मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. ह्या पदाच्या दोन संकल्पना प्रचलित आहेत: पहिली संकल्पना‘मानसिक विकारांचा अभाव’ अशी असून ती अभावार्थी व अपूर्ण आहे. आधुनिक संकल्पना भावार्थी असून ती अशी आहे :‘ज्या दीर्घकालीन मानसिक अवस्थेत व्यक्तीला एकंदर बरे वाटते (भाव सर्वसाधारणपणे सुखकारक असतात तसेच गैरभावनांचा अतिरेक नसतो), तिची विचारसरणी बुद्धिप्रणीत व वागणूक समाजमान्य असून जीवनातील विशिष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी ती झटत असते, तरीपण ते न साधल्यास असंतुष्ट होत नसते, तिला मानसिक आरोग्य असे संबोधतात.’ ह्या संकल्पनेतील फक्त महत्त्वाचे गुणक वर दिले आहेत. याशिवाय इतर गुणक आहेत, ते असे : (१) इतरांशी, विशेषतः निकटवर्तियांशी आधारदायी व स्थिर नाते जुळवण्यांची क्षमता. (२) आत्मप्रतिमा उंचावलेली नसली, तरी डागळलेलीही असता कामा नये. स्वतःच्या उणिवा प्रथम मान्य करून मग त्या सुधारण्याची तसेच स्वतःच्या क्षमता वाढवून त्या पूर्णत्वाला न्यायची तयारी. (३) आप्तेष्टांच्या व समाजाच्या कल्याणाशी बांधिलकी. (४) समस्या, दडपणे व संकटे ह्यांना तोंड देण्याची तयारी. (५) इतरांच्या व्यक्तिमत्त्वाला तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य तो आदर दाखवण्याची व महत्त्व द्यायची तयारी. (६) जीवनात वाटचाल करण्यासाठी लागणारी समर्पक वृत्ती व जोपासलेली जीवनमूल्ये.
अर्थात सर्वसाधारण व्यक्तीचे मानसिक आरोग्य आदर्श नसल्याकारणाने वरील गुण कमीअधिक प्रमाणात असणे मानसिक आरोग्याच्या संकल्पनेत अंतर्भूत आहे. तसेच वरील गुणांचे प्रमाण व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक क्षमतेवर तसेच सामाजिक व सांस्कृतिक स्तरावरही अवलंबून असते.
मानसिक आरोग्याची दशा ठरविणारे कारक पुढीलप्रमाणे आहेत :
मानसिक आरोग्याचा अभाव म्हणजेच मानसिक अनारोग्य. ह्या सदरात मानसिक विकाराशिवाय, तीव्र व दीर्घ असंतुष्टता, सामाजिक विकृत वर्तन, अनिवार्य अशा वाईट सवयी– उदा., नखे खाणे, अतिरेकी व्यसने – ह्यांचाही समावेश केला जातो.
(अ) सीमान्त (बॉर्डरलाइन) विकार. उदा., विक्षिप्त, लहरी, विकृत, श्रमवेडी अथवा एकान्तवासी व्यक्ती. (आ) व्यसने, वाईट सवयी व विकृत आवडी. (इ) उपप्रसंग (एपिसोड) व प्रतिक्रिया (रिॲक्शन्स). (ई) रोग (डिसीझ).
मानसचिकित्सेच्या दृष्टीकोनातून केलेले वर्गीकरण ‘मानसचिकित्सा’ ह्या नोंदीत तपशीलवार दिले आहे.
अतिप्राचीन भारतातील चिकित्सकांना मानसिक विकारांची कल्पना नीट आलेली नव्हती. त्या काळात माणूस असंबद्ध बोलू अथवा वागू लागला की त्याला भुताने अथवा परकीय आत्म्याने झपाटले आहे किंवा कुणी दुष्ट हेतूने जादूटोणा केला आहे, असे समजले जात होते. अशा व्याधीवर अंगारे-धुपारे, मंत्रतंत्र इ. लोकभ्रमावर आधारित व गुह्य उपाय केले जायचे. देवाचे नाव घेऊन प्रचलित धार्मिक संकेत अथवा भाकिते सांगू लागल्यास, देव अंगात आले असे समजून त्या व्यक्तीला पूज्य मानीत असत. अशा कल्पना ग्रामीण समाजात अजूनही रूढ आहेत.
सुमारे २,५०० वर्षांपूर्वी मनाबद्दल शास्त्रोक्त कल्पना आयुर्वेदात मांडली गेली ती अशी : देह, इंद्रिये, मन व आत्मा मिळून शरीर बनते व या चारींच्या संयोगाला जीवित अथवा आयुष्य अशी संज्ञा आहे. मन हे स्वतंत्र अणुरूप द्रव्य असून त्याचे स्थान (चेतनास्थान) हृदयात आहे. म्हणून ते अंतरेंद्रिय. मनावरचे नियंत्रण वायू अथवा प्राण ह्यांच्यातर्फे होते व मन स्वतःचे व इंद्रियांचे नियंत्रण करते. तसेच ते ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय या दोन्ही स्वरूपाचे (उभयात्मक) आहे. मनामुळे बाह्य विषयांचे ज्ञान एका वेळेस एका इंद्रियातर्फे होते. मनाचे कार्य संकल्पन स्वरूपात असते. इंद्रियांतर्फे झालेले बाह्य विषयाचे ज्ञान मुळात आलोचनात्मक व निर्विकल्पक असते. नंतर मन, अहंकार व बुद्धी ह्या तिहीने बनलेल्या अंतःकरणात पुढील क्रिया होतात :
मन बाह्य विषयाच्या घटकांचे पृथःकरण करते (म्हणजे अनावश्यकाचा त्याग व आवश्यक अंशाचे एकत्रीकरण) तसेच संकल्पित कल्पना निर्माण करते. त्यानंतर अहंकार हा आवड, इच्छा ठरवतो आणि त्यानुसार अभिमान बाळगतो. बुद्धी ही विषयपरीक्षण करून स्वतःच निर्णय घेते. या एकत्र अभिप्रायानुसार मन पुढील कार्यवाही कर्मेंद्रियातर्फे करते. मनाचे पोषण करणारे अंश अन्नात असतात असे मानणारा ‘आहार शुद्धी सत्त्वशुद्धिः’ नामक सिद्धांत आहे.
