অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्जन्याचा अंदाज - विविध पद्धती

कृषी पराशर ग्रंथातील पहिल्या 10 श्‍लोकांत पराशर ऋषींनी शेती, शेतकरी व अन्नाचे उत्पादन या सर्वांचे महत्त्व सांगितले आहे. पावसावर आधारित असल्याने पर्जन्याचा, हवामानाचा अंदाज घेण्याच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत.

शेतकरीच खरा राजा

  • जो मनुष्य शेती करतो, तोच खऱ्या अर्थाने "भूपती' (भूमीचा धनी) असतो. एखाद्या श्रीमंताकडे कितीही सोने-चांदी, दागदागिने, कपडे असले, तरी ज्याप्रमाणे एखादा भक्त परमेश्‍वराची प्रार्थना करतो, त्याप्रमाणे त्याला शेतकऱ्यांकडे कळकळीची याचना करावी लागते. एखाद्याने गळ्यात, कानात, हातात, सोन्याचे दागिने घातले आणि त्याच्याकडे अन्न नसेल, तर तो भुकेने व्याकूळ होतो. फक्त शेतीमुळे कोणाचाही याचक होण्याची वेळ येत नाही.
  • अन्न म्हणजे जीवन. अन्न म्हणजे शक्ती, बळ. अन्न म्हणजे सर्वस्व. देव, दानव, मानव सर्व जण अन्नावरच जगतात. शेतीशिवाय धान्य नाही. म्हणून बाकी सर्व सोडून, सर्वांनी शेती करण्याचेच कष्ट घ्यावेत.
  • तमीळ कवी तिरुवल्लीवर (इ.स. 125) यांनीही असेच विचार मांडले आहेत. ते म्हणतात, आपल्या पिकाच्या भरघोस, दाणेदार कणसांच्या सावलीत, ज्यांचे शेत झोपते, त्या मंडळींकडे पाहा. त्यांच्याच राज्याच्या छत्रीखाली राजे-महाराजांच्या छत्र्या वाकतील. (अय्यर 1998).

पर्जन्यवृष्टी व ज्योतिषशास्त्र

"कृषि-पराशर"मधील 243 श्‍लोकांपैकी, निदान 117 श्‍लोकांमध्ये फलज्योतिषविषयक काही संदर्भ आहेत. त्यावरून त्या काळी असलेले ज्योतिषशास्त्राचे महत्त्व लक्षात येते.

