण सहा ते दहा दिवसांत हे घरटे बांधून पूर्ण होते. मुसळधार पावसात यांचे काम सुरू असते.
घरटे पूर्ण बांधून झाले की मादी रोज एक याप्रमाणे चार ते पाच अंडी घालते. नरमादी दोघेही अंडी उबवतात. साधारणतः चौदा ते सोळा दिवसांनी अंड्यांतून पूर्ण गुलाबी रंगाची पिल्ले बाहेर येतात. त्यांना नरमादी दोघेही बेडूक, किडे, नाकतोडे, गोगलगाय अशा प्रकारचे खाद्य भरवतात. बारा ते सोळा दिवसांनी पिल्लांची पूर्ण वाढ होते व पिल्ले घरट्यातून बाहेर उडून जातात. विणीनंतर हे पक्षी दक्षिणेकडे रवाना होतात, पण त्यापुढील अभ्यास अजून झालेला नाही.
मलबारी धनेश/महाधनेश
गेली सात आठ वर्षे आम्ही ‘ग्रेट पाइड हॉर्नबिल’ ह्या मोठ्या गरुडावर अभ्यास करत आहोत. हा पक्षी आकाराने सर्वांत मोठ्या असणार्या पक्ष्यांपैकी एक असून त्याच्या वास्तव्यासाठी मोठे जंगल लागते; पण वाढत्या वृक्षतोडीमुळे ह्यांची संख्या घटत चालली आहे. ज्या ठिकाणी दाट जंगल आहे, अशा ठिकाणी आज हे पक्षी तग धरून आहेत. त्यामुळे हे पक्षी समृद्ध जंगलांचे निर्देशक बनले आहेत. हा पक्षी अतिशय सुरेल आवाजात पावसाचे आगमन सूचित करत असतो.
ड्रॅग्नो ककू
कोतवाल पक्ष्याप्रमाणे दिसणारा, पण शेपटीवर दोन पांढरे ठिपके असणारा ‘ड्रॅग्नो ककू’ हा पक्षी पावसाच्या सुरुवातीपासून म्हणजे जूनपासून दिसतो. हा पक्षी ‘जळता कांटा पिट पिट पिट’ अशा स्वरूपाच्या आवाजात ओरडताना आढळतो. या पक्ष्याचे कोकणात आगमन झाल्यापासून आठवड्या-दोन आठवड्यांत पाऊस पडतो असे समजले जाते.
शामा
‘शामा’ पक्षीदेखील एप्रिलच्या सुरुवातीपासून आपली ऐटदार शेपटी वर करत अतिशय सुरेल आवाजात ओरडत असतो. तो इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करतो. लयीत घातली जाणारी नर शामा पक्ष्याची शीळ, घरट्यासाठी नरमादींची चाललेली लगबग ही पावसाळा जवळ आल्याचे दर्शवते.
पाकोळ्या
मोठ्या संख्येने तारेवर बसणारे ‘पाकोळ्या’ पक्षी थंडीच्या वातावरणाचे संकेत देतात. त्यांनी चोचीत माती घेऊन घरटे बांधायला सुरुवात केल्यानंतर महिनाभरातच पाऊस पडायला सुरुवात होते.
पाणपक्षी
‘पाणपक्षी’सुद्धा पावसाच्या आगमनाची वाट बघत असतात. त्यांच्या रंगांमध्ये होणारे बदल, त्यांचे ओरडणे हे वातावरणातील बदलांचे संकेत देणारे असते. पूर्वी रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणपक्ष्यांची संख्या भरपूर होती; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पावसाच्या अनिश्चिततेमुळे खाद्याची उपलब्धता कमी होऊ लागली आहे. परिणामस्वरूप, पाणपक्ष्यांची वीण कमी झाली आहे. हे सर्व हवामानात होणार्या बदलांमुळेच घडत आहे.
निसर्गसाखळी जोपासणार्या या पक्ष्यांच्या प्रमाणात घट झालेली आहे. नदीपात्रात मिसळलेल्या रसायनांमुळे जलचरांच्या आणि जलचरांवर जगणार्या पाणपक्ष्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. वृक्षतोडीमुळे हवामानातील उष्म्याचे प्रमाण वाढल्याने जंगली पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. पावसाची अनियमितता वाढली असून त्याचा विपरीत परिणाम जलस्रोतांवर, पाणथळ जागांवर आणि पाणथळ जागी आढळणार्या पक्ष्यांवर होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचे चक्र पूर्णपणे बिघडल्याने खंड्यासारख्या पक्ष्यांच्या विणीवरही परिणाम झालेला पाहायला मिळाला. काही ठिकाणी पाऊस लवकर गेल्याने खंड्याची पिल्ले अन्नाअभावी घरट्यातच मेलेली दिसली. पिकांवर परिणाम झाल्याने चिमणीसारख्या पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. वाढत्या समुद्री वादळांमुळे पक्षी भरकटतात. अरबी समुद्राच्या काठांवर गेली काही वर्षे ‘मास्केड बुबी’ (मोठा समुद्री कावळा) नावाचा पक्षी पाहायला मिळतो आहे. हा पक्षी खोल समुद्रात राहणारा आहे, पण वाढत्या वादळांमुळे हे किनार्यावर भरकटत असावेत. उष्म्याचे प्रमाण वाढून थंडीचे प्रमाण घटत आहे, त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कमी झालेला पाहायला मिळतो आहे. हे सर्व थांबवण्यासाठी कठोर पावले उचलायला हवीत व पर्यावरणपूरक असाच विकास व्हायला हवा; नाहीतर हे पक्षी नामशेष होण्यास फार काळ लागणार नाही हे निश्चित.
लेखक: सचिन पालकर, पक्षि अभ्यासक, चिपळूण, संपर्क: sachinbpalkar82@gmail.com
माहिती स्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 1/30/2020
या वर्षी आपत्कालीन परिस्थिती म्हणून वसंतराव नाईक म...
कृषी पराशर ग्रंथातील पहिल्या 10 श्लोकांत पराशर ऋष...
अवकाळी पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध...
ग्रामीण भागातच नव्हे तर सुशिक्षितांमध्येही विजांबा...