‘धी’,‘धृति’ व ‘स्मृति’ अशा तीन मानसशक्ती आहेत. धी म्हणजेच बुद्धी, धृती ही संयमशक्ती असून ती मनाचे नियमन करते व स्मृती योग्य तत्त्वाची आठवण देऊन मनाला सावध करते.
मनाचे विविध ‘गुणधर्म’ आहेत. पैकी सत्त्व हा गुण इष्ट समजला जातो. रज व तम हे दोष मानले जातात. ह्या गुणदोषांच्या निरनिराळ्या प्रमाणावर आधारित अशा मनाच्या तीन प्रवृत्ती (चित्तप्रकृती) वर्णिलेल्या आहेत : (१) सात्विक म्हणजे संयमी, विवेकी व जिज्ञासू. (२) राजस म्हणजे उत्कट, अतिसंवेदनाक्षम व प्रेरणाप्रधान. (३) तामस म्हणजे अज्ञानी, मोहवश व निष्क्रीय. काम, क्रोध, लोभ, मोह इ. मनोवृत्ती रज व तम या दोषांमुळे वृद्धिंगत होतात आणि मनाचे आवेग तयार होतात. मोहाचा अतिरेक हे चित्तविकल्पाचे लक्षण आहे.
रज व तमामुळे मानसशक्ती भ्रष्ट झाल्यास मानसिक कर्म बिघडते. भोगतृष्णा प्रबळ होते व आचरणात चुका होतात. ह्यालाच ‘प्रज्ञापराध’ म्हणतात. प्रज्ञापराधामुळे बुद्धिभ्रंश, स्मृतिभ्रंश आणि धृतिभ्रंश होतो. जी गोष्ट जशी समाजावयाला हवी तशी न समजता तिच्याविषयी ज्या विपरीत कल्पना असतील त्यांनुसार ग्रहण केली जाते व तसे वर्तन घडते. मानसविकार ह्याच्यातूनच उद्भवतात. ह्याशिवाय मानसविकारांची आधिभौतिक कारणेही आहेत : (१) अभिशप्तक (मोठ्यांचे शाप). (२) मंत्रप्रयोग (करणी, जादूटोणा). (३) उपसर्गकृत (भूतपिशाच).
तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.
आयुर्वेदात सर्वच रोगांची तीन पूर्वरूपे सांगितली आहेत:
(१) किंचित शारीरिक, (२) किंचित मानसिक आणि (३) किंचित शारीर-मानसिक. हा सिद्धांत आधुनिक मनोशारीरिक ऐक्याच्या संकल्पनेशी बराच जुळतो. आयुर्वेदात रोगांचेही तीन प्रकार वर्णिलेले आहेत ‘त्रयोरोगाः निजागन्तुमानसाः’ (१) उपजत, (२) आगन्तु (परिसरापासून जडलेले) व (३) मानसिक.
आयुर्वेदात मानसलक्षणसमूहाला प्राधान्य दिले आहे. परंतु मानसरोगांचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. उन्माद व अपस्मार ह्या दोनच व्याधींचे वर्णन स्वतंत्र विकार म्हणून नव्हे, तर इतर रोगांतील लक्षणसमूह म्हणून केलेले आहे.
उन्मादाचे सहा प्रकार व अपस्माराचे चार प्रकार वर्णिलेले आहेत. उन्मादात ज्ञान (इंद्रियजन्य), विज्ञान (बुद्धी), वाणी, चेष्टा (हावभाव), शक्ती व वीर्य (विशेष शक्ती)‘अमानुष’ स्वरूपात दिसतात असे वर्णिलेले आहे. अपस्माराचा एक पोटप्रकार म्हणजेच ‘योषापस्मार’ (स्त्रियांतील अपस्मार). त्याला आधुनिक वैद्यकशास्त्रात उन्माद वा तांत्रिकोन्माद (हिस्टेरिया) म्हणतात.
भूतबाधा हा स्वतंत्र विकार नसून एक कारक आहे; ज्यापासून अनेक शारीरिक व मानसिक व्याधी होऊ शकतात, त्याचे देव, दानव, पिशाच इ. अठरा प्रकार नमूद केलेले आहेत.
आयुर्वेदात विकारांच्या प्रत्यक्ष उपचारांपेक्षा मानसिक आरोग्य तसेच नीतिमत्ता समृद्ध करण्यासाठी प्रतिबंधक उपाय जास्त सांगितलेले आहेत.
मुख्यत्वे अशा उपचारांचे तीन प्रकार आहेत :
(१) मंत्र, (२) औषधी व अंगावर वापरण्यासाठी मणी, (३) मंगळ, (४) बळी (अग्नीतील उपहार), (५) उपहार (अर्पण करणे), (६) होमहवन, (७) नियम, (८) प्रायश्चित्त, (९) उपवास, (१०) स्वस्तपयन (मंगल विधी), (११) प्रणिधान, (१२) तीर्थाटन आणि (१३) अभिमर्शन (स्पर्श व मंत्रोच्चार).
विरक्ती, शुद्ध रहाणी, मनोवेगावरोधन (इंपल्स कंट्रोल) व मनोवृत्तींचा (काम, क्रोध व मोह) निरोध. तसेच भोगातृष्णेवर नियंत्रण ठेवून दुःखमुक्ती हे आयुर्वेदीय मानसचिकित्सेचे धोरण आहे.
याशिवाय त्रासनचिकित्सा व मंत्रचिकित्सा ह्या मानसिक व्याधींवरील उपचारांचाही वापर बराच होतो.