  • शेती ही संपूर्णपणे पावसावर अवलंबून असते. म्हणजेच आपले जीवन हे पावसावर अवलंबून असते. म्हणून सर्वप्रथम पावसाविषयी ज्ञान मिळविण्यासाठी धडपड करायला हवी, असे पराशराचे मत आहे. पर्जन्यवृष्टीबद्दलचा अंदाज 69व्या श्‍लोकांमध्ये याच ज्योतिषशास्त्राच्या आधारे सांगितला आहे. प्रत्येक वर्षी एक विशिष्ट ग्रह सत्तेवर असतो व दुसरा ग्रह त्याच्या दुय्यम असतो. विशिष्ट ढगांवर पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अवलंबून असते. प्रबळ व सत्ता गाजवणारा ग्रह शोधण्याची पद्धत त्याने सांगितली आहे.
  • - संपूर्ण वर्षाचा किंवा वर्षातील काही महिन्यांतील पर्जन्यवृष्टीचा आणि अचानक पाऊस येण्याचा अंदाज वर्तविण्यासाठी पराशर ऋषींनी अनेक पद्धतींचा उल्लेख केला आहे. वार्षिक पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविण्यासाठी पराशराने ग्रह, ढगांचे प्रकार, वाऱ्याची दिशा, धुके, नदीच्या पाण्याची पातळी, सूर्याचे मेषातून होणारे संक्रमण व इतर नक्षत्रांशी संबंध यावर आधारित या पद्धती आहेत.
  • सूर्य जर प्रबळ सत्ताधारी असेल, तर सरासरी पाऊस पडतो. डोळ्यांचे आजार, ज्वर येणे आणि इतर अनेक अरिष्टे, तुटपुंजा पाऊस, सतत वाहणारा वारा ही काही वैशिष्ट्ये त्या वर्षाची राहतात.
  • चंद्र प्रबळ असेल तर मुसळधार पाऊस पडतो. ज्या वर्षी चंद्र सत्ताधारी असतो, तेव्हा उत्तम पीक निघून पृथ्वी संपन्न होते आणि मानवाला ते वर्ष आरोग्यदायी असते.
  • मंगळ असेल तर तुटपुंजा पाऊस पडतो. ज्या वर्षी मंगळ प्रभावी असतो, तेव्हा पिकांचे नुकसान होते आणि माणसांत आजार फैलावतात. पृथ्वीवर पिकांचा अभाव असतो. (17)
  • बुध सत्ताधारी असेल तर चांगला पाऊस पडतो. त्या वर्षी पृथ्वी रोगराईपासून मुक्त असते. वाहतूक सुरळीत चालते. पीक भरपूर येते. सर्वप्रकारच्या धान्यांनी पृथ्वी पावन झालेली असते. (18)
  • जर गुरू त्या वर्षीचा राजा ग्रह असेल तर पाऊस समाधानकारक पडतो. त्या वर्षी पृथ्वीवर धर्म प्रबळ असतो. लोकांना शांती लाभते. पाऊस चांगला पडतो. संपूर्ण पृथ्वीला सुबत्तेचा आनंद मिळतो. (19)
  • शुक्र हा दानवांचा गुरू असून, ज्या वर्षी त्याची सत्ता असते, तेव्हा निश्‍चितपणे राजांची भरभराट होते. सुबत्ता आणि विपुलता लाभते. शुक्र उत्तम पाऊस दर्शवितो. नानाप्रकारचे उत्तम धान्य लाभून पृथ्वी धन्य होते. (20)
  • ज्या वर्षी शनी प्रबळ सत्ताधारी असतो, तेव्हा युद्ध, वादळी पाऊस, रोगराईचा उद्रेक या गोष्टी हटकून घडतात. पाऊस अत्यल्प असतो व वारे सतत वाहतात. शनिराजा पृथ्वीस कोरडे आणि धुळकट ठेवतो. (21)

ढगांचे प्रकार

पराशराने आवर्त, संवर्त, पुष्कर आणि द्रोण असे ढगांचे प्रकार सांगितले आहेत.

  • प्रत्येक वर्षी कोणत्या प्रकारचे ढग आहेत, हे शोधण्याची पद्धत पराशर देतात. किती प्रकारचे अग्नी आहेत, तो आकडा (3) त्या वर्षी जे शक आहे किंवा असेल त्या आकड्यात मिळवायचा, नंतर जितके वेद आहेत, त्या आकड्याने म्हणजे (4) ने त्याला भागायचे. भाग गेल्यानंतर जो आकडा शिल्लक राहील, त्यावरून ढग कोणत्या प्रकारचे आहेत, ते कळते. (उदा. क्रमांकाप्रमाणे आवर्त वगैरे.) (23)
  • आवर्त ढगांमुळे काही भागांतच पाऊस पडतो. संवर्तामुळे सगळीकडे पाऊस पडतो. पुष्कर ढगात पाणी अल्प प्रमाणात असते. द्रोण ढग मात्र पृथ्वीला भरपूर पाणी देतात. (25)

किती पाऊस पडेल हे ठरविण्याची पद्धत

पाऊस किती प्रमाणात पडणार आहे, याचा अभ्यास करून, त्याप्रमाणे शेतीची योजना आखण्यास सांगितले आहे. प्राचीन काळी पाऊस मोजण्यासाठी "आढक' हे परिमाण आहे. 100 योजने सपाट व 30 योजने खोल जागेत साठलेले पाणी मोजून "आढके' (जल आढके) ठरवतात.

  • जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो व जेव्हा चंद्र कन्या, मेष, वृषभ अथवा मीनमध्ये असतो, तेव्हा 100 आढके पाऊस पडतो. जेव्हा सूर्य मिथुन, सिंह राशीत असतो, तेव्हा 80 आढके पाऊस पडतो.
  • जेव्हा सूर्य कर्क, कुंभ अथवा तुळ राशीत असतो, तेव्हा 96 आढके पाऊस पडतो.
  • पर्जन्य देवता इंद्र नेहमी पावसाच्या पाण्याचे दहा भाग समुद्राला बहाल करतो, सहा भाग पर्वतास व चार भाग पृथ्वीला देतो.