शरीरास होणाऱ्या दुःखाच्या भीतीपेक्षा प्राणाची भीती अधिक ह्या तत्त्वावर ही चिकित्सा आधारलेली आहे. त्यामुळे चहुकडे फाकलेले मन स्थिर होते व रुग्ण विकारमुक्त होतो. ह्यांतील ‘मानसआघात उपचारां’त रुग्णाला दात काढलेल्या सापांच्या माणसाळलेल्या सिंह व हत्तींच्या तसेच दरोडेखोरांच्या सान्निध्यात काही काळ बंदिस्त ठेवतात. ‘विरुद्ध मनोवृत्ति’ ह्या उपचारांत अतिरेकी भावनेच्या विरुद्ध स्वरूपाची भावना जागृत करणे. उदा., भीतीविरुद्ध क्रोध, दुःखाच्या विरुद्ध कामप्रेरणा व क्रोधाविरुद्ध हर्ष. ह्या उपचारपद्धतीत आणि आधुनिक अध्ययनोपचाराच्या तत्त्वावर आधारलेल्या ‘इमोटिव्ह इमेजरी’ ह्या उपचारात बरेच साम्य आहे.
श्रद्धोपचाराच्या तत्त्वांचा उपयोग प्रामुख्याने ह्या चिकित्सेत केला जातो. याशिवाय आश्वासन व प्रशमन (सांत्वन) ह्या मनाला आधार देणाऱ्या उपचारांचाही अवलंब केला जातो. आधुनिक आधारदायी मानसोपचाराची उद्दिष्टेही अशीच आहेत.
आयुर्वेदाशिवाय प्राचीन काळापासून भारतात हठयोग व राजयोग या काळाने मान्य केलेल्या पद्धतीनुसारही मनःशांती मिळवली जाते. तसेच विशेष प्रयत्नांनी मोक्ष अथवा जीवनमुक्तीही (उपनिषदांत उल्लेखिलेली) या जन्मी ब्रह्म व जीवात्मा यांचे ज्ञानद्वारा ऐक्य व बौद्ध धर्माप्रमाणे निर्वाण या प्रकारे मिळवता येते. हठयोगातील निरनिराळ्या आसनांनी शारीरिक व्याधी तसेच मानसिक विकार यांच्यावर मात करता येते. विशेषतः निद्रानाश, चिंतावस्था, भयगंड या विकारांतून शवासनाने मुक्त होता येते. मानसिक विकारांवर नियमित योगासने ही उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय म्हणून जास्त प्रभावी ठरतात. योगविद्येने विशेषतः प्राणायाममार्गे, कुंभकाचा (श्वासावरोधाचा) काळ क्रमाक्रमाने वाढवून प्रत्याहार (२५ पळे), धारणा (५ घटका), ध्यान (६० घटका) व शेवटी समाधी (१२ दिवस) साधता येते. कुंभकाने कुंडलिनी (सुप्तावस्थेत असलेली अंतःशक्ती) जागृत करता येते. त्यामुळे सर्व रोगांपासून मुक्ती मिळून योगी अमर (दीर्घायू) होतो असा समज आहे.
पाश्चात्त्य देशातंही अतिप्राचीन काळी, भारताप्रमाणे मानसिक विकारांबद्दल पूर्ण अज्ञान होते व असाधारण किंवा विचित्र वर्तन, विचार वा भावना ह्या भूतबाधा, जादूचा अंमल अथवा अंगात येण्यामुळे उद्भवतात अशी समजूत होती. इ. स. पू. ४६० ते ३५७ ह्या काळात विख्यात ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ याने अशा विकारांची कारणे नैसर्गिक असून भूतपिशाच नव्हे, ह्या आधुनिक मतप्रणालीचे प्रतिपादन केले. तसेच त्याने मानसिक विकारांचे निदानीय दृष्ट्या तीन वर्ग केले आहेत, ते असे : (१) मनोव्यापारांचा अतियोग (मॅनिया), (२) खिन्नता (मेलँकोलिया) व (३) बुद्धिभ्रंश (फ्रेनायटिस). यांचे निदानीय वर्णन करून त्यांवरील‘मानसोपचार’ ही त्याने सांगितले. प्लेटो (इ. स. पू. ४२९–३४७) ह्या सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्त्यानेही, मानसिक विकारांच्या कारणांबद्दल तुलनात्मक दृष्ट्या आधुनिक असे सिद्धांत सादर केले. त्याने केलेले आत्म्याचे तीन भाग आणि फ्रॉइड यांनी ‘सायके’ चे (मानस) केलेले तीन विभाग यांत बरेच साम्य आहे. प्लेटोने ‘मानसिक आरोग्य’ ह्या संकल्पनेला पूरक कल्पना मांडली होती, ती अशी :‘शरीर व मन यांचा समन्वय म्हणजेच आरोग्य’.ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) ह्या प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्त्याने प्रथमच, मानसिक विकारांवरील उपचार म्हणून भावविरेचनाचा अवलंब करावा असे सांगितले. इ. स. १२४ मध्ये ॲस्किलपायडीझ व इ. स. १६० मध्ये गेलेननेमानसिक अनारोग्याच्या स्वरूपाबद्दल व कारणांबद्दल बरीच मीमांसा केली आणि मनोव्याधींचे शारीरिक कारणमूलक आणि मानसिक कारणमूलक असे दोन निरनिराळे वर्ग केले.
पुढे तिसऱ्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या काळात धार्मिक उपचार, श्रद्धोपचार (विशेषतः हस्तस्पर्शाने), आधिभौतिक उपचारांच्या नावाखाली मानसिक रुग्णांना क्रूर वागणूक तसेच पिशाच परिहार वगैरे उपचार प्रचलित होते. १८४५ मध्ये ग्रायसिंजर यांनी मानसिक विकार मेंदूच्या रोगामुळे होतात, असे ठामपणे सांगितले तसेच ह्या विषयावरील पहिले पाठ्यपुस्तकही लिहिले. १८८९ मध्ये एमील क्रेअपेलीन यांनी मानसिक विकारांचे वर्गीकरण शास्त्रोक्त पद्धतीने केले आणि छिन्नमानस ह्या विकारावर सुप्रसिद्ध प्रबंध लिहिला. तो आजही अधिकृत संदर्भग्रंथ म्हणून वापरात आहे. ⇨ झां मार्तँ शार्को व बर्नहाइम यांनी संमोहनाचा शास्त्रोक्त उपयोग, उन्माद वगैरे विकारांच्या वैद्यकीय उपचारासाठी केला. तथापि त्यांनी शारीरिक म्हणजे मेंदूच्या विकृतिजनक कारकांवर अधिक भर दिला. फ्रान्ट्स मेस्मर ह्या लोकप्रिय संमोहनविद्यातज्ञाने, आपल्या यशस्वी उपचाराने मानसिक कारकांकडे लक्ष वेधले. [→ वैद्यकीय संमोहन]. पुढे शार्को व बर्नहाइम यांनी उन्मादावर संमोहनीय उपचार प्रचलित केला. शार्कोचे विद्यार्थी ⇨ प्येअर झाने, योझेक ब्रॉइअर व सिग्मंड फ्रॉइड यांनी याच उपचाराच्या साहाय्याने उन्माद व इतर मज्जाविकृतींच्या मानसिक कारणांचा सखोल अभ्यास केला. [→ संमोहनविद्या]. त्यातूनच पुढे ब्रॉइअर व फ्रॉइड यांनी ‘ॲना ओ –‘ या उन्मादी रुग्णाचा उपचार करीत असताना, अबोध मनाचा शोध लावला. फ्रॉइडने पुढे स्वतंत्रपणे, मुक्त साहचर्य ह्या तंत्राने रुग्णांच्या अबोध मनाचा व त्यातील मनोगतिकीय यंत्रणेचा सखोल अभ्यास करून १८९७ मध्ये मनोविश्लेषण ही युगप्रवर्तक प्रणाली संस्थापित केली. म्हणूनच त्यांना ‘मानसचिकित्साशास्त्राचे जनक’ असे मानाने संबोधले जाते. काही वर्षानंतर कार्ल युंग वॲल्फ्रेड ॲड्लर ह्याफ्रॉइडच्या शिष्यांचा, फ्रॉइडशी अर्भकीय लैंगिकतेच्या सिद्धांतावर तीव्र मतभेद झाल्यामुळे त्या दोघांनी स्वतंत्र संशोधन सुरू केले. युंग यांनी⇨ विश्लेषणात्मक (ॲनॅलेटिकल) मानसशास्त्र व ॲड्लर यांनी वैयक्तिक वा ⇨ व्यक्तिमानसशास्त्र (इंडिव्हिज्युअल) अशा नवीन मनोविश्लेषणात्मक प्रणाली स्थापित केल्या.
‘अबोध मनातून उगम पावून व्यक्त होऊ पाहणारी चिंता हेच मनोविकाराचे कारण’ ह्या फ्रॉइड यांच्या मूळ सिद्धांतावर आधारलेल्या निरनिराळ्या स्वतंत्र नव-मनोविश्लेषणात्मक (नियोफ्रॉइडीयन) प्रणाली पुढे अस्तित्वात आल्या.
त्यातील मुख्य तत्त्वे अशी आहेत :
इतर मानसचिकित्सा प्रणाली पुढे दिल्याप्रमाणे आहेत :
१९१४ मध्ये सुप्रसिद्ध रशियन मानसशास्त्रज्ञ ⇨ आय्. पी. पाव्हलॉव्ह यांच्या कुत्र्यावरील अभिसंधित प्रतिक्रियेच्या यशस्वी प्रयोगाने, प्रयोगिक मानसशास्त्राचामानसचिकित्साक्षेत्रात प्रवेश झाला. १९२४ मध्ये जे. बी. वॉटसनह्या दुसऱ्या सुप्रसिद्ध प्रायोगिक मानसशास्त्रज्ञाने वर्तनवाद ही नवीन प्रणाली अस्तित्वात आणली. ह्याप्रणालीनुसार व्यक्तिमत्त्वविकास सामाजिक वातावरणावर ‘अवलंबित’ वा अभिसंधित असतो. ⇨ बी. एफ्. स्कीनर या मानसशास्त्रज्ञाने ‘क्रियावलंबी अभिसंधाना’ चा (ऑपरंट कंडिशनिंग) शोध लावून (१९५३) तसेच डॉ. वोल्पे यांनी‘पारस्परिक स्तंभन’ (रेसिप्रोकल इन्हिबिशन) या तत्त्वाचा अभ्यास करून ‘अध्ययनोपचार’ (लर्निंग थेरपी) अथवा‘वर्तनोपचार’ (बिहेवियर थेरपी) ह्या अत्याधुनिक मानसोपचाराचे एक नवे पर्व सुरू केले (१९५४). ह्या प्रणालीनुसार मनोविकृतीचे लक्षण ही एक समायोजनास घातक अशी आणि नकळत संपादन केलेली वाईट सवय असून ती घालवता येते आणि परिसराशी समायोजना करण्यास उपयुक्त अशा जुन्या सवयी म्हणजेच सामान्य (प्राकृत) वर्तन पुन्हा शिकता येते.
आधुनिक मानसचिकित्सेतील भौतिक उपचारांची सुरुवात १९३३ मध्ये एल्. जे. मेडुना यांनी प्रवर्तित केलेल्या ‘रासायनिक शॉक उपचाराने’ झाली. त्यांनीच पुढे ३०% कार्बन डाय-ऑक्साइड व ७०% ऑक्सिजन यांच्या मिश्रणाने अन्तःश्वसन हे तंत्र मज्जाविकृतीच्या ताणमय अवस्थांच्या उपचारासाठी वापरले. १९३६ मध्ये ई. मोनीझ या शल्यचिकित्सकांनी पहिली मेंदूची शस्त्रक्रिया करून मानसशल्यचिकित्सा (सायको सर्जरी) ह्या मानसचिकित्सेतील नवीन उपचारास सुरुवात केली. १९३७ यू. सेर्लेटी यांनी विद्युत आघात उपचार (इ. सी. टी.) शोधून काढला. त्यामुळे बऱ्याच तीव्र चित्ताविकृतींवरील उपचार सुलभ व यशस्वी होऊ लागला. १९३८ मध्ये एम्. झाकेल यांनी छिन्नमानसावर इन्सुलिन उपचारास सुरुवात केली. १९५२ मध्ये पहिले शांतक औषध ‘क्लोरप्रोमॅझिन’ जे. डिले यांनी शोधून काढले तसेच १९५७ मध्ये आर्. कुन यांनी पहिल्या अवसादरोधी औषधाचा-इमिप्रॅमीन शोध लावला. त्यानंतर आजपर्यंत जवळजवळ तीस शांतके (ट्रँव्किलायझर्स) व पंधरा उत्तेजके (ॲटि-डिप्रेसंट्स) तयार केलेली असून त्यांतील बहुतेक आजही वापरात आहेत. ह्या आधुनिक ⇨ मानसौषधींमुळे जवळजवळ सर्व मानसिक विकारांवरील उपचार सुलभ झाला आहे. ह्या विषयावर जगभर बऱ्याच प्रमाणात संशोधन चालू असून दरवर्षी अनेक नवीन मानसौषधी वैद्यकीय चाचणीसाठी डॉक्टरांकडे पाठविल्या जातात; मात्र त्यांतील सुरक्षित आणि प्रभावी अशा थोड्याच औषधी शेवटी वापरात आणल्या जातात.
मनोरुग्णांना माणुसकी दाखवून त्यांची पंधराव्या शतकापासून सेवा करणारी सर्वांत जुनी संस्था बेल्जियम येथील ‘खेल’ वसाहत असल्याचे सांगितले जाते. तेथील मनोरुग्णांना तेथील नागरिकांच्या घरांत ‘शुल्कदाते अतिथी’ म्हणून ठेवतात आणि त्यांना वैद्यकीय उपचांराव्यतिरिक्त व्यवसायोपचारही देण्यात येतो. उत्पादक कामासाठी त्यांना मोबदला दिला जातो शिवाय सुधारणा झाल्यावर वसाहतीत त्यांना नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसाय करून रहाता येते. अशा तऱ्हेने रुग्णाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ती वसाहत स्वीकारते.
पॅरिसमध्ये १७९२ मध्ये पी. पीनेलने जुन्या मनो-रुग्णाश्रमांतील (असायलम्) वेड्यांना शृंखलामुक्त करून त्यांना माणुसकी दाखवली. त्यानंतर त्यांचे शिष्य ई. एस्क्यूईरॉल यांनी उपचारांची व्यवस्था असलेले दहा मनोरुग्णाश्रम बांधले. याच सुमारास इंग्लंडमध्ये ‘यॉर्क रिट्रिट’ नावाची मनोरुग्णांची सेवा करणारी धार्मिक संस्था विल्यम ट्यूक हे धर्मगुरू चालवीत होते. १८१२ मध्ये बेंजामिन रश ह्या मानसचिकित्सकाने अमेरिकेतील फिलाडेल्फिया या शहरातील सर्वसाधारण रुग्णालयांत पहिल्यांदाच मनोरुग्णांची सोय केली. त्यांना अमेरिकन मानसचिकित्सेचा जनक म्हणतात. १८४१ मध्ये डिक्स ह्या शिक्षिकेने उपेक्षित मनोरुग्णांच्या सेवेसाठी समाजात जागृती निर्माण करून चाळीस वर्षांत बत्तीस मनोरुग्णालये सुरू केली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंड व अमेरिकेत मनोरुग्णालयांची संख्या वाढली; परंतु प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांची संख्या अमाप वाढून त्यांची आबाळ होऊ लागली. अमेरिकेत, १९०९ मध्ये सी. डब्ल्यू. बीअर्स ह्या माजी मनोरुग्णाने मनोरुग्णालयातील आपल्यावाईट अनुभवाबद्दल पुस्तक लिहिले आणि समाजात मनोरुग्णांच्या व्यथांबद्दल कुतूहल व सहानुभूती निर्माण केली. पुढे त्यांनी मनोरुग्णांच्या कल्याणासाठी एक संस्थाही स्थापन केली आणि मानसिक आरोग्य विज्ञान (मेंटल हायजीन) ह्या चळवळीला सुरुवात केली. १९१९ मध्ये तिला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. ह्या चळवळीतूनच सामाजिक-मानसिक आरोग्य (कम्युनिटी मेंटल हेल्थ) म्हणजेच सामाजिक मानसचिकित्सा हा विषय निर्माण झाला. ह्यातील प्रतिबंधक उपायांच्या अभ्यासाला प्रतिबंधक मानसचिकित्सा (प्रिव्हेंटिव्ह सायकिॲट्री) असेही संबोधतात. मानसिक विकृतीचा प्रतिबंध, अभिज्ञान व त्वरित उपचार आणि पुढे मानसिक रुग्णांचे पुनर्वसन ही ह्या विषयाची उद्दिष्टे आहेत.
१९५० च्या पुढे आधुनिक उपचारांमुळे बऱ्याच रुग्णांना घरी पाठवणे शक्य होऊन मनोरुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आणि १९६० च्या पुढे अमेरिकेत बाह्य रुग्णसेवा यंत्रणा पुरेशी व कार्यक्षम झाल्यामुळे रुग्णालयातील संख्या बरीचशी कमी झाली. आज प्रगत देशांत खाजगी संस्था, शुश्रूषागृहे व बाह्यरुग्णसेवा ह्या अत्याधुनिक असून त्यातच बहुतेक रुग्णांचा उपचार होत असतो. ह्याशिवाय दिवा-रुग्णालये (डे हॉस्पिटल्स), अर्धपथगृहे (हाफवे होम्स) ह्या संस्थांत चित्तविकृतींसारख्या तीव्र दुखण्यांचाही योग्य उपचार होऊन रुग्णांचा आपल्या कुटुंबियाशी व समाजाशी संपर्क सतत ठेवला जातो. त्यामुळे रुग्णाचे पुढे पुनर्वसन सोपे जाते.
आधुनिक आदर्श मनोरुग्णालयांत रुग्णांची संख्या कमी आणि सेवकवर्ग जास्त असायला पाहिजे. रुग्णांना नुसते सांभाळण्याऐवजी (कस्टोडियल केअर) त्यांना बरे करायची जबाबदारी सर्व सेवक वर्गाने वाटून घ्यायची असते. म्हणून प्रशासनाचे विकेंद्रीकरण करून घटकप्रमुखांच्या (बहुधा मानसचिकित्सकांच्या) हातात स्वतंत्र कारभार सोपवलेला असतो. शिवाय रुग्णाविषयी व त्याच्या उपचाराबद्दल आपले विचार मांडायची मुभा सर्व सेवकांना दिलेली असते. रुग्णालाही स्वतःच्या उपचाराबद्दल बोलायला संधी दिली जाते आणि सुधारलेले रुग्ण इतर रुग्णांवरील उपचारास मदतही करतात. एकंदर वातावरण उपचारपोषक असे असते. ह्यालाच आसमंतोपचार (मिलू थेरपी) किंवा उपचारपोषक समाज (थेराप्युटिक कम्युनिटी) म्हणतात.
हीच कल्पना संपूर्ण समाजाला लागू केल्यास ‘सामाजिक-मानसिक आरोग्य’ ह्या संस्थेचा उगम होतो. समाजाच्या घटकांचे म्हणजे व्यक्तीचे मानसिक आरोग्य तसेच संपूर्ण समाजाच्या शांततामय व विकृतिरहित अशा स्थितीची जोपसना ही समाजाची सामुदायिक जबाबदारी मानली जाते. ह्यासाठी व्यापक व सुसूत्र असा सामाजिक (शासकीय आणि खाजगी) कार्यक्रम हवा. ह्या कार्यक्रमामुळे विकार जडलेली व्यक्ती, तिचे कुटुंब व सामाजिक परिसर ह्या सर्वांच्या स्थितीचे निर्धारण केले जाईल व ज्यांना उपचाराची अथवा मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना ते सतत, केव्हाही व खात्रीने मिळेल. तसेच जरूर पडल्यास सामाजिक परिस्थिती बदलण्याएवढी क्षमता असलेली यंत्रणाही हवी.‘समाज मनोस्वास्थ्य केंद्र’ ह्या अत्याधुनिक केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने चालवलेल्या पुढील सोयी उपलब्ध हव्यात: चोवीस तास तत्पर सेवा, दिवारुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालयातील मानसचिकित्सा सेवेचा बाह्यरुग्ण विभाग, तातडीची सेवा तसेच मार्गदर्शन केंद्र.
‘उपचारापेक्षा प्रतिबंध जास्त प्रभावी’ हा नियम मानसिक आरोग्याच्या जतनासाठी जास्त लागू पडतो. ह्याचा प्रत्यय काही असाध्य चित्तविकृतींवरून येतो. अशा तीव्र मनोविकारांचा उगम एकतर आनुवंशिकतेत असतो किंवा व्यक्तिमत्त्व विकृतींत असतो. व्यक्तिमत्त्व-विकासाचा पाया लहानपणीच घातला जातो आणि बहुतेक व्यक्तिमत्त्वविकृती बालमनोविकासात येणाऱ्या बाधेमुळे उद्भवतात. तेव्हा मानसिक आरोग्याचे संवर्धन म्हणजेच मानसिक विकारांचे प्रतिबंधन; म्हणजेच बालमनोविकासाचे सुस्थितीकरण आहे, असे समीकरण केले जाते. हे उमजण्यासाठी आणि त्या दिशेने प्रयत्नशील होण्यासाठी समाज बालआरोग्यभिमुख झाला पाहिजे आणि त्यासाठी ह्या विषयाचे प्रथम लोकशिक्षण केले पाहिजे.
शैशवास्थेत मातेचे उबदार सान्निध्य व सुखदायी पोषण तसेच आईवडिलांच्या मृदू स्पर्शाने मिळणारे उत्तेजन आणि लाडिक स्वराने होणारे कौतुक अत्यावश्यक असते. त्यातूनच शाश्वततेची भावना व पालकाबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण होतो. मातेचे सान्निध्य व प्रेमळ लक्ष कुठल्याही कारणाने गमावल्यास व्यक्तिमत्त्वविकासात व्यत्यय येतो.
बाल्यावस्थेत हेच संरक्षण, उत्तेजन व कौतुक अमर्याद वा अतिरेकी राहिल्यासदेखील व्यक्तिमत्त्वविकास सुरळित होत नाही. कारण ह्या वयात बाळाला परिसराची ओळख होण्यासाठी शोधबोध करण्याची संधी तसेच बागाडायला व धडपडायलाही मुभा देणे आवश्यक असते. परंतु मूल प्रथमच घराबाहेर जाऊ लागते, तेव्हा त्याला बाहेरच्या धोक्यांबद्दल योग्य ती समज दिली पाहिजे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिउत्साही धावपळीला आणि फाजील कुतूहलाला मर्यादा घातलीच पाहिजे. बंधने स्वीकारण्यास मूल तयार नसल्यास अथवा हट्टाचा गैरवापर करीत राहिल्यास, सौम्य शिक्षाही केली पाहिजे; तरच वाढणारे मूल बंधने आत्मसात करून आत्मसंरक्षण आणि शिस्त शिकते. आईच्या आदर्शावरून मुलगी आणि वडिलांच्या आदर्शावरून मुलगा, आपआपली आत्मप्रत्यभिज्ञा (सेल्फ-आयडेंटिटी) आणि लिंगप्रधान भूमिका (सेक्स डिटरमिन्ड रोल) प्रथमच शिकतात. हे अध्ययन पुढे हळूहळू परिपक्व होऊन कुमारावस्थेत परलिंगीयांशी सामाजिक संबंध नैसर्गिक रीत्या ठेवण्याची कला शिकली जाते. ह्या भूमिकांचे व वर्तनकौशल्यांचे विकसन नीट न झाल्यास प्रौढावस्थेत लैंगिक अथवा वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात. ह्याच वयात अहंभावनेची वाढ होऊन आत्मप्रतिमा (सेल्फ इमेज) साकार होऊ लागते. हाच व्यक्तिमत्त्वविकासाचा मुख्य आधार आणि केंद्रबिंदू होय. कौटुंबिक समस्या किंवा आर्थिक-सामाजिक संकटांमुळे पालक-पाल्याचे नाते बिघडलेले असल्यास आत्मप्रतिमा कच्ची राहू शकते आणि पुढे व्यक्तिमत्त्वही कमजोर बनते.
घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेरच्या मोकळ्या, परंतु असुरक्षित वातावरणात पाउल टाकायला शेजारचे खेळगडी तसेच आईवडिलांनी दाखवलेली क्रीडांगणे व इतर करमणूक केंद्रे यांचे आकर्षण यांची मदत होते. घरात सुखावलेल्या लाडक्या मुलांना शाळेत प्रवेश करणे कठीण जाते; परंतु शेवटी आईवडिलांचा रोष तसेच इतर समवयस्कांचे उदाहरण त्यांना शाळेत जायला भाग पाडते. शिवाय शाळकरी मुलाचे दप्तर, खाऊचा डबा आणि त्यातून मिळणारी एक अजब प्रतिष्ठा तसेच शाळेतून परत आल्यावर होणारे खास कौतुक मुलाला शालेय जीवन मान्य करायला लावते.
किशोरावस्थेत मूल घरात आईवडील, मोठी भावंडे व इतर नातेवाईक तसेच शाळेत शिक्षक व वरच्या वर्गातील हुशार मुले ह्यांच्या उदाहरणाने हळूहळू उद्योगप्रियता व शिस्तबद्धता आत्मसात करते. ह्या वयात आईवडिलांनी मुलांना सदाचाराचे उदाहरण व शिकवण दिल्यास तसेच हळूहळू त्यांच्या स्वार्थी वृत्तीला आळा घातल्यास, पुढे सामाजिक कर्तव्ये व नीतिमूल्ये स्वीकारणे त्यांना सोपे जाते. स्वावलंबनाचे पहिले धडे याच वयात द्यावे लागतात. तेव्हा मुलाचेपालकाशी किंवा शिक्षकाशी नाते समृद्ध नसल्यास चारित्र्याची घडण आणि व्यक्तिमत्त्वविकास कच्चा रहातो.
कुमारावस्थेत शारीरिक वाढ झपाट्याने होत असल्यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढतो. स्वतःच्या आवडीनिवडी, विविध विषयांवरील विचार व सामाजिक वृत्ती साकार होतात. स्वतःच निवडलेल्या आदर्श व्यक्तींच्या उदाहरणाने व वाढलेल्या ज्ञानाने महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ लागते. जसे कार्यक्षेत्र व्यापक होते तसे वरच्या पिढीचे बंधन व वर्चस्व जाचक वाटू लागते. बंड करणे नैसर्गिक असतेच शिवाय आत्मप्रतिष्ठेला ते उत्तेजकही ठरते. अशा वेळी आईवडिलांनी तसेच शिक्षकांनी दाखविलेला खंबीरपणा आणि प्रेमळ मार्गदर्शन बहुतेक मुलांना प्रचलित सामाजिक नीतीचे अनुसरण मान्य करायला लावते. लैंगिक बदल मात्र काही वेळा गोंधळवणारे किंवा घाबरवणारे ठरतात. अशा वेळी समलिंगी पालक किंवा शिक्षकाने लैंगिक शिक्षण व समजूतदारपणाने केलेले मार्गदर्शन करावयास हवे. नाहीतर वाईट सवयी आणि त्यांतून अपराधभावना-गंड किंवा न्यूनगंड यांची निर्मिती होऊ शकते.
दिवास्वप्ने व वास्तवता यांतील तफावत समजून घेऊन वास्तवतेशी स्थिर आणि अविरत नाते जोडण्यास पालक, शिक्षक त्याचप्रमाणे जवळचे मित्र यांची मदत होते. स्वभावातील दोषामुळे वा कौंटुबिक अस्वास्थ्यामुळे हे समायोजन कठीण जाते आणि मुले अंतर्मुख होण्याचा संभव वाढतो. वेळीच योग्य अशी मदत न मिळाल्यास मनोविकार जडण्याचाही धोका निर्माण होतो. कारण ह्या वयात कुटुंबियांपासून मिळणारे संरक्षण कमी झाल्यामुळे तसेच शैक्षणिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तणावकारक प्रसंग वाढतात. (उदा., परीक्षा, भांडणे इ.) व त्यांना तोंड देण्याची क्षमता क्षीण असल्यास शिवाय आधार व मार्गदर्शन मिळणे कठिण झाल्यास मानसिक आरोग्य बिघडून मानसिक विकृतींची लक्षणे दिसू लागतात. बहुतेक मनोविकार या वयात ह्याच कारणांमुळे प्रथम उद्भवतात.
उच्च शिक्षण, दर्जेदार साहित्य, पालकाचे व आवडत्या थोर नातेवाईकांचे आदर्श तसेच इतर हितचिंतकांच्या उपदेशाने व उदाहरणाने जीवनउद्दिष्टांना व जीवनमूल्यांना आकार येतो. शैक्षणिक वा क्रीडा आणि कलाक्षेत्रात मिळालेल्या यशामुळे व होणाऱ्या कौतुकामुळे आत्मसाफल्याची भावना वाढते आणि आत्मविकास समृद्ध होतो. तसे न घडल्यास जीवनाशी व सामाजिक वातावरणाशी करावे लागणारे समायोजन कठीण जाते. काही वेळा मुलाच्या बाह्यदर्शनी स्वतंत्र बाण्यामुळे, ‘त्याला आमची गरज नाही’ असा गैरसमज होऊन मुलाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते. आस्थेने केलेली चौकशी आणि हळुवारपणे पण आत्मविश्वासाने केलेल्या स्पष्ट सूचना बंडखोर कुमारही स्वीकारतात. शिकवणीतली तत्त्वे व सामाजिक नीतिमूल्ये आणि त्याउलट व्यवहारात आढळून येणारी तत्त्वांची पायमल्ली व अनीती यांमुळे होणारा गोंधळ व क्षोभ शमविण्यासाठीदेखील ह्या मार्गदर्शनाची निकड असते. त्यासाठी तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलाशी पालकांनी सतत संपर्क व हितगुज चालू ठेवले पाहिजे; तरच मानसिक आरोग्याचा पाया भक्कम राहिल.
भारतात पाश्चात्त्य पद्धतीनुसार मानसचिकित्सेची सुरुवात १७९५ मध्ये मद्रास येथील मनोरुग्णाश्रमाने झाली. दुसरे रुग्णाश्रम वाराणसीमध्ये १८०९ मध्ये स्थापन झाले. त्यानंतर एकोणिसाव्या शतकातच धारवाड, बरेली, नागपूर, वॉल्टेअर, आग्रा, त्रिवेंद्रम, कोझिकोडे, तेझपूर, हैदराबाद व बडोदा या शहरांत मनोरुग्णाश्रम बांधले गेले. विसाव्या शतकात रुग्णाश्रमाचे रुग्णालयात हळूहळू रूपांतर होत गेले आणि नवीन एकवीस रुग्णालये सुरू केली. आजच्या एकूण ३८मनोरुग्णालयांची राज्यवार विभागणी पुढे दिल्याप्रमाणे आहे आंध्र २ (वॉल्टेअर व हैदराबाद), आसाम १ (तेझपूर), बिहार (रांची) ३ पैकी १ खाजगी, दिल्ली १, गोवा १ (पणजी), गुजरात ५ (अहमदाबाद, बडोदे,. भावनगर, जामनगर व भूज), काश्मीर १ (श्रीनगर), कर्नाटक २ (बंगलोर व धारवाड), केरळ ३ (त्रिवेंद्रम, त्रिचूर व कालिकत), मध्य प्रदेश १ (ग्वाल्हेर), महाराष्ट्र ५ (येरवडा, ठाणे, नागपूर, रत्नागिरी आणि एक खाजगी मिरज), ओरिसा १ (कटक), पंजाब १ (अमृतसर), राजस्थान २ (जयपूर, जोधपूर), तमिळनाडू १ (मद्रास), उत्तर प्रदेश ४ (वाराणसी, आग्रा, बरेली आणि १ खाजगी-लखनौ), पश्चिम बंगाल ४ (कलकत्ता-सर्व खाजगी).
आज भारतात एकंदर अडतीस मनोरुग्णालये आहेत. त्यांत राहणाऱ्या मनोरुग्णांची एकूण संख्या २५,००० आहे. परंतु गरज आहे दहा लाख रुग्णांच्या सोयीची. सर्वांत मोठे रुग्णालय पुण्यास येरवड्याला आहे. (सु. ३,००० रुग्ण). रांची व बंगलोर येथील रुग्णालये आधुनिक असून तेथे अखिल भारतीय पातळीवरील मानसचिकित्सा विषयातील सर्व कक्षेतील पदव्युत्तर प्रशिक्षण केंद्रे आहेत. दिल्ली व कटक येथील रुग्णालये नवीनच बांधलेली आहेत.
सर्व सरकारी रुग्णालये १९१२ च्या ‘भारतीय वेड्यांच्या कायद्या’नुसार नियंत्रित केली जातात. बहुतेक सर्व रुग्णालयांत मानसौषधी, विद्युत् उपचार व व्यवसायोपचार उपलब्ध आहेत. मानसोपचार व मानसशल्यचिकित्सा फारच थोड्या रुग्णालयांत मिळू शकते. रांची, बंगलोर व आग्रा येथील रुग्णालयांत बंधने काढून टाकण्यात आली आहेत. बहुतेक रुग्णालयांत मानसचिकित्साक्षेत्रातील प्रशिक्षित सेवकवर्ग उपलब्ध आहे. उदा., मानसचिकित्सक, मानसचिकित्सी समाजसेविका, मानसचिकित्सी परिचारिका आणि व्यवसायोपचारतज्ञ. बऱ्याच मनोरुग्णालयांत बाह्यरुग्णविभाग सुरू केलेला आहे आणि काही रुग्णालयांत मानसचिकित्सकांचे (वैद्यकीय) प्रशिक्षणही सुरू झालेले आहे. ह्या सर्व सुधारणांमुळे गेल्या १५-२० वर्षांत मनोरुग्णालयांचा दर्जा उंचावला आहे; परंतु पाश्चिमात्य रुग्णालयांशी तुलना करण्यासारखी रुग्णालये फक्त ४ ते ५ च निघतील.
मनोविकल मुलांसाठी भारतात एकंदर ५१ लहानमोठ्या संस्था कार्यरत असून त्यांतील २५ सरकारी आहेत. यांतील थोड्याच संस्थांत खास शिक्षणक्रमाची किंवा आधुनिक उपचारांची सोय आहे.
मोठ्या शहरातल्या बऱ्याच सर्वसाधारण रुग्णालयांत आज मानसचिकित्सा हा विभाग असून बाह्यरुग्णसेवा आणि पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण घेण्याची व्यवस्थाही आहे. पदव्यूत्तर मानसचिकित्सा प्रशिक्षण केंद्रे थोड्याच सार्वजनिक रुग्णालयांत आहेत.
भारतात एकंदर मानसिक आरोग्यसेवा अत्यल्प असून समाज आणि शासन ह्या विषयाबद्दल अनभिज्ञ व उदासीन आहे. विशेषतः ग्रामीण भागात मानसिक आरोग्यसेवेची प्रकर्षाने उणीव जाणवते.
संदर्भ : 1. Caplan, Gerald, Principles of Preventice Psychiatry. New York, 1964.
2. Deutsch, Albert, Ed., The Encyclopaedia Of Mental Health, 6 Vold. New York, 1963.
3. Kaplan, H. I. and Others, Modern Synopsis of Comprehensive Textbook of Psychiatry-III, Baltimore, 1981.
4. Jahoda, M. Current Concepts of Posistive Mental Health, New York, 1958.
5. Joint Commission on Mental Health of Children, Crisis in Child Mental Health : Challenge for the 1970’S. New York, 1969.
6. Jones, M. The Therapeutic Community, New York, 1958.
7. Wechsler, H. and Others, Ed. Social Psychology And Mental Health, New York, 1970.
लेखक : र. वै. शिरवैकर
स्त्रोत : मराठी विश्वकोशअंतिम सुधारित : 6/26/2020
या व्यक्तीच्या मनावर सतत तणाव असतो. अस्वस्थता, तणा...
मुंबई : तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम कर...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...
कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाल, अस्वस्...