हवामानाची स्थिती

श्‍लोक 30 ते 33 पर्यंत वाऱ्याची दिशा पराशराने सांगितली आहे.

  • अडीच दिवस हे परिमाण धरून वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास करावा. तज्ज्ञांनी पौष महिन्यापासून दर महिना पाऊस किती पडला किंवा पडला नाही हे मोजावे.
  • उत्तरेकडून व पश्‍चिमेकडून येणारा वारा पाऊस पडेल असे सूचित करतो. पूर्वेकडून व दक्षिणेकडून येणारा वारा पावसाचा अभाव दर्शवितो. वातावरणात वाऱ्याची हालचालच नसेल, तर पाऊस नाही असे समजावे आणि वाऱ्याची अनियमित हालचाल असेल तर पाऊस अनियमित पडेल असे सूचित होते.
  • पौष महिन्यात पाऊस किंवा धुके असेल, तर 7 व्या महिन्यात पूर येण्याची शक्‍यता आहे. (श्‍लोक 35).
  • महिन्यात 5 दंड हे दिवसाचे परिमाण आहे. महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत दिवसा पाऊस पडतो व दुसऱ्या 15 दिवसांत रात्री पाऊस पडतो. पताका लावलेला एक दांडा रोवून मागोवा घ्यावा.

पर्जन्यवृष्टीचा अंदाज

श्‍लोक 48 ते 52 मध्ये ठराविक दिवशी बदलणारी नदीच्या पाण्याची पातळी सांगितली आहे.

  • महिन्याच्या शुक्‍ल पक्षातील पहिल्या दिवशी वाहत्या नदीच्या पाण्यात रात्री एक दांडा ठेवून पावसाचे निरीक्षण करावे. "ॐ सिद्धी' या मंत्राचा दोनशे वेळा जप करून त्या दांड्यावर एक खूण करून, त्या खुणेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावा. सकाळी या खुणेचे निरीक्षण करावे. पाण्याची पातळी वाढली आहे, की कमी झाली आहे, हे पाहून त्या वर्षी किती पाऊस झाला हे समजून घेता येईल. जर पातळी तितकीच असेल, तर पाणी व पाऊस गतवर्षी इतकाच असेल. जर पातळी कमी झाली असेल तर गतवर्षीपेक्षा पाऊस व पाणी तुलनेने कमी असेल. केलेल्या खुणेपेक्षा पाण्याची पातळी अधिक उंचावर असेल तर पाऊस व पाण्याचे प्रमाण दुप्पट असेल. पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविण्यासाठी पराशराने हे मानक दिले आहे.
  • सूर्याचे मेषातून संक्रमण होत असताना, "समुद्र' नावाचा नक्षत्र समूह असेल तर अतिवृष्टी सूचित होते. "पर्वत' नावाचा नक्षत्र समूह असेल तर दुष्काळ सूचित होतो. कक्षा नावाचा नक्षत्र समूह, "तीर' संगम नावाचा नक्षत्र समूह असेल तर उत्तम पाऊस सूचित केला जातो.
  • डॉ. नेने यांच्या मतानुसार, आधुनिक काळानुसार "ज्योतिषशास्त्रावर आधारित हे सर्वसामान्य गणिती आराखडे आहेत. प्रत्येक रीत इतकी साधी-सोपी होती, की कोणताही सामान्य शेतकरी शक दिनदर्शिकेची माहिती असल्यास सहजपणे हे श्‍लोक पाठ करून या पद्धती शिकू शकत होता. एकाच पद्धतीवर अवलंबून पर्जन्यवृष्टीचा नक्की अंदाज वर्तविता येत नाही. आणखी काही पद्धती विकसित झाल्या आहेत. आपण मात्र पर्जन्यवृष्टीचा नक्की अंदाज सांगण्याचे काम हळूहळू विद्वानांवर सोपवून दिले

 

- डॉ. रजनी जोशी

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate